कलर्सचा रसोई की जंग मम्मियों के संग या नव्या टीव्ही शोला सुरूवात झाली असून प्रेक्षकांना हा कार्यक्रम पसंत पडत आहे. हा काही साधा कुकरी शो नसून यात काही ट्विस्ट असणार आहेत. या शोमध्ये टीव्ही स्टार्स आपल्या आईसोबत येणार असून, आईच्या मदतीने ते एकमेकांना आव्हान देणार आहेत. दोन स्टार्सपैकी या स्पर्धेत नेमकी कोण जिंकेल याचा निर्णय शेफ रणवीर ब्रार करेल.

या शोच्या पहिल्या फेरीत आई थेट मदत करु शकणार नाही पण ती आपल्या मुलाला वाढीव वेळ देण्यासाठी नक्कीच मदत करु शकते. तर दुसऱ्या फेरीत आई थेट मुलाला मदत करु शकते. पण त्यांना ठराविक वेळेत चविष्ट पदार्थ तयार करावा लागणार आहे.

या शोमध्ये करिश्मा तन्ना, माही विज, रश्मी देसाई, अली असगर, रागिणी खन्ना असे अनेक कलाकार आपआपल्या आईंसोबत येतील. शोचे हृत्विक धनजानी सूत्रसंचालन करत असून शोच्या पहिल्या भागात रश्मी देसाई आणि माही विज यांनी एकमेकींना टक्कर दिली होती. तर दुसऱ्या भागात रागिणी खन्ना येणार आहे.