09 December 2019

News Flash

ध्येयवेड्या दिग्दर्शकाच्या खडतर प्रवासातून साकारला ‘कॉलेज डायरी’

'कॉलेज डायरी' सांगणार गाथा एका दिग्दर्शकाच्या संघर्षाची

अनिकेत घाडगे

स्वप्न सगळेच पाहतात पण पूर्ण मात्र काहींचीच होतात. स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यासारखं सुख ते दुसरं कुठलं, हे त्याला कळलं ज्याने ते सर्वार्थानं जगलं. आपली ध्येय… आपली जिद्द… आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचा दुर्दम्य आशावाद असतो तो स्वप्नांत. ही वेडी आशा आपल्याला पछाडून सोडते आणि मग सुरु होतो एक धाडसी प्रवास. खाचखळग्यांचा, वळणा-वळणांचा, एखाद्या मृगजळाप्रमाणे मग आपण त्या स्वप्नांमागे धावू लागतो. अनिकेत जगन्नाथ घाडगे या तरुण दिग्दर्शकानेही असाच काहीसा रोमांचकारी प्रवास अनुभवला तो ‘कॉलेज डायरी’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने. भावेश काशियानी फिल्म्स, आयड्रिम्झ फिल्मक्राफ्ट प्रस्तुत ‘कॉलेज डायरी’ १६ फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

मनोरंजन क्षेत्रात आपलं नाणं खणखणीत वाजवण्यासाठी प्रत्येक कलावंत तळमळत असतो. अनिकेतही त्यातलाच एक. स्वप्नांमागे धावताना पाय पोळले तरी चालतील पण स्वप्न कवेत घेणारच असा निश्चयच जणू त्याने आपल्या गाठीशी बांधून ठेवलेला. ‘कॉलेज डायरी’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने त्याचं स्वप्न तर प्रत्यक्षात साकारलं पण त्यामागील प्रवास प्रचंड कष्टप्रद आहे. प्रसंगी आई-बहिणींचे दागिने गहाण ठेवत कधी व्याजावर पैसे घेत त्याने या चित्रपटासाठी निर्माते भावेश काशियानी यांनाही पाठिंबा दिला. अचानकच काही निर्मात्यांनी माघार घेतल्यावर अनिकेतची जबाबदारी आणखी वाढली होती. एकाचवेळी चित्रपटाची धुरा तर दुसरीकडे चित्रपटासाठी आर्थिक मदत मिळवणं अशी त्याची काहीशी कात्रीत सापडल्यासारखी अवस्थाच झाली होती. अशा प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा अनिकेत न डळमळता आपल्या ध्येयाच्या दिशेने चालत होता.

हे ही नसे थोडके की, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रनिंग इक्विपमेन्टवर काम करीत असताना त्याच्या पाठीला दुखापत झाली जी पुढे जाऊन जीवघेणी ठरू शकली असती. त्याचीही अनिकेतने जराही पर्वा केली नाही. विशेष म्हणजे त्याचा अजिबात बाऊ न करता शूटिंगमध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडू दिला नाही. पाठीचं दुखणं सहन होई ना तरीही डॉक्टरांचा सक्तीचा बेडरेस्टचा सल्ला न जुमानता हा पठ्ठया पाठीवर स्प्रेचा वापर करीत आणि शूटवर जात असे. तब्ब्ल ३०० स्प्रे बॉटल्सचा वापर या दरम्यान त्याने केला जे केवळ सेटवरील अनिकेतच्या ३ मित्रांना माहित होतं. ध्येयवेड्या महत्त्वाकांक्षी अनिकेतला त्याचे स्वप्न साकार करण्यापासून कुणीच अडवू शकत नव्हतं हे त्याने ‘कॉलेज डायरी’ चित्रपटाद्वारा सिद्ध केलंय.

‘कॉलेज डायरी’ची कथा ही कॅम्पसमध्ये घडते. कॉलेज म्हणजे केवळ मजा-मस्ती-धम्माल असे मानणाऱ्या काही मित्रांच्या आयुष्यात अनपेक्षितपणे घडणाऱ्या घटनांभोवती फेर धरणारी अनिकेत जगन्नाथ घाडगे यांची कथा खिळवून ठेवणारी आहे. विशाल सांगळे, आनंद बुरड, समीर सकपाळ वैष्णवी शिंदे, शरद जाधव, प्रतीक्षा शिवणकर, अविनाश खेडेकर, प्रतीक गंधे, शिवराज चव्हाण,शुभम राऊत, हेमलता रघू, जनार्दन कदम आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘कॉलेज डायरी’ची थरारक गोष्ट उलगडण्यापूर्वी चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांना विचार करण्यास प्रवृत्त केले आहे.
‘कॉलेज डायरी’ हा चित्रपट येत्या १६ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

First Published on February 11, 2019 4:46 pm

Web Title: college diary director aniket ghadge struggle story
Just Now!
X