04 March 2021

News Flash

मालिकांचा ‘कपडेपट’ हरवला!

‘कपडे’ हा खरं तर आपल्या सर्वाचा जिव्हाळ्याचा विषय. अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत गरजांपैकी एक गरज असली तरी या गरजेचं रूपांतर हौसेत कधी

| June 7, 2015 01:38 am

‘कपडे’ हा खरं तर आपल्या सर्वाचा जिव्हाळ्याचा विषय. अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत गरजांपैकी एक गरज असली तरी या गरजेचं रूपांतर हौसेत कधी होतं हे आपल्यालाही लक्षात येत नाही. मग मात्र घरातील कपाटं विविधरंगी कपडय़ांनी रंगून जातात. विशेषत: मुलींच्या बाबतीत तर त्यांना नेहमीच त्यांच्या खरेदीवरून आणि ओसंडून वाहणाऱ्या कपाटावरून चिडवलं जातं. पण हाच नियम आपल्या story---4मालिकांच्या नायिकांच्या बाबतीत मात्र कुठे तोकडा पडतो हे कळायला मार्ग नाही. विशेषत: मराठी मालिकांच्या नायिकांच्या कपाटातील कपडय़ांचा संग्रह पाहता, मुलींना कपडय़ांची असलेली हौस हा मुद्दाच कुठेतरी हरविल्याचं प्रकर्षांने दिसून येतं. ‘जुळून येती रेशीमगाठी’मधील मेघना असो किंवा ‘माझे मन तुझे झाले’ मधील शुभ्रा, ‘पुढचं पाऊल’ मधली कल्याणी असो किंवा ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’मधील अंकिता प्रत्येकीच्या कपडय़ांचा संग्रह काहीसा उणाच आहे. त्यामुळे मालिकांचा ‘कपडेपट’ हरवला आहे की काय अशी शंका यावी इतक्या वेळा त्याच त्याच कपडय़ांमध्ये या नायक-नायिकांना पाहण्याची वेळ प्रेक्षकांवर आली आहे.

 हिंदी मालिका कितीही कंटाळवाण्या, रेटणाऱ्या वाटल्या तरी एका महत्त्वाच्या कारणामुळे तमाम स्त्रीवर्ग या मालिका न चुकता पाहतो. ते म्हणजे या मालिकेतील नायिकेपासून ते खलनायिकेपर्यंत, नायिकेच्या आईपासून ते तिच्या सासूपर्यंत प्रत्येकीच्या कपाटातील कपडय़ांचा आणि दागिन्यांचा संग्रह. त्यामुळे कित्येकदा हिंदी मालिकांवर चर्चा करणाऱ्या किटी पार्टीतील महिलांच्या गप्पांमध्ये मालिकेच्या कथानकापेक्षा अमूक एक अभिनेत्रीची साडी कोणती होती किंवा कोणी अनारकली घातला होता, याची जास्त चर्चा होते. मालिकांमधून बाजारात आलेल्या कपडय़ांच्या स्टाईलची उदाहरणेही कमी नाहीत. ‘पवित्र रिश्ता’मधील अंकिताची अनारकली बाजारात आली. ‘बालिका वधू’च्या आनंदीच्या घागरा चोलीने नवरात्रीच्या काळात काय पारंपरिक कपडे कुठले परिधान करायचे? हा प्रश्न सोडवला होता. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या अक्षराच्या नेटच्या साडय़ांना मागणी आहे. पण मराठी नायिकांच्या नावावर अशा प्रकारची स्टाइलची दखल अभावानेच होते. नाही म्हणायला जान्हवीच्या तीन पदरी मंगळसूत्राची मागणी आहे. अक्कासाहेबांच्या साडय़ा किंवा ठुशी बाजारात शोधल्या जातात. म्हाळसा आणि बानू सध्या नवीन ‘स्टाइल दिवा’ बनू लागल्या आहेत. पण असे असूनही एका महिन्यासाठी नियमितपणे मालिका पाहून त्यात नायिकेने घातलेल्या कपडय़ांची उजळणी करायची ठरवल्यास तीन ते चार साडय़ा किंवा ड्रेस यांच्या पलीकडे त्यांचा कपडय़ांचा संग्रह जातच नाही हे लक्षात येतं. कित्येकदा मालिकेच्या सुरुवातीपासूनच तीनशे ते पाचशे भागांची मजल मारेपर्यंत नायिकेच्या कपडय़ांमध्ये बदल झालेला नसतोच. मालिका सुरू झाल्यापासून जान्हवी उभी कॉलर असलेल्या कुर्ता-लेगिनचे तीन जोड वापरते आहे. अजूनही या तीन जोड कपडय़ांमध्ये काहीच बदल आला नाही. मेघनानेही लग्नानंतर सलवार आणि कुर्ता वापरायला सुरुवात केल्यावर तिच्याकडे उणे चार जोड दिसताहेत. ही बाब आदित्याच्या अजून लक्षात कशी आली नाही? हा प्रश्नच आहे. शुभ्राने लग्न केल्यावर साडय़ा नेसण्यास सुरुवात केली, पण तिच्याकडचा साडय़ांचा संग्रहही तोकडाच होता. नंतर काही भागांनंतर तिनेही कुर्ता लेगिन घालण्यास सुरुवात केली, पण त्यातही तीच परिस्थिती.. ‘कमला’मधील कमला गरीब घरातील अडाणी मुलगी असल्याने तिच्याकडील अपुऱ्या कपडय़ांबाबत प्रेक्षकांनी समजून घेतले. पण शरयूचे काय? तिच्याकडे कपडय़ांचा तुटवडा असण्यामागचे गणित अजूनही उलगडले नाही.

