आपल्या अनोख्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या जॉनी लिवर यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. जॉनी प्रकाश असं त्यांचे खरं नाव. पण, प्रेक्षकांनी त्यांना पसंती दिली ती म्हणजे जॉनी लिवर याच नावाने. भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिले स्टॅण्डअप कॉमेडियन म्हणून नावाजलेल्या या कलाकाराने आतापर्यंत ३०० हून जास्त चित्रपटांमध्ये काम केले असून, त्यांना बऱ्याच पुरस्कारांनीही गौरविण्यात आले आहे.

सुरुवातीच्या काळात जॉनी लिवर यांनी इतरांच्या नकला करण्यास सुरुवात केली. हिंदुस्तान लिवरच्या कारखान्यातून त्यांच्या या प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरवात झाली होती. इथूनच त्यांना पुढे स्टेज शो करण्याची संधी मिळाली. त्यादरम्यानच अभिनेता सुनील दत्त यांनी लिवर यांच्यातील कलाकाराला हेरत त्यांना ‘दर्द का रिश्ता’ या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. या चित्रपटापासून सुरु झालेला त्यांचा प्रवास अद्यापही सुरुच आहे. काही चित्रपटांमध्ये ते सहाय्यक अभिनेत्याच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आले. मुख्य म्हणजे आपल्या अफलातून विनोदी शैलीने ते मुख्य अभिनेत्यालाही चांगलीच टक्कर देत होते.

‘बाजीगर’, ‘खिलाडी’, ‘जुदाई’, ‘लव्ह के लिए कुछ भी करेगा’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या होत्या. विनोदी कलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत नावारुपास आलेल्या जॉनी लिवर यांच्या समोर एक असा प्रसंग उद्भवला होता ज्यामुळे त्यांना सात दिवस तुरुंगवास झाला होता असं म्हटलं जातं. १९९८ मध्ये तिरंग्याचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आल्यामुळे त्यांना तुरुंगात जावं लागलं होतं.

आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक चढ – उताराचा सामना करत जॉनी लिवर यांनी यश संपादन केलं होतं. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी चित्रपटसृष्टीपासून दूर राहण्यास प्राधान्य दिलं. पण, येत्या काळात रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘गोलमाल अगेन’ या चित्रपटातून ते पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जात आहे. आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनात जागा बनवणाऱ्या जॉनी यांची मुलगी जेमी लिवरसुद्धा स्टॅण्डअप कॉमेडियन आहे. गेल्या काही दिवसांपासून जेमी सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. त्यामुळे आपल्या वडिलांचा वारसा ती पुढे नेत आहे असं म्हणायला हरकत नाही.