गुरमीत राम रहिम सिंग यांना गेल्या आठवड्यात बलात्काराच्या प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवले. त्याच प्रकरणात पुढील निकाल आला असून, त्यांना बलात्कार आणि लैंगिक शोषणाप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने २० वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर, सोशल मीडियावरही याच विषयीच्या चर्चांना उधाण आलं. या चर्चेत आता कॉमेडियन किकू शारदानेही उडी घेतली.

काही वर्षांपूर्वी किकू शारदाने डेरा प्रमुख बाबा राम रहिम यांची एका कार्यक्रमादरम्यान नक्कल केली होती. त्यानंतर त्याला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला होता. किंबहुना त्यामुळे किकूला कारावासाची शिक्षाही झाली होती. ते प्रकरण शमलं असतानाच सध्या सुरु असणाऱ्या बाबा राम रहिमच्या चर्चांमध्ये आता किकूच्या एका ट्विटची भर पडली आहे.

अभिनेत्री ट्विंकल खन्नाच्या ब्लॉगमधून या साऱ्याची सुरुवात झाली. ‘राम रहिम यांचे हिंसाचार करणारे समर्थक माणुसकीच विसरले आहेत. आपल्या देशात जितके खड्डे आहेत तितकेच बाबा आहेत. एखादा बाबा चुकीचा आहे समजल्यानंतर आपण दुसऱ्या बाबाकडे पळतो. असे लोक सूर्यप्रकाशाकडे वळलेल्या त्या सूर्यफुलांसारखेच असतात’, असं तिने ब्लॉगमध्ये लिहिलं होतं. त्यासोबतच तिने ‘बाबा राम रहिम यांची नक्कल केल्याने कीकू शारदाला तुरुंगात जावं लागलं होतं’, याची आठवण करुन देत त्याला चायनीज रेस्तराँमध्ये जाऊन ‘एमएसजी’ म्हणजेच ‘मोनोसोडियम ग्लुटामेट’ नसलेलं शेजवान चिकन ऑर्डर करण्याचा सल्लाही दिला. तिचा हा सल्ला किकूने गांभीर्याने घेत, एक ट्विट केलं. ज्यामध्ये त्याने एका चायनीज रेस्तराँमधील फोटो पोस्ट करत, ‘मी अतिशय शांत वातावरणात ‘मोनोसोडियम ग्लुटामेट’ म्हणजेच ‘एमएसजी’ नसलेले चायनीज पदार्थांचा आस्वाद घेतोय’, असं ट्विट केलं.

किकूच्या या ट्विटचा उद्देश काय होता आणि त्याला नेमकं काय म्हणायचं होतं हे सर्वांसमोर स्पष्ट झालंच आहे. कारण, त्याने या ट्विटमध्ये ट्विंकललाही टॅग केलंय. मुख्य म्हणजे नाव न घेता ट्विंकल आणि किकूने राम रहिमवर टीका केली. किकूच्या या ट्विटनंतर कॉमेडियन चंदन प्रभाकरसह अनेकांनीच त्यावर बऱ्याच प्रतिक्रियाही दिल्या. दरम्यान, ‘किकू जी राम राम’, असं म्हणत चंदननेही उपरोधिकपणे ट्विट केल्याचं पाहायला मिळालं.

वाचा : अक्षयसोबत प्रियांकाचं नाव जोडताच ट्विंकलचा राग अनावर