मराठी मनोरंजन वृत्तवाहिन्यांतील ‘कलर्स मराठी’ ही वाहिनी आता लवकरच ‘एचडी’ स्वरूपात ऑनएअर दाखल होणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. सध्या मराठीमध्ये हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच मनोरंजन वाहिन्या असून त्यापैकी ‘एचडी’ स्वरूपातील एकही वाहिनी नाही. त्यामुळे मराठी मनोरंजन वाहिन्यांत ‘कलर्स मराठी’ ही पहिली ‘एचडी’ वृत्तवाहिनी ठरणार असल्याचा दावा वाहिनीच्या सूत्रांकडून करण्यात आला.

गेल्या वर्षी २१ मार्च रोजी ‘ई टीव्ही मराठी’चे नामकरण ‘कलर्स मराठी’ झाले आणि वाहिनीचे संपूर्ण स्वरूप पालटविण्यात आले. वृत्त आणि मनोरंजन अशा स्वरूपात असणारी ‘ई टीव्ही मराठी’ ही वाहिनी ‘व्हायकॉम १८’ या माध्यम समूहाकडे गेल्यानंतर तातडीने ‘ई टीव्ही मराठी’चे आणि त्यातील कार्यक्रमांचे स्वरूप पूर्णपणे बदलण्यात आले.

मराठी मनोरंजन विश्वात अगोदरपासून भक्कमपणे पाय रोवून असलेल्या ‘झी मराठी’ आणि ‘स्टार प्रवाह’ या मनोरंजन वाहिन्यांच्या स्पर्धेत गेल्या वर्षी कलर्स मराठी दाखल झाले. या दोन वाहिन्यांच्या तोडीस तोड कार्यक्रम आणि रिअ‍ॅलिटी शो ‘कलर्स मराठी’ने सुरू  केले. या वर्षपूर्तीच्या निमित्ताने पुढचे पाऊल म्हणून ‘कलर्स मराठी’ ही वाहिनी संपूर्णपणे ‘एचडी’ करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

येत्या ८ एप्रिल रोजी गुढीपाडवा असून गेल्यावर्षी गुढीपाडव्याच्याच दिवशी ‘ई टीव्ही’ मराठीचे ‘कलर्स मराठी’ असे नामकरण झाले होते. त्यामुळे बहुदा यंदाच्या गुढीपाडव्यापासून (८ एप्रिल) ‘कलर्स मराठी’ ‘एचडी’ होणार असल्याची शक्यता आहे. ‘एचडी’ प्रसारणासाठी कलर्स मराठीने सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केली असून ‘एचडी’ प्रसारणामुळे ‘कलर्स मराठी’चे कार्यक्रम पाहताना प्रेक्षकांना एक वेगळा आनंद मिळेल, असा विश्वास वाहिनीच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे.