News Flash

अस्मितेसाठी लढावं… पण बाईनं बाई सारखं वागावं!

आत्ताची स्त्री तशी राहिलेली नाही तिला स्वत:ची मतं आहेत

काळ कितीही बदलला तरीही घर सांभाळते ती स्त्री! मुलांचं संगोपन, त्यांच्यांवर संस्कार करते ती स्त्री! नवरा, सासरची माणसं सगळ्यांना साभांळून स्वत:ची अस्मिता जपते ती स्त्री! घराला घरपण देते ती देखील स्त्रीच! तरीही मर्यादांची बंधनं घातली जातात ती स्त्रीवर, बाईने बाईसारखं वागावं हे देखील तिच्याच मनावर बिंबवण्यात येतं अगदी लहानपणापासून. नियमांची चौकट, परंपरांचं ओझं एका स्त्रीवर थोपवलेलं असतं ते तिच्याच घरच्यांनी आणि समाजाने. तिचं संपूर्ण आयुष्य ती जबाबदारी पार पाडण्यात जातं.

हे चित्र आता बदलतं आहे, आत्ताची स्त्री तशी राहिलेली नाही तिला स्वत:ची मतं आहेत, विचार आहेत. परंतु स्त्रियांनी त्यांचे विचार मांडणे यालाच बऱ्याचदा विरोध केला जातो. विशेषत: स्त्री वर्गाचाच याला विरोध झालेला जास्त दिसून येतो. जेव्हा आजच्या काळातील मुलगी आपले विचार मांडते तेव्हा तिला बंडखोर म्हंटले जाते. अशाच परस्परविरोधी विचारसरणीतील द्वंद्व या कथासूत्रावर आधारित आणि युफोरिया प्रॉडक्शन्स निर्मित “कुंकू, टिकली आणि टॅटू” प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

विभा कुलकर्णी हे पुण्यातलं मोठं प्रस्थ आहे. बाईन बाई सारखं वागावं… आपल्या मर्यादेत रहावं अशी त्यांची भूमिका आहे. घरातील सुनाही विभाच्या शब्दाबाहेर नाहीत. त्यांनी आखून दिलेल्या चौकटीतच जगत आहेत. हे घर अत्यंत पारंपरिक पण प्रसंगी कर्मठ आहे. वडील, भाऊ, नवरा यांना समाधानात आणि सुखात ठेवण्याची जबाबदारी घरच्या स्त्रीवर आहे अशा विचारांवर उभं आहे. अशा घरामध्ये रमासारखी बिनधास्त, आताच्या युगातली कार्यक्षम, स्वाभिमानी आणि स्वावलंबी मुलगी सून म्हणून येते. रमाला बास्केटबॉल खेळायला आवडतं.

विभक्त कुटुंबातून आल्यामुळे रमाच्या मनामध्ये समस्त पुरुष जातीबद्दल आणि कुटुंब व्यवस्थेबद्दल नाराजी आहे. तिची स्त्री स्वातंत्र्याबद्दल ठाम मत आहेत. आता विभा आणि रमा या परस्परविरोधी विचारसरणी असलेल्या स्त्रिया एकमेकांसमोर येतील तेव्हा घराचे घरपण, कौटुंबिक जिव्हाळा, एकमेकांबद्दलचे प्रेम या दोघी कशा टिकवून ठेवतील? रमा आणि विभा याचा कसा समतोल साधतील? कुलकर्णी परिवार आणि विभा रमाला स्वीकारू शकतील का? रमाची आधुनिक विचारसरणी आणि कुलकर्ण्यांचा परंपरावाद यांच्या मेळ बसेल का? हे बघणे नक्कीच रंजक असणार आहे.

या मालिकेमध्ये गुरुराज अवधानी विष्णुपंत कुलकर्णी ही भूमिका साकारणार असून, सारिका निलाटकर- नवाथे विभा कुलकर्णी ही व्यक्तिरेखा साकारणार आहेत. यांच्यासोबत नवोदित भाग्यश्री न्हालवे, आदिश वैद्य, श्वेता पेंडसे, अमोल बावडेकर, राजेश देशपांडे, राजश्री निकम प्रमुख भूमिकेत असणार आहेत.

आपल्या भुमिकेबद्दल बोलताना सारिका निलाटकर नवाथे म्हणाल्या, “कुंकू, टिकली आणि टॅटू ही मालिका थोडी वेगळ्या ढंगाची आहे आणि माझी या मालिकेतील भूमिका थोडी वेगळीच आहे. मालिकेमध्ये मी विभा कुलकर्णी या नावाची भूमिका साकारणार आहे. विभा परंपरेला धरून चालणारी स्त्री आहे. या पात्राची काही तत्व, मूल्य आहेत जी आजच्या मुलांना बंधंन वाटू शकतात. तिच्या या तत्वांना तिचे स्पष्टीकरण आहे आणि त्यामुळे तिच्या बोलण्याचा हेतू लगेचच स्पष्ट होतो. घरामध्ये आलेली सून आणि विभा यांच्या विचारसरणीमध्ये खूप फरक आहे तेव्हा या कशा एकमेकींना समजून घेतील हे प्रेक्षकांनी बघण्यासारखे असणार आहे. मी या भूमिकेबद्दल खूपच उत्सुक आहे. आमची मालिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी आम्हाला खात्री आहे”. ही मालिका २ एप्रिलपासून सोम ते शनि रात्री ८.०० वाजता कलर्स मराठीवर पाहता येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2018 6:25 pm

Web Title: colors marathi new serial kunku tikli aani tattoo
Next Stories
1 पाकिस्तानमध्येही चालणार आर्ची- परश्याची जादू
2 मराठी विनोदी कलाकारांचा ‘एप्रिल फुल’ धमाका
3 ‘गोपी बहू’ला लाखोंचा गंडा
Just Now!
X