बहुप्रतिक्षित अशा ‘कान’ चित्रपट महोत्सव २०१८ च्या रेड कार्पेटविषयी सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. पण, या महोत्सवाच्या अनुषंगाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदाच्या ‘कान’ महोत्सवादरम्यान रेड कार्पेटवर सेल्फी काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या चित्रपट महोत्सवाच्या आयोजन प्रमुखांनीच याविषयीची माहिती दिली.

कलाविश्वात या चित्रपट महोत्सवावर अनेकांच्याच नजरा खिळलेल्या असतात. मुख्य सोहळ्यापेक्षा कला आणि फॅशन जगताच्या नजरा ‘कान’च्या रेड कार्पेटवरच खिळलेल्या असतात. अशातच आपल्या आवडत्या सेलिब्रिटीसोबत फोटो काढण्याची अनेकांचीच इच्छा असते पण, यंदा मात्र ही इच्छा अपूर्ण राहण्याची चिन्हं आहेत. मुख्य कार्यक्रमाआधीच सेलिब्रिटींसोबत सेल्फी घेणाऱ्यांची गर्दी होत असल्यामुळे कार्यक्रमाच्या सुव्यवस्थेत अडचणी निर्माण होत असल्याचं कारण देत हा महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं कळत आहे.

वाचा : फ्लॅशबॅक : माधुरीचे ‘एक दो तीन…’ कायम १ नंबर

फ्रेमू यांनी स्थानिक माध्यमांशी संवाद साधताना याविषयीची माहिती दिली. रेड कार्पेटवर येणाऱ्या चाहत्यांवरच सेल्फीची बंदी घालण्यात आली आहे. पण, चित्रपटांच्या टीममधील सदस्यांवरही ही बंदी असणार का, याविषयी मात्र काही गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या नसल्याची माहिती समोर आली आहे. चाहत्यांसाठी हा निर्णय निराशाजनक ठरला असला तरीही कार्यक्रमाच्या दृष्टीने पूरक असल्यामुळेच आयोजकांनी सेल्फीवर बंदी घातली आहे असं म्हणायला हरकत नाहीये.