टेलिव्हिजन विश्वात विनोदाची परिभाषा बदलत त्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्यामध्ये कपिल शर्मा, सुनील ग्रोवर या कलाकारांचा मोलाचा वाटा आहे. पण, या विनोदवीरांचा खेळ रंगलेला असतानाच एका वादामुळे त्यांच्या नात्यात मीठाचा खडा पडला आहे. कपिल- सुनीलच्या नात्यात दुरावा येऊन आता जवळपास एक महिना उलटला आहे. या महिनाभरात दोन्ही कलाकारांनी बऱ्याच चर्चांचा, आरोप-प्रत्यारोपांचा सामना केला. या पार्श्वभूमीवर एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सुनील ग्रोवरने त्याचं मत मांडलं आहे.

‘मी इथे भांडण करण्यासाठी किंवा वाद घालण्यासाठी आलेलो नसून काम करण्यासाठी आलो आहे. मला फक्त प्रेक्षकांचं मनोरंजन करायचं आहे. (माझ्यासोबत) जे काही घडलं ते दुर्दैवी होतं. माझी तर ‘इमर्जन्सी लॅण्डिंग’ झाली’, असे सुनीलने म्हटले.

कपिल शर्मासोबत झालेल्या वादानंतर सुनीलसोबतच अली असगर, चंदन प्रभाकर, सुगंधा मिश्रा या कलाकारांनीही ‘द कपिल शर्मा शो’कडे पाठ फिरवली. कपिलच्या या हुकमी एक्क्यांनी शोकडे पाठ फिरवल्यानंतर प्रेक्षकांनीही त्याच्या कार्यक्रमाकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात करत इतर कार्यक्रमांकडे आपला मोर्चा वळवला. याचेच पडसाद टीआरपी रेटींगमध्ये उमटल्याचं पाहायला मिळालं. कपिलच्या शोच्या घसरलेल्या टीआरपी रेटींगबद्दल सांगताना सुनील म्हणला, ‘टीआरपी रेटींगवर कोणाचाही ताबा नसतो. मीसुद्धा एक कार्यक्रम (मेड इन इंडिया) केला, त्या बाबतीतही असंच झालं. माझा कार्यक्रम टीआरपी रेटींगच्या अपेक्षा पूर्ण करु शकला नाही. जर माझ्याकडून ते शक्य झालं असतं तर मी आता दहा शो करत असतो.’ सुनीलचं हे वक्तव्य कपिलला निशाणा करणारं नसलं तरीही एका अर्थी त्याने स्वत:ची, पर्यायी प्रत्येक कलाकाराची बाजू मांडत परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न केला आहे, असंच म्हणावं लागेल.