News Flash

‘कलर्स मराठी’वर लग्नसोहळे

ऑनलाइन लग्नाच्या अनुभवातून आणि नाना अडचणीतून गेल्यानंतर आता खऱ्या अर्थाने शंतनूला शर्वरीची साता जन्मासाठी साथ मिळणार आहे.

‘शुभमंगल ऑनलाइन’ मालिकेमध्ये शंतनू आणि शर्वरी अखेर लग्नबंधनामध्ये अडकणार आहेत.

‘कलर्स मराठी’ वाहिनीवर येता आठवडा लग्न सोहळ्यांचा आहे. ‘बायको अशी हव्वी’ आणि ‘शुभमंगल ऑनलाइन’ या मालिकांमध्ये विवाह विशेष सप्ताह होणार आहेत. ‘शुभमंगल ऑनलाइन’ मालिकेमध्ये शंतनू आणि शर्वरी अखेर लग्नबंधनामध्ये अडकणार आहेत. दोघांचे लग्न पारंपरिक पद्धतीने पार पडणार असून प्रत्येक विधीला साजेसा असा उखाणादेखील ते घेणार आहेत. सप्तपदी जरा विशेष असणार आहे, कारण शंतनू शर्वरीला उचलून फेरे पूर्ण करणार आहे. ऑनलाइन लग्नाच्या अनुभवातून आणि नाना अडचणीतून गेल्यानंतर आता खऱ्या अर्थाने शंतनूला शर्वरीची साता जन्मासाठी साथ मिळणार आहे. तर ‘बायको अशी हव्वी’ मालिकेमध्ये विभास राजेशिर्के आणि जान्हवी सातारकर यांचे लग्न अतिशय साध्या पध्दतीने पार पडणार आहे. दोघांचाही अस्सल मराठमोळा, रांगडा बाज दिसून येणार आहे. पण जमिनीसाठी विभासने जान्हवीशी लग्न केलेले आहे हे सत्य अजूनही जान्हवीसमोर आलेले नाही. आता ते सत्य कधी समोर येणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.

परीक्षकांच्या भूमिकेत सारेगमपची पंचरत्ने

‘सा रे ग म प’च्या आजवरच्या प्रवासात अनेक पर्व गाजली. त्यात विशेष उल्लेख करावा लागेल तो १२ वर्षांपूर्वी झालेल्या ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’चा. अनेक गुणवान लिटिल चॅम्प्सच्या अफलातून सादरीकरणामुळे हे पर्व तुफान गाजलं. या छोट्या मुलांच्या गाण्यांना साथ होती ती म्हणजे कमलेश भडकमकर आणि त्यांचा वादक मित्रांची. या पर्वातील महाअंतिम फेरीत पोहोचलेली पंचरत्न म्हणजेच रोहित राऊत, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे आणि आर्या आंबेकर यांनी प्रेक्षकांची मनं तर जिंकलीच, पण या कार्यक्रमाने या पंचरत्नांना संगीत क्षेत्रात उतरण्यासाठी तयार केलं आणि त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली. आता हीच पंचरत्न सारेगमपच्या नव्या पर्वात परीक्षकांच्या भूमिके तून लोकांसमोर येणार आहेत. आता नवीन पिढीतून काही उमदा गायक – गायिकांना घडवण्याचा वारसा जपत जवळपास १२ वर्षांनी ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या पर्वात ही ‘पंचरत्नं’ छोट्या स्पर्धकांचं मोठं स्वप्न साकारण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. यासोबतच या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेत्री मृण्मयी देशपांडे करणार आहे. या पर्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यात कोणीही एलिमिनेट होणार नसल्याने छोट्या स्पर्धकांवर स्पर्धेतून बाहेर पडण्याचं दडपण नसणार आहे. तरी या छोट्या गायक मित्रमैत्रिणींना आपलं गाणं रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मेहनत घ्यावीच लागणार आहे. म्हणजेच या १४ छोट्या स्पर्धकांचा महाअंतिम सोहळ्यापर्यंतचा प्रवास अनोखा असणार आहे. ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ हा कदाचित मराठीतला एकमेव रिअ‍ॅलिटी शो असेल ज्यात एकही स्पर्धक महाअंतिम सोहळ्यापर्यंत स्पर्धेबाहेर जाणार नाही. महाराष्ट्रातील उत्तोमत्तम गायकांचा शोध या कार्यक्रमातून घेतला जातो. त्यामुळे लहानग्या गायकांसाठी ‘सा रे ग म प’ पुन्हा एकदा नवी उमेद घेऊन आलं आहे. ही बच्चेकंपनी पुढे संगीतक्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण करतीलच, ही ओळख आणि लिटिल चॅम्प्सचं मोठं स्वप्न साकारण्यासाठी झी मराठी आणि सारेगमपचा मंच सज्ज झाला आहे. २४ जूनपासून गुरुवार ते शनिवार दररोज रात्री साडेनऊ वाजता संगीताचं हे सुरेल पर्व अनुभवता येणार आहे.

 

‘गाथा नवनाथांची’चे शीर्षकगीत कैलाश खेर यांच्या आवाजात

कलियुगात जेव्हा मनुष्यावर असुरी शक्ती वरचढ होऊ लागली, तेव्हा मनुष्य कल्याणासाठी नवनारायणांनी नवनाथांच्या रूपात अवतार घेतला. दूरचित्रवाणीच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘सोनी मराठी’ वाहिनी नवनाथांवर मालिका घेऊन येत आहे. या मालिकेचे शीर्षकगीत प्रसिद्ध गायक कै लाश खेर यांनी गायले आहे. या मालिकेचे शीर्षकगीत गुरू ठाकूर यांनी लिहिले असून पंकज पडघण यांनी संगीतबद्ध केले आहे. प्रख्यात गायक कैलाश खेर यांच्या आवाजात हे शीर्षकगीत लोकांना ऐकायला मिळणार असून नवनाथांचा महिमा आणि त्यांची ख्याती या मालिकेबरोबरच या शीर्षकगीतामुळेसुद्धा लोकांपर्यंत पोहोचणार आहे. ‘गाथा नवनाथांची’ ही मालिका २१ जूनपासून दररोज संध्याकाळी साडेसहा वाजता दाखवण्यात येणार आहे.  आत्तापर्यंत गोष्टींच्या स्वरूपात वाचलेल्या किंवा ऐकलेल्या कथा प्रेक्षकांना या मालिकेतून दृश्य स्वरूपात पाहायला मिळणार आहेत. या मालिकेतून नवनाथांचा महिमा महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2021 12:06 am

Web Title: colors on marathi channel marriage shubhamangal online series akp 94
Next Stories
1 ‘लोक काय म्हणतील याची भीती उरलेली नाही’
2 सरसेनापती उमाबाई दाभाडे यांचे चरित्रपट उलगडणारा ‘भद्रकाली’ लवकरच…
3 चिंतन आणि मंथन
Just Now!
X