जागतिकीकरणोत्तर कालावधीत उपग्रह वाहिन्यांच्या दिमतीने कोणताही परदेशी चित्रपट, टीव्ही मालिका किंवा गाण्याचा व्हिडीओ आपल्या भारतीयांसाठी पर्यटनानुभवासारखा बनला होता. अमेरिकी-ब्रिटिश सिनेमांत चित्रीकरण करण्यात आलेल्या परिसराचा फेरफटका वास्तव आयुष्यात अशक्य असलेल्या लक्षावधी लोकांसाठी देशाटन करून देणारा होता. आजही अमेरिकेला न जाता तेथल्या विविध राज्यांचा दार्शनिक तपशील तेथे चित्रित झालेल्या सिनेमांमध्ये पाहून उमजू शकतो. पूर्वीपासूनच परदेशात चित्रित झालेल्या भारतीय सिनेमांतील गाणी आणि तेथे ‘भारतीय माती’ वगैरे घेऊन जाणाऱ्या व्यक्तिरेखांच्या संस्कृतीचिवट सिनेमांमध्ये त्या त्या देशांचे स्थलमाहात्म्य जाणूनबुजून आणण्याचा अट्टहास राहिला आहे.(आठवा राज कपूर-अमिताभपासून ते शाहरूख खान-रणबीर कपूरचे चित्रपट) म्हणजे लोकप्रिय भारतीय तारे-तारकांच्या गोष्टी आणि घटनाप्रधान सिनेमांमध्ये हा भाग प्रेक्षकाला दुय्यम वाटत असला, तरी घटनांमध्ये असलेल्या देखण्या दृश्यांचा अंतर्भाव चित्रपटात महत्त्वाचाच असतो.

आवाढव्य उद्याने, गगनचुंबी इमारती आणि स्थापत्यकलेचे विविध नमुने यांना चित्रपटाच्या दुय्यम स्थानातून पहिल्या स्तरावर आणून चित्रपटातील एखाद्या व्यक्तिरेखेसारखे वागविणारा एक चित्रपट गेल्या वर्षभरात बराच चर्चेत राहिला. आधुनिक  स्थापत्यकलेचे अचाट आणि अफाट नमुने दाखविणारा हा सिनेमा अमेरिकेतील कोलंबस शहरातील महत्त्वपूर्ण वास्तूंच्या सान्निध्यात घडणाऱ्या मानवी घटनांना कवेत घेतो. दर्शकाला प्रचंड दृश्यश्रीमंत बनवतो.

कोगोनाडा नावाचा कोरियाई-अमेरिकी व्हिडीओ निबंधकार आहे. त्याचे चित्रकर्त्यांवरचे अनेक व्हिडीओ निबंध यूटय़ूब या माध्यमावर उपलब्ध आहेत. हिचकॉकच्या सिनेमांमधील व्यक्तिरेखांचे वटारलेले डोळे किंवा रिचर्ड लिंकलेटरपासून कित्येक दिग्गज चित्रकर्त्यांच्या सिनेमांची वैशिष्टय़े मांडणाऱ्या त्याच्या चित्रफिती सिनेअभ्यासकांच्या वर्तुळात लोकप्रिय आहेत. व्हिडीओ निबंध तयार करता त्याने अमेरिकेतील कोलंबस, इंडियाना शहरातील आधुनिक स्थापत्यशास्त्राचा अभ्यास केला.

