News Flash

प्रेक्षागृहे ओस पडती..

जवळजवळ पंधरा दिवस चित्रपटगृहे बंद राहणार असल्याने सिने वितरक, निर्माते यांचे धाबे दणाणले आहे

(संग्रहित छायाचित्र)

मानसी जोशी

विदेशी वाऱ्यातून वाहत आलेला करोना विषाणू  प्रत्येक देशात मुक्कामाला राहिला आहे. जगभरातील विविध देशांनंतर आता भारताला आणि पर्यायाने महाराष्ट्रालाही करोनाचा विळखा बसतो आहे. या आजारामुळे जागतिक पातळीवर होणारे विविध क्षेत्रातील नुकसान आपण पाहतच आहोत, पण नानाविध दु:खातून आपल्याला बाहेर काढणाऱ्या मनोरंजन विश्वालाही याचा जोरदार फटका बसला आहे. यामध्ये हॉलीवूडपासून ते अगदी गल्लीतल्या सांस्कृतिक कार्यक्रमांपर्यंत सर्वाचाच समावेश आहे.

गेल्या महिनाभरापासून सर्वसामान्य माणसांचे आयुष्य करोनामय झाले आहे. बातम्यांचे मथळे, विनोद, मीम्स याची जागा आता करोना या संसर्गजन्य विषाणूने घेतली आहे. लोकल, बस आणि प्रवासात लोक मास्क लावून फिरत आहेत. कर्मचाऱ्यांना घरी बसून काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. तर मुलांच्या शाळांना सुट्टी दिली आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यात भरीस भर म्हणून सुरक्षेच्या कारणास्तव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी विधानसभेत  मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आणि पिंपरी चिंचवड या शहरांतील नाटय़-चित्रपटगृहे, तरणतलाव ३० मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे प्रेक्षकांची मोठी पंचाईत झाली असून निर्माते आणि वितरकांना त्याचा मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

जवळजवळ पंधरा दिवस चित्रपटगृहे बंद राहणार असल्याने सिने वितरक, निर्माते यांचे धाबे दणाणले आहे. मार्च महिन्यात प्रदर्शित होणारे इंग्रजी, हिंदी आणि प्रादेशिक अशा अंदाजे वीस चित्रपटांचे प्रदर्शन लांबणीवर टाकल्याने त्यांचे पुन:प्रदर्शन करण्यावाचून पर्याय नाही.  करोनाच्या धास्तीमुळे कलाकारांचे परदेश आणि प्रसिद्धी दौरे, वेब मालिका आणि चित्रपटांचे प्रदर्शन, पुरस्कार सोहळे लांबणीवर टाकण्यात आले आहेत.  प्रेक्षकही सावधगिरी बाळगत घराबाहेर जाण्याचे टाळत असून याचा परिणाम चित्रपटांच्या व्यवसायावर होणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे. यामुळे समस्त कलासृष्टीची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशीच झाली आहे. सध्या प्रदर्शित झालेल्या आणि रखडलेल्या चित्रपटांच्या प्रसिद्धी, जाहिरातींवर केलेला खर्च कसा भरून काढायचा याची तयारी निर्माते आणि वितरक करत आहेत.  मार्च महिन्यात हिंदीत ‘अंग्रेजी मिडीयम’ एकमेव चित्रपट प्रदर्शित झाला असून ‘सूर्यवंशी’, ‘८३’, ‘संदीप और पिंकी फरार’ हे चित्रपट येत्या काही आठवडय़ात प्रदर्शित होणार होते, मात्र त्यांचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. तर मराठीतही ‘ईमेल फिमेल’, ‘अजिंक्य’, ‘एबी आणि सीडी’, ‘विजेता’ या चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे.

