स्टँड अप कॉमेडियन सिद्धार्थ सागर गेल्या चार महिन्यांपासून बेपत्ता असल्याची चर्चा कालपासून पाहायला मिळाली. ‘सेल्फी मौसी’ म्हणून ओळखला जाणारा सिद्धार्थ गेल्या चार महिन्यांपासून कोणत्याच कार्यक्रमात झळकला नव्हता. त्याच्या एका मैत्रिणीने फेसबुक पोस्टद्वारे त्याला शोधण्यात मदत करण्याची विनंती केली होती. यानंतर आता सिद्धार्थने आज (शुक्रवार) इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. मी सुरक्षित ठिकाणी असून २-४ दिवसांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन सर्व माहिती देईन, असं त्याने व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट केलं आहे.

‘सिद्धार्थ सागर ऑफिशियल’ या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. ‘माझ्या मित्रांकडून मला सतत फोन येत होते. मी ठीक आहे की नाही हे वारंवार ते विचारत होते. मी सध्या बऱ्याच अडचणींचा सामना करतोय. कुटुंबीयांसोबत माझे काही वाद सुरू आहेत. माझा मानसिक छळ करण्यात आला आहे. आता मी ज्यांच्याकडे आहे, त्यांनी मला खूप साथ दिली आहे. दोन-तीन दिवसांत मी प्रसारमाध्यमांसमोर येऊन सर्व हकीगत सांगणार आहे. माझ्यासोबत नेमकं काय घडलंय हे सर्व मी सांगेन. माझ्याबद्दल अनेकांनी काळजी व्यक्त केल्याने मला हा व्हिडिओ पोस्ट करावा लागत आहे,’ असं त्याने म्हटलं.

https://www.instagram.com/p/Bg7GDT1HLFX/

टेलिव्हिजनवरील बऱ्याच कॉमेडी शोमध्ये झळकलेल्या सिद्धार्थने कृष्णा अभिषेक, सुदेश लेहरी यांच्यासोबत स्टेज शेअर केला आहे. ‘कॉमेडी सर्कस’, ‘लाफ्टर के फटके’, ‘कॉमेडी सर्कस के अजुबे’ यांसारख्या कार्यक्रमांमुळे तो घराघरात पोहोचला. ‘सेल्फी मौसी’ या भूमिकेतून त्याने प्रेक्षकांची दाद मिळवली आहे.

https://www.instagram.com/p/BXW9pRiDF0H/

वाचा : रणबीरमुळे कतरिना- आलियाच्या मैत्रीत फूट?

सिद्धार्थच्या एका मैत्रिणीने फेसबुकवर त्याचे फोटो पोस्ट करत त्याला शोधण्यासाठी मदत करण्याची विनंती केली होती. गेल्या चार महिन्यांपासून तो बेपत्ता असून १८ नोव्हेंबर २०१७ रोजी त्याला अखेरचं पाहिलं होतं, असं तिनं त्यात म्हटलं होतं. त्यानंतर अनेकांनीच त्याच्याविषयी चिंता व्यक्त केली होती.