16 December 2017

News Flash

सुनील-कपिलच्या वादावर पडदा?

सध्या सुनील लाइव्ह शोमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: April 21, 2017 6:02 PM

कॉमेडियन सुनील ग्रोवर आणि कपिल शर्मा यांच्यात एका वादामुळे दुरावा आला आणि या दोन्ही कलाकारांनी एकमेकांपासून चार हात लांब राहणं पसंत केलं. सुनील ग्रोवरने ‘द कपिल शर्मा शो’ सोडण्याचा निर्णय घेतला. पण, त्याच्या या निर्णयानंतर कपिलने मात्र इतर कलाकारांच्या साथीने तो कार्यक्रम सुरु ठेवत प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचे काम सुरुच ठेवले. कपिलप्रमाणेच सुनील ग्रोवरनेही लाइव्ह शोमध्ये ‘रिंकू भाभी’ आणि ‘डॉ. मशहूर गुलाटी’ या धमाल व्यक्तीरेखा साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

सध्या सुनील परदेशातही लाइव्ह शो करत असून त्याच्या अनोख्या विनोदी शैलीने सर्वांचीच मनं जिंकत आहे. अशाच एका शोच्या निमित्ताने सध्या दुबईला रवाना झालेल्या सुनीलने तेथील प्रसिद्ध वृत्तपत्राला दिलेल्या माहितीत कपिलबद्दलचे त्याचे मत मांडले. कपिल एक उत्तम कॉमेडियन असल्याचे म्हणत सुनीलने त्याचे तोंड भरुन कौतुक केले. कपिलबद्दल सुनीलने केलेले हे वक्तव्य पाहता अनेकांच्याच भुवया उंचावल्या असून, या दोघांमधील वादावर पडदा पडल्याचा अंदाजही बऱ्याचजणांनी वर्तवला आहे.

दरम्यान, या दोन्ही कॉमेडियन्सकडून त्यांच्यात झालेल्या वादाविषयी फार काही वाच्यता करण्यात आली नाहीये. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमाच्या सादरीकरणानंतर ऑस्ट्रेलियाहून परतत असताना विमानप्रवासादरम्यान कपिल आणि सुनीलमध्ये वाद झाला होता. त्यांचा हा वाद इतका विकोपास गेला की, कपिल शर्मा सुनीलच्या अंगावर धावून गेला. सहकलाकारांसोबतचे गैरवर्तन आणि झालेला अपमान या सर्व कारणांमुळे सुनील ग्रोवरने कपिलच्या शोला रामराम ठोकला. सध्या तो लाइव्ह परफॉर्मन्सेसवर जास्त लक्ष देत आहे. त्यासोबतच एका न्यूज अॅपसाठी तो आणि सनी लिओनी क्रिकेट कॉमेन्ट्रीसुद्धा देत आहेत.

वाचा – IPL 2017 : आयपीएल सामन्यांना सुनील-सनीच्या ‘मसाला कॉमेन्ट्री’ची फोडणी

First Published on April 21, 2017 5:53 pm

Web Title: comedian sunil grover praises kapil sharma calls him a great comedian