राज्यात मुंबई, पुणे आणि नाशिक या शहरांत ३० मार्चपर्यंत नाटय़गृहे बंद राहणार असल्याने उर्वरित महाराष्ट्रात चित्रपटगृहं सुरू ठेवायचे की नाही हा प्रश्न वितरकांना पडल्याचे चित्रपट वितरक समीर दीक्षित यांनी सांगितले. ‘सध्या येऊ घातलेल्या मुख्य चित्रपटांचे प्रदर्शन स्थगित केल्याने वितरकांकडे लावण्यासाठी दुसरा चित्रपटच नाही. या निर्णयामुळे निर्माते, वितरक आणि थिएटर मालक यांची गोची झाली आहे. वितरकांनी थिएटर मालकांना एका आठवडय़ाच्या शोचे आगाऊ पैसे देऊन ठेवले आहेत. थिएटर मालक उरलेले पैसे देतील की नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे. असा तडकाफडकी निर्णय घेण्याआधी सरकारने वितरक आणि निर्मात्यांना पूर्वकल्पना देणे गरजेचे होते. यामुळे एप्रिल महिन्यात एकाच वेळी चार ते पाच चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ‘सूर्यवंशी’, ‘८३’ या बिग बजेट हिंदी चित्रपटांच्या भाऊगर्दीत मराठीला किती थिएटर मिळणार?, ही चिंतेची बाब आहे. एका चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी साधारण चाळीस ते पन्नास लाख रुपये एवढा खर्च येतो. एकूणच चित्रपट पुन:प्रदर्शित करणे हे आर्थिक तोटय़ाचे असल्याचे मत दीक्षित व्यक्त करतात.

‘पॅनोरमा स्टुडिओज’ या वितरण कंपनीचे मुरली चटवानी यांनी इरफान खानच्या ‘अंग्रेजी मिडीयम’ चित्रपटाची सद्य:स्थिती विशद केली. कथानक, कलाकार चांगले असूनही या चित्रपटाला निव्वळ सद्य परिस्थितीचा फटका बसला आहे. ‘अंग्रेजी मिडीयम’हा चित्रपट देशभरात प्रदर्शित करण्यात आला आहे. यात केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, जम्मू काश्मीर, दिल्ली या राज्यांत चित्रपटगृहे बंद करण्याच्या निर्णयाचा निश्चित फटका ‘अंग्रेजी मिडीयम’ला बसणार आहे. दोन दिवस या चित्रपटाचे काही प्रयोग झाले आहेत. काही राज्याच्या शहरी भागात चित्रपटगृहे बंद केले असले तरीही उर्वरित भागात चित्रपट सुरू आहेत. मात्र करोनाच्या धास्तीमुळे चित्रपटगृहात येणाऱ्या प्रेक्षकांची संख्या कमी झाली आहे. परिणामी चित्रपटाचा व्यवसाय वीस ते तीस टक्क्यांनी कमी झाला आहे. चित्रपटाचा जेमतेम खर्च तरी भरून निघेल की काय याची चिंता निर्मात्यांना लागून राहिली आहे. हा चित्रपट उर्वरित ठिकाणी सुरू आहे. सुरक्षेच्या कारणास्तव वितरक म्हणून चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पुढील तारखा आणि प्रयोग देणे थांबवले आहे. हा चित्रपट पुन:प्रदर्शित करण्याशिवाय काही पर्याय नसल्याचे चटवानी यांनी सांगितले.

हिंदीतील ट्रेड विश्लेषक तरण आदर्श म्हणतात की, करोनाची लाट ही जगभरात पसरल्याने सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे आहे. केरळ, जम्मू काश्मीर, कर्नाटक , दिल्ली आणि आता महाराष्ट्र येथे सुरक्षेच्या कारणास्तव चित्रपटगृहे बंद करण्यात आली आहे. पुन्हा चित्रपटगृहे कधी सुरू होतील याचा अंदाज बांधणे कठीण होत आहे. सर्व वितरक आणि निर्माते चित्रपट प्रदर्शनाच्या पुढील तयारीस लागले आहेत. या दहा पंधरा दिवसांत झालेले नुकसान कसे भरून काढायचे हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. करोनामुळे हिंदी चित्रपटांचे परदेशातील प्रदर्शनही रद्द करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. या घटनांच्या पाश्र्वभूमीवर अखिल भारतीय निर्मात्यांच्या संघटनेने एकत्र येत बैठक घेतली असून चित्रपटाच्या सेटवरील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना केल्या जाव्यात याबाबत मार्गदर्शन केले आहे. देशभरात चित्रपटगृहांची साखळी असणाऱ्या ‘पीव्हीआर’ आणि ‘आयनॉक्स’ समूहाने सरकारच्या निर्णयाचे समर्थन करत योग्य ती काळजी घेणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.हिंदी चित्रपटसृष्टीनेही सावधगिरीचा पवित्रा घेत वेब मालिकांचे प्रदर्शन, कलाकारांचे प्रसिद्धी दौरे हे कार्यक्रमही लांबणीवर टाकले आहेत. या पाश्र्वभूमीवर ‘बागी ३’ आणि ‘अंग्रेजी मिडीयम’ या चित्रपटाच्या चमूने दिल्लीला प्रसिद्धी दौऱ्यास जाण्याचे टाळले. ‘सूर्यवंशी’ (२४ मार्च), ‘८३’ (१० एप्रिल), ‘संदीप और पिंकी फरार’ (२० मार्च), तिलोत्तमा शोम आणि विवेक गोंबर यांची भूमिका असलेला ‘सर’ (२० मार्च) या चित्रपटांचे प्रदर्शनही स्थगित केले आहे.

