कलर्स मराठी वाहिनीवर येत्या रविवारी ‘लक्ष्मी सदैव मंगलम्’, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’, ‘घाडगे & सून’ आणि ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकांचे विशेष भाग प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मालिकेत प्रत्येक सण मोठ्या उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. मग दिवाळी असो वा दसरा असो.. यावेळेस मालिकेत मकर संक्रांत पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाणार आहे. हा विशेष भाग येत्या रविवारी म्हणजेच १३ जानेवारी रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ७ वाजल्यापासून दाखवला जाणार आहे.

बाळूच्या घरचे, पंच आणि गावातील सगळेच मकर संक्रांत पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरी करणार आहेत. ज्यामध्ये बाळूला तिळाचे तेल लावून तसेच तीळ घातलेल्या पाण्याने पहाटेची आंघोळ घातली जाणर आहे. गावातील सगळ्या बायका मिळून मंदिरात जाऊन देवीची पूजा करणार असून देवीला बोरं, उस, तिळगुळ, शेंगदाणे असा नैवेद्य दाखणार आहेत. गावामध्ये संक्रांतला मातीच्या भांड्यात दुध गरम करण्याची प्रथा असल्याने ते देखील रीतसर पार पाडले जाणार आहे. यानंतर गावातील बायका हळदी कुंकू साजर करणार असून एकमेकांना वाण देखील देणार आहेत. या सगळ्यामध्ये देवप्पा नक्की काय करणार, बाळू त्याची समजूत कशी घालणार हे बघणे रंजक ठरणार आहे.

‘घाडगे & सून’ मालिकेत घाडगे सदनमध्ये माईची चुलत सासू येणार आहे आणि त्यांच्या स्वागताची लगबग आता सुरु झाली आहे. कियारा आणि अक्षयचे लग्न झाले आहे याची माहिती येणाऱ्या पाहुण्याला नसल्याने पुन्हा एकदा साडी आणि मंगळसूत्र घातलेली अमृता प्रेक्षकांना दिसणार आहे. या नव्या पाहुण्याच्या येण्याने विभक्त झालेले घाडगे कुटुंब एकत्र येईल का, कोणाची मकर संक्रांत साजरी केली जाणार अमृता की कियारा, मकर संक्रांत निर्विघ्नपणे पार पडेल का हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ मालिकेत नुकतेच संयोगिता आणि मिलिंदचा लग्नसोहळा पार पडला. दुर्गा अनुवर नाराज आहे. दुर्गाला असे वाटते आहे की, तिने अनुला नोकरी न दिल्याने ती आता त्याचा सूड घेत आहे. यावरून दुर्गा अनुला बरेच ऐकवते. यामुळेच अनु आणि सिध्दार्थच्या मैत्रीमध्ये काही अडचणी तर येणार नाही ना, दुर्गा आणि अनुमध्ये झालेले गैरसमज कसे दूर होतील, हे गैरसमज दूर करायला सिद्धार्थ अनुला साथ देईल का हे बघायला विसरू नका.

‘लक्ष्मी सदैव मंगलम्’ मालिकेत आर्वीच्या अचानक जाण्याने घरामध्ये दु:खद वातावरण आहे. लक्ष्मी आणि मल्हार या दोघांना देखील घडलेल्या गोष्टीवर विश्वास बसत नाहीये. मल्हारला या गोष्टीची खात्री आहे की, आर्वी नक्कीच परत येईल. हे घडत असताना अक्कांचा भूतकाळ लक्ष्मीच्या समोर आला आहे. अक्कांचा नवरा दिवाकर जिवंत असून त्याची तब्येत खूपच खराब आहे आणि लक्ष्मी त्यांना मदत करत आहे. घरामध्ये कुणालाच माहिती नाही की लक्ष्मीला अक्कांच्या भूताकाळाबद्दल माहिती आहे. या सगळयामध्ये अजिंक्यचा पाठिंबा लक्ष्मीला मिळत आहे. लक्ष्मीची अशी इच्छा आहे कि, हे सत्य घरच्यांना कळावं. हे सत्य सगळ्यांसमोर आणण्यासाठी लक्ष्मीला अजिंक्यची मदत घेईल का, अजिंक्यच्या साथीने लक्ष्मी ठोस पाऊल उचलेल का हे येत्या महारविवारच्या विशेष भागात पाहायला मिळेल.