एका सामान्य घरातून आलेली मुलगी जी निसर्गाने सजवलेल्या गावात वाढली, हिरव्यागार रानात रमली, नदी काठावर खेळली, शुभ पावलांनी गावात आली आणि सगळ्यांची लाडकी झाली. पण, जिचा हात आईने ती लहान असताना सोडला आणि देवाघरी गेली अशी लक्ष्मी त्याक्षणीच पोरकी झाली. आईच्या नसण्यामुळे लक्ष्मीचं संपूर्ण भावविश्वच बदलून गेलं. परंतु, या परिस्थितीत तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती तिची आजी. लक्ष्मीची आजी तिला लहानपणापासून सांगत असे की, तुझ्या स्वप्नातला राजकुमार नक्की येईल, आणि तुझं आयुष्य प्रेमाने बहरुन टाकेल. तेव्हापासून लक्ष्मी त्या राजकुमाराची स्वप्न पाहत असते. जशी प्रत्येक मुलीची इच्छा असते की, तिला तिच्या स्वप्नातला राजकुमार मिळावा. आपल्याला आधार देणारा, आपल्यावर जीवापाड प्रेम करणारा व्यक्ती आपल्या आयुष्यात असावी अशी इच्छा लक्ष्मीचीदेखील आहे.
लक्ष्मीला तिचा राजकुमार मिळेल का ? लक्ष्मी जसं तिच्या घरातल्यांवर नि:स्वार्थीपणे प्रेम करते तिला असं नि:स्वार्थी प्रेम कधी मिळेल का?

निसर्गासारखी अवखळ, सगळ्यांवर नि:स्वार्थपणे प्रेम करणारी, बिनधास्त, स्वाभिमानी अशी लक्ष्मी. जिला मामाने जरी वाढवले असले तरी देखील त्याच्या नजरेत ती पांढऱ्या पावलांची झाली कारण तिचा जन्म होताच लक्ष्मीची आई जग सोडून गेली. यामुळे गावाला आपलीशी वाटणारी लक्ष्मी घरच्यांसाठी परकीच राहिली. गावामध्ये सगळ्यांचे प्रेम मिळवलेली लक्ष्मी घरामध्ये सगळ्यांची उपेक्षा आणि मामीचा जाच सहन करते आहे. पण, इतकं सगळ सहन करूनदेखील ती खंबीर आहे, ती रडत बसली नाही. अशा या निरागस, स्वछंदी लक्ष्मीच्या आयुष्यात मल्हार नावाचा मुलगा अनपेक्षितपणे येतो ज्याचं आरवी नावाच्या मुलीवर खुप प्रेम आहे.

आरवी डॉक्टर असून मल्हार परदेशी शिकून नुकताच गावी आला आहे जिथे त्यांचा वडिलोपार्जित दुधाचा व्यवसाय आहे. आरवी आणि मल्हार बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना ओळखत असून लवकरच ते लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. पहिल्याच मालिकेमधून अवघ्या महाराष्ट्राचे मनं जिंकलेली सुरभी हांडे मालिकेमध्ये आरवीची भूमिका साकारणार आहे. तर ओमप्रकाश शिंदे मल्हार आणि निवोदित समृद्धी केळकर ही लक्ष्मीच्या भूमिकेत दिसणार आहेत.

सिमेंट काँक्रीटच्या शहरात प्रेमाला तडे जातात पण अस्सल मातीतल्या प्रेमाचं तसं नसतं. त्याला निसर्गाची जोड असते आणि त्या हिरव्यागार निसर्गाने बांधलेले बंध तुटता तुटत नाहीत. गावामध्ये काही कामानिमित्त आलेल्या मल्हारची भेट लक्ष्मीशी होते आणि तिथून नियतीचा खेळ सुरु होतो. नियतीने आरवी, मल्हार आणि लक्ष्मी या तिघांसाठी काही वेगळेच लिहून ठेवले आहे. मल्हार आणि लक्ष्मी हे दोघे कुठल्या परीस्थीमुळे एकमेकांना भेटतात? हे तिघे एकमेकांच्या समोर आले तर काय होईल? हे पाहणे रंजक असणार आहे.

आयुष्यभर ओंजळीत निखारे आणि ओठी हसू घेऊन वावरणाऱ्या लक्ष्मीच्या नशिबी मल्हार खरोखर सुखाची चाहूल घेऊन येईल का? या सगळ्या निरुत्तरित प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहेत. दुसऱ्यांवर नि:स्वार्थपणे प्रेम करणारी लक्ष्मी आणि एकमेकांवर नि:स्वार्थी प्रेम करणारे मल्हार आणि आरवी भेटतील तेव्हा त्यांच्यात काय होईल ? हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका कॅम्स क्लब स्टुडीओ निर्मित “लक्ष्मी सदैव मंगलम्” १४ मेपासून सोम ते शनि संध्या. ७.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.