‘कोलंबस’ या सिनेमातून त्या अभ्यासाचे सिनेरूप तरलपणे विशद झाले आहे. चित्रपटाच्या सुरुवातीच्या पाच ते दहा मिनिटांमध्ये मानवी व्यक्तिरेखांऐवजी शहरांतील सार्वजनिक वाचनालय, कंपन्यांचा परिसर, रुग्णालये आदी विविध आधुनिक वास्तूंचे आवाढव्य आणि देखणे रूप समोर येते. अन् त्यात एक गोष्ट सुरू होते या वास्तूभोवती कोसळणाऱ्या एका व्यक्तीमुऴे कोलंबस चित्रपटात संयतपणा आणि वास्तुदर्शनाची असोशी असली, तरी तो नुसता माहितीपट ठरत नाही. चित्रपटाच्या सुरुवातीला बलाढय़ वास्तूसमोर कोसळलेली व्यक्ती  कोरियाई वंशाची प्रसिद्ध अमेरिकी वास्तुविशारद असते. दुसऱ्या क्षणाला रुग्णालयाच्या वास्तूमध्ये ती दाखल होते आणि दक्षिण कोरियामधून त्या व्यक्तीचा मुलगा जिन  (जॉन चो) दाखल होतो. आपल्या वडिलांच्या विद्यार्थिनीपैकी असलेल्या एलेनॉर (पार्कर पोझी) त्याची घरातील आणि रुग्णालयातील व्यवस्था पाहते. दक्षिण कोरियामध्ये इंग्रजी पुस्तकांचा अनुवाद करण्यात रमलेला जिन अमेरिकेत नाखुशीने परतलेला असतो. मरणासन्न अवस्थेत गेलेल्या वडलांशी अन् अमेरिकेशी आधीच नाळ तुटलेल्या या अर्धलेखकाला पुस्तकांचे काम असल्याने  परतायचे असते. मात्र वडिलांच्या मृत्यूसमयी त्यांच्यासोबत राहण्याची परंपरा पाळण्याखातर तो अमेरिकेत अडकून पडतो. त्याच्या परिसर पाहणीत केसी (हेली ल्यू रिचर्डसन) या तरुणीशी त्याची ओळख होते. केसी ही कोलंबस शहरात केवळ आपल्या ड्रग्ज अ‍ॅडिक्ट आईमुळे अडकलेली असते. स्थापत्यशास्त्राचे ज्ञान आणि अफाट आवड असलेल्या या तरुणीचे शहरातील इमारतींशी नाते जुडलेले असते. आईच्या देखभालार्थ शिक्षण घेऊनही ती त्याचे काही करीत नाही. सार्वजनिक वाचनालयातील अल्पकालीन नोकरी आणि व्यसनापासून सुधरत चाललेल्या आईची जमेल तितकी सोबत यात तिची दिनचर्या संपणारी आहे.

केसी आणि जिन यांच्यातील मैत्रीसंवाद प्रेम चित्रपटाच्या ठोकताळ्यांना हरताळ फासणारा आहे. क्युबरिक, रिचर्ड लिंकलेटरपासून कोरियन दिग्दर्शकांची मोठी फळी प्रभावाचा भाग असलेल्या कोगोनाडाने या चित्रपटात आपल्यावरील कित्येक प्रभावळींचा वापर करीत या शहरांतील वास्तुमाहात्म्याचा सुंदर आढावा घेतला आहे.

वास्तूंची लांबलचक दृश्ये आणि केसी, जिन यांच्या आयुष्यात घडत जाणाऱ्या संयत घटनांचा परिपाक  म्हणजे हा चित्रपट. सुरुवातीच्या दहा मिनिटांत चित्रपट पकड घेण्यास कठीण वाटतो. मात्र तेवढा काळ एकाग्र केल्यास या चित्रपटातील गोम लक्षात यायला  लागते. देखण्या इमारतींच्या शैलीदार नक्षी आणि सजावट डोळ्यांची पारणे फेडतात. हेली ल्यू रिचर्डसन हिने या भूमिकेत जीव ओतला आहे.  जॉन चो या अभिनेत्याची ही उत्तम गंभीर  भूमिका आहे. पारंपरिक नायक-नायिका वळणावर न जाता, या चित्रपटातील संवाद आणि दृश्यसंवाद प्रेक्षकाला आकर्षित करणारा आहे. संयत चित्रपटातील उत्तम नाटय़ दृश्यश्रीमंत बनत अनुभवायचे असेल, तर या चित्रपटाला नजीकच्या काळात तरी दुसरा पर्याय नाही.