कॉलेजचे मोरपंखी दिवस प्रत्येकजण मनात कायमचे जपून ठेवत असतो. कॉलेजमध्ये केलेली धमाल, मस्ती-मजा-मारामारी याच्या आठवणी माजी विद्यार्थी संमेलनात भेटून काढणारे अनेक वर्गमित्र-मैत्रिणी भेटतात. बेभान होऊन नाचणं, हवी तेवढी एकमेकांची मस्करी करणं, या सगळ्या गोष्टींच्या जोडीला कॉलेजच्या निवडणुकीच्या निमित्ताने झालेलं राजकारण, हाणामाऱ्या आणि त्याजोडीला एक रहस्य अशी rv11सांगड घालत ‘क्लासमेट्स’ हा मराठी चित्रपट साकारला आहे. दोन गोष्टींची सरमिसळ रंजक पद्धतीने करीत दिग्दर्शकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
 व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकमुळे शाळा-कॉलेजचे सवंगडी, मित्रमैत्रिणींना शोधून काढून भेटणेही आता सहजशक्य झाले आहे. कॉलेजचे माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन प्रत्यक्ष साजरे करण्याआधी हल्ली व्हॉट्सअ‍ॅपवर शाळा-कॉलेजच्या सवंगडय़ांचे ग्रुप आधी तयार झाले आहेत. व्हॉट्सअ‍ॅपवर एकमेकांचे फोटो टाकून कॉलेजमध्ये होतो तेव्हा कसे दिसायचो आणि आता कसे दिसतो ते एकमेकांना दाखविण्याची अहमहमिका लागते, मग त्यावरून मॅच्युअर पद्धतीने चिडवाचिडवी करायला व्हॉट्सअ‍ॅपचा उपयोग केला जातो. हीच धमाल आणि कॉलेजमध्ये केलेला राडा, धमाल, टिंगलटवाळी परंतु, मोबाइल-व्हॉटसअ‍ॅप, फेसबुक विरहित धमाल ‘क्लासमेट्स’ चित्रपटातून दाखविण्यात आली आहे.
एकमेकांची टेर खेचण्याच्या कॉलेजच्या मोरपंखी दिवसांत आपल्याच  मित्र-मैत्रिणींची गुपचूप ‘गुटरगू’ हा तर सगळ्यांच्या चेष्टेचा विषय या चित्रपटातही आहे, इथे एक गुंडसदृश कॉलेजचा ‘भाई’ आहे,  कॉलेजची निवडणूक आहे, गटबाजी आहे, कॉलेजचं गॅदरिंग आहे. ‘चड्डीत राहायचं’, ‘दर्जा’, दोस्ती पटल्याची विशिष्ट खूण अशा सगळ्या गोष्टी कॉलेजच्या निवडणुकीत झालेल्या राडय़ाच्या पाश्र्वभूमीवर दाखविताना गुंफलेल्या आहेत. मराठी चित्रपटांत अशा प्रकारे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन दाखविण्याचा प्रभावी प्रयत्न लेखक-दिग्दर्शकांनी केला असला तरी हिंदीत अशा प्रकारचे चित्रण यापूर्वी बऱ्याचदा येऊन गेले आहेत. ‘दुनियादारी’ या गाजलेल्या चित्रपटाची आठवण हा चित्रपट पाहताना होतो. परंतु, दोन गोष्टी आणि रहस्य यांची उकल करणारी मांडणी आणि व्यक्तिरेखांची ओळख करून देण्याची निराळी पद्धत दाखविल्यामुळे हा चित्रपट ‘दुनियादारी’ची नक्कल ठरत नाही, स्वतंत्र राहतो.
कॉलेज, प्रेम, धमाल-मस्ती म्हटलं की गाणी-संगीत हे अशा चित्रपटांचा अविभाज्य भाग असणं हे अपेक्षित असतं. त्याप्रमाणे यातही गाणी व संगीताची भट्टी बऱ्यापैकी जमली आहे.  
अन्या ऊर्फ अनी म्हणजेच सिद्धार्थ चांदेकर याच्या कॉलेज प्रवेशाने चित्रपटाची सुरुवात होते आणि रॅगिंगसदृश्य दृश्यातून सत्या म्हणजे अंकुश चौधरी, अप्पू म्हणजे सई ताम्हणकर, अमित म्हणजे सुयश टिळक अशा गँगची ओळख दिग्दर्शकाने अगदी थोडक्यात पण प्रभावीपणे करून दिली आहे. कॉलेजचे माजी विद्यार्थी संमेलन म्हटले की सर्वच प्रमुख पात्रांची ओळख स्वतंत्रपणे करून देण्याची पद्धत न वापरता सहजपणे फ्लॅशबॅकमधून करून देण्याची दिग्दर्शकाची पद्धत उत्तम सादर केली आहे.
अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, सुयश टिळक, पल्लवी पाटील, सुशांत शेलार, सचित पाटील, सिद्धार्थ चांदेकर, रमेश देव, किशोर शहाणे, संजय मोने अशा सगळ्याच कलावंतांनी आपापल्या व्यक्तिरेखा चांगल्या पद्धतीने वठविल्या आहेत. उत्तम अभिनय हे या चित्रपटाचे बलस्थान म्हणता येईल. उत्तम चित्रीकरण, संगीत यांची साथ लाभल्याने हा चित्रपट खिळवून ठेवण्यात यशस्वी होतो.

व्हिडीओ पॅलेस, एस. के. प्रॉडक्शन्स प्रस्तुत
क्लासमेट्स
निर्माता – सुरेश पै
दिग्दर्शक – आदित्य अजय सरपोतदार
छायालेखन – के के मनोज
पटकथा – क्षितिज पटवर्धन, समीर विद्वांस
संवाद – क्षितिज पटवर्धन
संगीत -अविनाश-विश्वजीत, अमितराज, पंकज पडघन, ट्रॉय-अरिफ
संकलन – इम्रान-फैझल
कलावंत – अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, सुयश टिळक, पल्लवी पाटील, सुशांत शेलार, सचित पाटील, सिद्धार्थ चांदेकर, रमेश देव, किशोर शहाणे, संजय मोने व अन्य.

-सुनील नांदगावकर