विनोदवीर कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यात झालेल्या वादामुळे सध्या कलाविश्वात विविध चर्चांना उधाण आले आहे. कपिल आणि सुनीलचे व्यासपीठावरील खेळीमेळीचे नाते पाहता त्यांच्यात वाद झाल्याच्या चर्चांवर अनेकांचा विश्वासच बसला नव्हता. पण, सदर घटनेनंतर कपिलने केलेल्या फेसबुक पोस्टने अनेकांचेच लक्ष वेधले. पाच वर्षांत आपण पहिल्यांदाच सुनीलवर इतक्या मोठ्याने ओरडलो असल्याचे म्हणत कपिलने झाल्या घटनेबद्दल त्याची भूमिका स्पष्ट केली आहे.

‘मी सुनीलचा आदर करतो. हो, आमच्यात काही कारणास्तव खटके उडाले… पण, आम्ही सर्वसामान्य व्यक्ती नाही का? गेल्या पाच वर्षांत मी पहिल्यांदाच त्याच्यावर इतक्या मोठ्याने ओरडलो. एवढं तर चालतं… आमच्यात जे काही मतभेद आहेत त्यावर आम्ही बसून तोडगा काढू. एक व्यक्ती म्हणून आणि एक कलाकार म्हणून मी त्याचा (सुनीलचा) नेहमीच आदर करतो’, असे कपिलने त्याच्या एफबी पोस्टमध्ये लिहिले आहे. त्यासोबतच हे आमचे कौटुंबिक प्रकरण असून, सर्वकाही लवकरच पूर्वपदावर येईल, असेही त्याने स्पष्ट केले.

गेल्या काही दिवसांपासून विनोदवीर कपिल शर्मा सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. नुकताच त्याने प्रेयसी गिन्नी छत्राथसोबतचा एक फोटो पोस्ट करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. दरम्यान, गिन्नीसोबतचा त्याचा फोटो व्हायरल होतो ना होतो तोच कपिल आणि सुनीलमध्ये झालेल्या वादाने जोर धरला. ऑस्ट्रेलियाहून मुंबईत येणाऱ्या विमानात कपिल त्याच्या पूर्ण चमूसह प्रवास करत होता. त्यावेळी कपिल सर्वांसमोर सुनीलवर ओरडला तसेच त्याने रागात त्याच्यावर हातही उचलला होता, असे म्हटले जात आहे. त्यावेळी विमानात प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने सांगितलेले की, ‘काहीही कारण नसताना कपिल, सुनीलवर आक्रमक झाला. तो सुनीलला जोरजोरात ओरडून शिव्या देत होता. कदाचित ओरडून झाल्यावर कपिल शांत बसेल असा विचार करुन सुनील मात्र शांत होता.’

दरम्यान, झाल्याप्रकरणी माध्यमांशी बोलताना कपिल म्हणाला, ‘मला काहीच आठवत नाहीये. तसं पाहायला गेलं तर प्रत्येक विमान प्रवासादरम्यान आमच्यात वाद होतच असतो. बहुदा प्रत्येक ठिकणी आम्ही भांडतच असतो. पण, आमचं हे भांडण काही गंभीर स्वरुपाचं नसतं. आम्ही भांडतो… आम्ही चांगल्या कामासाठी भांडतो’. झाल्या घटनेबद्दल कपिलने त्याची बाजू मांडली असली तरीही सुनील ग्रोवरने याबाबत शांत राहणे पसंत केले आहे. त्यामुळे आता या प्रकरणी सुनील ग्रोवर काय प्रतिक्रिया देणार आणि त्याचा कपिलच्या कार्यक्रमावर काय परिणाम होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.