* कलाकारांचे परदेश दौरे रद्द

अभिनेत्री दीपिका पदुकोण, सलमान खान आणि हृतिक रोशन यांनी करोनाच्या धास्तीने आपले परदेश दौरे रद्द केले आहेत. दीपिकाला पॅरिसमधील ‘फॅशन वीक’साठी आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव तिने पॅरिसला जाण्याचे रद्द केले. शोभिता धुलीपाल हिने केरळमधील ‘सितारा’ या चित्रपटाचा दौरा रद्द केला आहे. ‘मलंग’ चित्रपटाच्या पार्टीच्या वेळेस अभिनेता अनिल क पूरचा मास्क घालून आलेला लूक हा चर्चेचा विषय ठरला. तर अक्षय कुमारचा ‘गूड न्यूज’ चित्रपट हॉंगकाँगमध्ये फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होणार होता, तोही रद्द करण्यात आला आहे.

* प्रेक्षकांशिवाय ‘झी पुरस्कार’

हिंदी चित्रपटसृष्टीत मानाच्या समजल्या जाणाऱ्या आयफा, फिल्मफेअर या पुरस्कार सोहळ्यांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतात. मार्च महिन्याच्या अखेरीस मध्य प्रदेशात होणारा आयफा पुरस्कार सोहळा सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करण्यात आला आहे. तसेच गाणी, नृत्य यांची रेलचेल असणारा  ‘झी सिने पुरस्कार’ प्रेक्षकांशिवाय पार पडला आहे. झी सिने पुरस्कार सोहळा हा प्रेक्षकांविना होणारा पहिलाच पुरस्कार सोहळा ठरणार आहे. यासाठी  प्रेक्षकांनी काढलेल्या  पुरस्कार सोहळ्याच्या आगाऊ तिकिटाची रक्कमही त्यांना परत करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. हा पुरस्कार सोहळा आता शनिवारी २८ मार्चला झी टीव्ही आणि झी सिनेमा या वाहिन्यांवर दाखवला जाणार असल्याचे झीतर्फे स्पष्ट करण्यात आले.

* विवाहस्थळ बदलले

करोनामुळे अभिनेता वरुण धवनने आपले विवाह स्थळ बदलल्याची चर्चा आहे. वरुण धवन आणि प्रियकर नताशा दलाल पुढील महिन्यात थायलंडमध्ये विवाह करणार होते. मात्र, करोनामुळे त्यांनी आपले विवाहस्थळ बदलले असल्याची चर्चा आहे.

* टॉलीवूडलाही फटका

नागार्जुनच्या ‘वाइल्ड डॉग’ या चित्रपटाचे चित्रीकरण थायलंडमध्ये होणार होते. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव हे लांबणीवर टाकण्यात आले. कमल हसनच्या ‘चायना २’ चे चित्रीकरण चीनमधून इटलीमध्ये हलवण्यात आले आहे. या मार्च महिन्यात प्रदर्शित होणारे ‘कॉकटेल’, ‘ओबाथाणे डिक्कू’, ‘व्ही’, ‘रोजुल्लो प्रेमीचंदम ईल्ला’, ‘ओरे बुजी ग्गा’, ‘अमृथा रामम’,  ‘मराक्कार – अरबिकाडालिंटे सिमहॅम’, ‘मराक्काम – अरांबिक्कडालिन सिंघम’, ‘ना पेरु राजा’, ‘प्ररांभा’, ‘टक्कर’, ‘यार अन्मुल्ले र्टिन्स’ या चित्रपटांच्या प्रदर्शनाला अनिश्चित काळासाठी स्थगिती देण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2020 4:44 am

Web Title: cm uddhav thackeray theatre close due to coronavirus abn 97
Next Stories
1 प्रेक्षागृहे ओस पडती..
2 ‘वेळ कमी पडतो म्हणजे काय, हे आत्ता कळतंय’
3 टेलीचॅट : चर्चेतील बबडय़ा
Just Now!
X