|| सुहास जोशी

अमली पदार्थ आणि त्यांचा अवैध व्यापार या घटनांवर जगात कदाचित सर्वाधिक चित्रपट आणि मालिका रचल्या गेल्या असाव्यात असाच या व्यवसायाचा पसारा आहे. प्रत्येक देशाची प्रांताची अशी स्वत:ची एक स्वतंत्र कथा असते. त्यामुळेच हा विषय दृक्श्राव्य माध्यमांसाठी अगदी पूरक असाच ठरत असावा असे वाटते. स्पेनमधील एका छोटय़ाशा प्रांताला असलेली ही पाश्र्वभूमी त्यामुळेच ‘कोकेन कोस्ट’ या मालिकेसाठी पूरक ठरली आहे.

भौगोलिक रचना आणि त्यानुसार सुरू असणाऱ्या परंपरागत व्यवसायात काही मोठे बदल झाले की त्यातून एखादी तिसरीच घटना डोकं वर काढते. आणि जणू काही तो बदललेला व्यवसायच मूळ व्यवसायाची जागा घेतो. स्पेनमधील स्वायत्त प्रदेश असलेल्या गॅलिसिया प्रांतातील मच्छीमारांच्या आयुष्यात असाच मोठा बदल झाला तो ऐंशीच्या दशकात. अनेक मच्छीमारांनी सोप्या मार्गाने भरपूर पैसा मिळवून देणारे अमली पदार्थाच्या व्यापाराचे तंत्र अवलंबले आणि त्यांचा तोच महत्त्वाचा व्यवसाय झाला. ‘फरिना’ या पुस्तकावर आधारित ‘कोकेन कोस्ट’ या मालिकेतून हेच अगदी व्यवस्थित दिसून येते. तब्बल १६६० किमीचा लांबलचक समुद्रकिनारा लाभलेल्या या प्रांतात मच्छीमारांनी सुरुवातीस चोरटय़ा मार्गाने तंबाखूची आवक सुरू केली. त्यातून प्रचंड असा पैसा हाती खुळखुळू लागला होताच, पण अशाच वेळी आणखीन पैशांचा मोह होत असतो. या मच्छीमारांपैकी तरुण असलेला सितो मिन्नानको याच्या अंगात तारुण्यसुलभ रग होती. परिणामी त्याने अमली पदार्थाची वाहतूक सुरू केली. अर्थातच त्यातील अमाप पैशाचा मोह इतरांनादेखील झाला. मात्र त्यातूनच मग एका दुष्टचक्राची सुरुवात होत गेली. ऐंशीच्या दशकातला हा सारा प्रवास ‘कोकेन कोस्ट’मध्ये उलगडला आहे.

मुळातच ही मालिका सत्य घटनांवर आधारित अकाल्पनिक पुस्तकावर आधारित असल्यामुळे की काय पण तिचा बाज हा काहीसा नीरस वाटणारा आहे. मूळ माहितीत नाटय़ आणायचा प्रयत्न होताना दिसतो, पण कदाचित मूळ माहितीतच नाटय़ कमी असावे की काय असे वाटणारे अनेक प्रसंग दाखवण्यात वेळ गेला आहे. पण त्यातून काही ठोस हाताला लागते असे देखील घडत नाही. किंबहुना सगळंच पडद्यावर दाखवायचा अट्टहास केल्यामुळे असे झाले असावे.

चित्रीकरण वगैरे तांत्रिक बाजू हल्ली सगळीकडेच दर्जेदार असतात तशाच येथेदेखील आहेत. पण एकूणच कथानकाची बांधणी ही काही भक्कम झालेली नाही. प्रसंगातील थरार त्यामुळे पुरेसा जाणवत नाही. त्यामुळे संकलनात काही खेळ करण्याची फारशी संधीच मिळालेली नाही. कथानकाच्या अनुषंगाने राजकारणी-पोलीस-गुन्हेगार अशा साखळीत पसरलेला भ्रष्टाचार वगैरे बाबी येथेदेखील मांडल्या आहेत. पण येथील पोलीस भ्रष्टाचारापेक्षा साध्यासुध्या बाबतीत पुरावे सापडत नाहीत म्हणूनच अधिक हतबल आणि वैतागलेला दिसतो. हे जरा खटकणारे आहे.

‘नेटफ्लिक्स’वरील याच विषयांच्या अन्य मालिका तुलनेने खूपच उत्कंठा वाढवणाऱ्या अशा राहिल्या आहेत. त्या मानाने येथे जरा गडबडच झाली आहे. मूळ स्पॅनिश टीव्हीवरील मालिका ‘नेटफ्लिक्स’वर आणताना दहा भागांत बसवण्यासाठी एक एक तासाहूनही अधिक लांबीचे भाग वेबवर पाहावे लागतात. ते आणखीनच कंटाळवाणे ठरते. तसेही हे काही थेट ‘नेटफ्लिक्स’चे स्वत:चे उत्पादन नाही हे वेगळेच.

गेल्या महिन्यात नेटफ्लिक्सवरील ‘सेक्रेड गेम्स’ ही पहिली हिंदी वेबसीरिज चांगलीच गाजत असताना नेटफ्लिक्सवरच एक जुनी भारतीय मालिका पाहण्यात आली. ही मालिका इंग्रजी असली तरी भारताशी संबंधित आहे, तिचं नावच मुळी ‘इंडियन डिटेक्टिव्ह’ असे आहे. कॅनडाच्या पोलीस खात्यातील एक डिटेक्टिव्ह त्याच्या वडिलांना भेटायला मुंबईत येतो आणि त्याच वेळी कर्मधर्मसंयोगाने त्याला कॅनडाशी लिंक असलेल्या अमली पदार्थाच्या मोठय़ा घटनेचा पर्दाफाश करायची संधी मिळते असे याचे कथानक. पण याची रचनाच साधारण कॉमेडी थ्रिलर अशी केल्यामुळे ही मालिकादेखील चांगलीच गडबडली आहे. केवळ सहा भागांची ही मालिका शेवटपर्यंत पकडच घेत नाही. त्यातच पुन्हा भारतीय पात्रं हिंदी उच्चार करताना उगाचच ओढूनताणून इंग्रजी ढब वापरतात ते खूप हास्यासपद वाटते. आणि भारतीय पात्र इंग्रजी बोलतात तेदेखील फारसे परिणामकारक वाटत नाही. एकूणच ही मालिका काहीशी बालिश वाटावी अशीच आहे. अगदी छोटय़ा-मोठय़ा प्रत्येक बाबतीत हा बालीशपणा संपूर्ण मालिकेत सतत जाणवत राहतो.

मालिकांची संख्या वाढावी म्हणून नेटफ्लिक्सवरदेखील अशा काही मालिकांचा भरणा होत आहे की काय असे या दोन मालिका पाहून वाटत राहते, इतकेच यानिमित्ताने जाणवते.