कपिल शर्मा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या बेताल वागणुकीमुळे चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वीच फराह खानने कपिलवर नाराजी व्यक्त केली होती. ‘फिरंगी’ या आगामी चित्रपटाच्या खास स्क्रीनिंगचे निमंत्रण कपिलने व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे दिले होते. त्याची ही कृती फराहला मुळीच भावली नाही. त्यामुळे तिने ट्विटच्या माध्यमातून त्याच्यावर नाव न घेता नाराजी व्यक्त केली होती.

तिच्या या ट्विटला कपिलने उत्तर दिले आहे. माध्यमांच्या प्रश्नांची उत्तरं देत कपिलने आपली प्रतिक्रिया दिली. ‘गुरुवारी माझ्या चित्रपटाचे स्क्रीनिंग होते. त्यामुळे मला योग्य वाटले त्या पद्धतीने मी चित्रपटसृष्टीतील माझ्या मित्रमंडळींना आमंत्रित केले. त्या स्क्रीनिंगला चित्रपटाची संपूर्ण टीम आणि माझा मित्रपरिवार उपस्थित होता. माझी अशी आशा आहे की, चित्रपटसृष्टीतील कथित प्रतिष्ठीत व्यक्ती हा चित्रपट नक्कीच पाहतील. कपिलने दिेलेले हे उत्तर ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या.

आपल्याकडून झालेली चूक कबूल न करता उलटपक्षी आपण जो विचार केला तो योग्यच होता, असे म्हणत कपिलने पुन्हा एकदा अनेकांचे लक्ष वेधले आहे. किंबहुना कथित प्रतिष्ठीत लोक म्हणून त्याच्या बोलण्याचा रोख नेमका कोणाकडे होता हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करुन गेला.
‘प्रिमिअर, प्रिव्ह्यू किंवा पार्टीचे आमंत्रण मला सामान्यांप्रमाणे व्हॉट्सअॅप मेसेजवर पाठवू नका. हा मेसेज पाठवून तुम्ही माझ्यावर उपकार करत नाही आहात. निदान तुम्ही एक फोन तरी करूच शकता. त्यासाठीही जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुमच्या स्क्रिनिंगला यायला माझ्याकडे वेळ असेल असे तुम्हाला वाटते का?,’ असे ट्विट तिने केले होते. गेल्या काही दिवसांपासून फराह आणि विनोदवीर कपिलमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. हे पाहता तिच्या ट्विटला कपिलने उपरोधिक शैलीत उत्तर दिल्याचे म्हटले जातेय.

वाचा : ‘जब वी मेट’मधील गीतचा प्रियकर आठवतोय…

कपिलवर फराहने व्यक्त केलेली नाराजी पाहता याच ठिकाणी जर शाहरुखने तिला आमंत्रित केले असते तर तिने नाराजी व्यक्त केली नसती. पण, कपिल सध्या अडचणीच्या प्रसंगांचा सामना करत असल्यामुळे त्याच्यावर अनेकांनीच निशाणा साधण्यास सुरुवात केल्याचे त्याच्याशी संलग्न सूत्रांनी म्हटले आहे.