समलैंगिकता गुन्हा नसल्याचा ऐतिहासिक निर्णय गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने दिला. न्यायालयाने दिलेल्या या निर्णयानंतर सर्वच स्तरातून याचं स्वागत करण्यात आलं. यामध्ये बॉलिवूड सेलिब्रेटीही मागे नसल्याचं पाहायला मिळालं. त्यातच आता अभिनेत्री सेलिना जेटलीनेही या समुदायाचं अभिनंद केलं असून याविषयी तिने तिचा अनुभवही शेअर केला आहे.

समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणाऱ्या भारतीय दंड विधानाच्या (आयपीसी) कलम ३७७ च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी पार पडली. त्यावेळी हा ऐतिहासिक निर्णय देण्यात आला. न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे सेलिनाला खऱ्या अर्थाने आनंद झाल्याचं तिने नुकतंच एका मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.

सेलिना गेल्या अनेक वर्षापासून या समुदायासाठी लढा देत होती. त्यामुळे न्यायलयाने दिलेल्या निर्णयामुळे तिलादेखील न्याय मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. एलजीबीटी या समुदायातील व्यक्तींचा समाजाने स्वीकार करावा, त्यांना समाजात मान मिळावा यासाठी सेलिनाने अनेक खस्ता खालल्या होत्या. मात्र तिच्या या संघर्षाच्या काळात तिच्या सख्ख्या लोकांनीच तिची साथ सोडली होती.

‘एलजीबीटी समुदायाला न्याय मिळावा यासाठी मी गेले १५ वर्ष संघर्ष करत होते. समाजातील प्रत्येक व्यक्तीला माझं म्हणणं पटवून देण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यावेळी हे कोणी मान्य करत नव्हतं. माझं हे वागणं अनेकांना खटकत होतं. काहींनी तर माझ्याशी चार हात लांब राहण्याचाही निर्णय घेतला होता. इतरांचं सोडा पण माझ्या परिवारानेही मला विरोध दर्शविला होता. माझ्या कुटूंबानेही माझी कधीच साथ दिली नव्हती’, असं सेलिना म्हणाली.

दरम्यान, सेलिनाप्रमाणेच बॉलिवूडमधील अन्य कलाकारांनीही न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. यामध्ये करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने खास शब्दांमध्ये या निर्णयाचं कौतुक केल्याचं पाहायला मिळालं.