सध्या बिग बॉसचा १४ वा सीझन सुरू आहे. या सीझनमध्ये स्पर्धकांमध्ये रोज नवनवे वाद पाहायला मिळत आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राहुल वैद्य, जान कुमार सानू आणि निक्की तांबोळी यांच्या वाद सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. या वादादरम्यान राहुल वैद्यला बोलताना जान कुमार सानू यानं मराठी भाषेबद्दल काही आक्षेपार्ह शब्द उच्चारले. दरम्यान, हा भाग प्रकाशित झाल्यानंतर मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी जान कुमार सानूला धमकीवजा इशारा दिला होता. तसंच जान सानूनं २४ तासांत महाराष्ट्राची माफी न मागितल्यास बिग बॉसचं शूटींग होऊ देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतर बुधवारी रात्री जान सानूनं आपल्या वक्तव्याबद्दल महाराष्ट्राची माफी मागितली.

जान कुमार सानूचं वक्तव्य मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं होतं. तसंच त्यानंतर अनेकांनी त्याच्या वक्तव्याबाबत संतापही व्यक्त केला होचा. “माझ्याशी मराठीत बोलायचा प्रयत्न करू नको. बोलायचे असल्यास हिंदीत बोल. मला मराठी ऐकून चीड येते,” असं जान कुमार सानू म्हणाला होता. त्याच्या या वक्तव्यानंतर मनसेच्या अमेय खोपकर यांनी कठोर शब्दात इशारा दिला होता. “जान कुमार सानू… मराठी भाषेची याला चीड येते म्हणे. अरे तू कीड आहेस मोठी… मुंबईतून हाकलून देण्यासाठी मी नॉमिनेट करतोय याला,” असं अमेय खोपकर म्हणाले होते. “मुंबईत राहून तर आता तुझं करिअर कसं बनतं जान सानू तेच बघतो आता मी. लवकरच तुला स्वत:ची चीड येईल ही माझी गॅरंटी. आता आम्ही मराठी लवकरच तुला थोबडवणार. कलर्ससारख्या वाहिनीने खरंतर हा सीन वगळायला हवा होता, पण एडिट केलं नाही ते बरं झालं, गद्दारांची तोंडं कशी असतात ते समजलं,” असं म्हणत खोपकर यांनी जान सानू याला धमकीवजा इशारा दिला होता.

दरम्यान, मनसेच्या इशाऱ्यानंतर बिग बॉसच्या कन्फेशन रूममध्ये जान सानूला समजही देण्यात आली. तसंच या ठिकाणी सर्वांच्या भावनांचा आदर केला जात असून जान सानूनं केलेली चूक पुन्हा होऊ नये असंही बिग बॉसकडून सांगण्यात आलं. “मी काही दिवसांपूर्वी नकळत एक चूक केली. त्यामुळे मराठी भाषिकांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यामुळे मी सर्वांची माफी मागतो. मराठी भाषिकांना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता,” असं जान सानू म्हणाला.

वाहिनीकडूनही माफीनामा

कलर्स वाहिनीनं झालेल्या प्रकरणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून महाराष्ट्राची माफी मागितली होती. “कलर्स वाहिनीवर २७ ऑक्टोबर रोजी प्रसारित झालेल्या बिग बॉसच्या भागासंदर्भात आम्हाला अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. आम्ही याची दखल घेतली असून ज्या ठिकाणी ते वक्तव्य आहे तो भाग आम्ही सर्व ठिकाणांहून काढून टाकत आहोत. मराठी भाषेबद्दल करण्यात आलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील जनतेची मनं दुखावली गेली याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत. आमच्या प्रेक्षकांच्या भावनांचा आम्ही आदर करतो आणि आमच्यासाठी सर्व भाषा एकसमान आहेत,” असं कलर्स वाहिनीनं पाठवलेल्या पत्रात नमूद करण्यात आलं होतं.