 विशेष म्हणजे या सर्व नायिका सधन कुटुंबातील दाखवल्या आहेत. त्यामुळे कपडय़ांसाठी पैसे खर्च करणं शक्य नाही, हे कारण प्रेक्षकांना पटण्यासारखं नाही. म्हाळसा, बानू राण्या असूनही कपडय़ांच्या बाबतीत त्यांचा संग्रहही तोकडाच आहे. या सगळ्यात खटकणारी दुसरी बाब म्हणजे या नायिकांकडे असलेले तीन जोडी कपडेही एकाच प्रकारचे असतात. त्यांच्या कपडय़ांच्या पद्धतीमध्येही फरक आढळून येत नाही. एरवी मुली खरेदी करताना आपल्याकडे एकाच प्रकारचे दोन कपडे येणार नाहीत याची विशेष काळजी घेतात. पण ही मूलभूत माहितीच मालिकांच्या नायिकांच्या गावी नसल्याचे दिसून येते.

 सध्या मराठीमध्ये गाजत असलेल्या मालिकांच्या नायिकांच्या बाबतीत ही स्थिती असल्यावर मालिकेतील इतर व्यक्तिरेखांबद्दल न बोलणंच उत्तम. विशेषत: पुरुष व्यक्तिरेखांच्या बाबतीत परिस्थिती अजूनच वाईट आहे. श्री, आदित्य, जय, शेखर यांना कपडय़ांच्या बाबतीत तक्रार करता येत नाही. त्यातही श्रीच्या घरात त्याच्या प्रत्येक आईच्या पसंतीचे एक शर्ट असल्यामुळे सहा आया आणि जान्हवी यांच्या नावाने सात शर्ट असल्याचे समाधान तरी त्याला मानता येते. त्यामुळे मालिकेत दाखविल्या जाण्याऱ्या मोठय़ा घराचा पोकळ वासा यातून दिसून येतो. पण यापुढे तरी यात बदल होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2015 1:38 am

Web Title: clothing sense in marathi serials
टॅग : Marathi,Serials
Next Stories
1 मायाबाजार थंडच!
2 ये नच नहीं आसान..
3 गश्मीर ‘रेडी टू रॉक’
Just Now!
X