News Flash

कॉलेज आठवणींचा कोलाज : ‘ड्रामा स्कूल’ने खंबीर वृत्ती दिली

प्रत्येक कलाकाराला शेवटपर्यंत संघर्ष करावा लागतो. संघर्ष कधीच संपत नाही.

शुभंकर तावडे

शुभंकर तावडे

मला नृत्याची खूप आवड आहे. मी फ्रिलान्स डान्स (मुक्त नृत्य) करत होतो. मी टीव्ही बघून तसं नृत्य करायचा सराव करायचो. त्यानंतर नृत्याच्या एका चमूसोबत नृत्य करायला लागलो. मग आम्ही ग्रुपने वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये नृत्य करायचो. विविध स्पर्धामध्ये भाग घ्यायचो. त्यामुळे महाविद्यालयात गेल्यावर नृत्य करण्याकडेच माझा कल होता. त्यानंतर मी एकांकिकांमध्ये काम करायला लागलो. एकांकिकांमधून काम करताना पहिल्यांदाच मोठी संधी वगैरे मिळाली, असं काही झालं नाही. आधी काही छोटय़ा भूमिका केल्या. ज्यात माझ्या वाटय़ाला कमी संवाद असायचे. एकांकिकांचे काही ठिकाणी प्रयोग व्हायचे, कधी एकांकिका स्पर्धा व्हायच्या. अशा प्रकारे काम करताना उत्तेजनार्थ बक्षिसं वगैरे मिळू लागली. महाविद्यालयात तृतीय वर्षांला असताना मी एक नाटक केलं. त्यात माझी मुख्य भूमिका होती. त्यानंतर अभिनय करताना माझा आत्मविश्वास वाढत गेला. त्याचवेळेस आपण अभिनयक्षेत्रात काही करू शकतो, हा विश्वासही मिळाला. याच क्षेत्रात आपले भविष्य घडवू, याची जाणीव झाली.

मग मी एक वर्षांसाठी ड्रामा स्कूल, मुंबई या नाटय़प्रशिक्षण संस्थेत पुढील अभिनय शिक्षणासाठी प्रवेश घेतला. तिथे मला रंगभूमी, अभिनय, दिग्दर्शन असे सर्व पैलू शिकायला मिळाले. अभिनय क्षेत्राकडे पाहण्याचा प्रगल्भ दृष्टिकोन मिळाला. ड्रामा स्कूलमध्ये रंगभूमीचा अभ्यास फक्त मराठी नाटय़सृष्टीपुरता मर्यादित नव्हता. तिथे मला मराठीबरोबरच हिंदी आणि इंग्रजी भाषेतील नाटय़सृष्टीचाही अभ्यास करायला मिळाला. दिग्दर्शक सुनील शानबाग, गितांजली कुलकर्णी, कल्याणी मुळे, महेश दत्तानी यांच्याकडून शिकायला मिळाले. आम्ही एका तुकडीत १३ विद्यार्थी होतो. आणि ३० ते ३५ प्रशिक्षक आम्हाला नाटय़ाचं चहुअंगांनी शिकविण्यासाठी तत्पर होते. त्यांच्याकडून बहुमोल मार्गदर्शन मिळालं. त्यानंतर मी अभिनयाचा विचार करिअर म्हणून करू लागलो आणि ‘फ्रेशर्स’ मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. नुकतीच मी ‘कागर’ चित्रपटात युवराज नावाची व्यक्तिरेखा साकारली. पश्चिम महाराष्ट्रातील तरुणाईचं तो प्रतिनिधित्त्व करतोय. मी मुंबईचा असल्याने महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये असलेली राजकीय पाश्र्वभूमी माहीत नव्हती. परंतु ‘कागर’ चित्रपटाच्या निमित्ताने गावाकडची राजकीय रणधुमाळी कशी असते, याची जाणीव झाली. गावाकडचं जगणं कसं असतं, हे समजून घेता आलं.

मला वाटतं, एखाद्या क्षेत्रात येण्यासाठी तीन मार्ग असतात. आपल्याकडे उपजतच ती कला असणे हा पहिला मार्ग झाला. त्या जोरावर आपल्याला संधी मिळाली आणि आपण चांगली कामगिरी केली तर पुढे यशस्वी होतो. एखाद्य क्षेत्रात जाण्यासाठी त्या क्षेत्राबद्दलचं प्रशिक्षण घेणं हा दुसरा मार्ग आहे. तिसरा मार्ग तुम्हाला छोटय़ा छोटय़ा संधी मिळतात आणि पुढे जाऊन मोठी संधी मिळते. माझ्याबाबतीत असं झालं की माझ्यात उपजत कलाविषयक गुण होते. मला आवडही होती. मी अभिनयाचं शिक्षणही घेतलं आणि या क्षेत्रात आलो. तर असा या तीन मार्गापैकी अभिनय क्षेत्रात येण्याचा प्रत्येकाचा एकेक मार्ग असतो. आणि तो प्रत्येकाच्या बाबतीत वेगळा असतो. तो बरोबर की चूक असं आपण सांगू शकत नाही. माझ्यामध्ये अभिनय गुण होते, पण प्रशिक्षण घेतल्यामुळे त्याला पैलू पाडले गेले. माझं मलाच स्वत:ला पारखून घेऊ शकलो. आता अभिनय क्षेत्रात चांगल्या संधी आहेत. आपल्या भारतीय आशयाला जगभरात मागणी आहे. मालिका, चित्रपट आणि वेबसीरिजचं नवं माध्यम संधीचं नवं दालन आहे.

प्रत्येक कलाकाराला शेवटपर्यंत संघर्ष करावा लागतो. संघर्ष कधीच संपत नाही. कलाकार कधीच संतुष्ट नसतो. त्याला सतत काहीतरी वेगळं करण्याची ओढ लागलेली असते. मी ड्रामा स्कूलमध्ये प्रवेश घेतल्यावर रोज नवीन शिकायला मिळत होतं. कलाकार म्हणून जाणीव घडत होती. इथल्याच शिक्षणाने अभिनय क्षेत्रात येण्यासाठी ठाम विश्वास दिला. या क्षेत्रात आल्यावर संधी मिळते तशा काही नकारात्मक बाजूही आहेत. बऱ्याचदा धोका पत्करावा लागतो. त्यासाठी लागणारा खंबीरपणा ड्रामा स्कूलने दिला. आणि मला अभिनयाची आवड असल्यामुळे मी मन लावून या क्षेत्रासाठी झोकून दिलं. यातच मला आनंद वाटतो. मी हॉलीवूड, बॉलीवूडमधील काही कलाकारांना मानतो, त्यांचं निरीक्षण करतो. तसंच मी माझे वडील सुनील तावडे यांच्याकडूनही शिकत आलो आहे आणि यापुढेही शिकत राहणार आहे.

शब्दांकन – भक्ती परब

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2019 2:15 am

Web Title: college days of marathi actor shubhankar tawde
Next Stories
1 मराठी चित्रपट रसिकांना भागिदारीत चित्रपट निर्मितीची संधी
2 रॅप म्हणत कियाराने कापले केस, पाहा व्हिडिओ
3 #MeToo वरील आरोपांवर बोलताना अली जफरला कोसळलं रडू
Just Now!
X