|| रेश्मा राईकवार

विनोदी अभिनयातही आपली एक वेगळी शैली निर्माण करत ती आजवर टिकवून ठेवलेल्या कलाकारांमध्ये अशोक सराफ हे नाव कायम अग्रणी राहील. त्यांना विनोदी अभिनेता या एका साच्यात बसवणे योग्य नाही, मात्र विनोदी संवादफे क, अभिनयात त्यांच्याएवढी हुक मत असणारे कलाकार हाताच्या बोटांवर मोजण्याएवढे आहेत. मराठी रंगभूमीपासून सुरू झालेला अशोक सराफ यांचा अभिनय प्रवास अजूनही थांबलेला नाही, उलट आता विनोदी भूमिकांपुरते मर्यादित न राहता अभिनयाचे वेगळे पैलू दाखवणाऱ्या भूमिका आवर्जून कराव्याशा वाटतात, अशी भावना ते व्यक्त करतात. शुक्रवारी, ४ जून रोजी या दिलखुलास व्यक्तिमत्त्वाच्या अभिनेत्याने वयाच्या पंचाहत्तरीत प्रवेश के ला आहे.

गेली पन्नास वर्षं ते हिंदी-मराठी चित्रपट-मालिका क्षेत्रात यशस्वी अभिनेते म्हणून वावरले आहेत. मात्र गेल्या काही वर्षांत खरोखरच वेगवेगळे विषय चित्रपट आणि मालिकांमधून हाताळले जात आहेत, याबद्दल त्यांना आनंद वाटतो. आताच्या कलाकारांना त्यामुळे चांगलं काम करण्याची संधी मिळते आहे, असं त्यांना वाटतं. खूप वेगवेगळे विषय चित्रपटांमधून पाहायला मिळतात, आपल्याकडचे कलाकारही त्याच ताकदीचे आहेत. मात्र हे विषय चांगले असले तरी ते चित्रपटांमधून नीट मांडले गेले पाहिजेत, अशी अपेक्षा ते व्यक्त करतात. ‘विनोदी आशय लोकांना आवडतोच. त्यामुळे विनोदी चित्रपट, मालिका चालणार यात शंका नाही. मी जेव्हा विनोदी भूमिका क रत होतो, तेव्हा त्या विनोदाला एक लय असायची, वेग असायचा, हावभाव असायचे. आताचा विनोद पूर्णपणे बदलला आहे. नुसतीच अ‍ॅक्शन राहिली आणि सतत पंचेस घेतले जातात. विनोदात आता के वळ पंचच उरले आहेत असे वाटत राहते. तरी ‘हास्यजत्रा’सारख्या एखाद्या कार्यक्रमात काही कलाकार उत्तम विनोद सादर करतात, मी आवर्जून तो कार्यक्रम पाहतो, असं अशोक सराफ सांगतात.

इतक्या वर्षांनंतरही आपल्याक डून विनोदी अभिनयाची अपेक्षा के ली जाते. त्याबद्दल त्यांची तक्रार नाही, मात्र बदलत्या काळाचं भानही ठेवलं पाहिजे, असं ते म्हणतात. मी तरुण असताना ज्या पद्धतीने विनोदी भूमिका के ल्या त्या लोकांना आवडल्या, पण आता माझ्या वयानुसार विनोदी भूमिका लिहिल्या गेल्या पाहिजेत. सध्या विनोदाशिवाय वेगळं काही करून पाहण्यावर भर आहे, चांगलं विनोदी काही आलं तर नक्की करेन, असंही ते सांगतात.

रंगभूमीवर प्रॉम्प्टिंगचं काम करता करता त्यांना व्यावसायिक नाटकात बदली कलाकार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. बेळगावात त्यांनी १९६७ साली ‘ययाति आणि देवयानी’ नाटकाचा पहिला प्रयोग के ला. या पहिल्याच प्रयोगाला त्यांना भरभरून दाद मिळाली. त्यावेळी मास्टर दत्ताराम, रामदास कामत यांच्यासारखे मोठमोठे कलाकार होते. आताच्या कलाकारांना मोबाइलवर किं वा टीव्हीवर हवं ते नाटक, चित्रपट, वेबमालिका पाहण्याची संधी आहे. निरीक्षणाची संधी आहे. आमच्यावेळी नाटक पाहणं हेच एक महत्त्वाचं साधन होतं. रंगभूमीवर इतर कलाकार कशा पद्धतीने काम करतात, त्यांची संवादफे क, देहबोली कशी आहे याचे निरीक्षण करतच आम्ही शिकत गेलो. त्यामुळे नाटकातून चित्रपटात येताना उडालेली आपली धांदलही त्यांनी सांगितली. नाटक क रत असताना गजानन जहागिरदार यांच्या ‘दोन्ही घरचा पाहुणा’ चित्रपटात एक छोटेखानी भूमिका करण्याची संधी त्यांच्याक डे चालून आली. रंगभूमीवरचा कलाकार असल्याने चोख संवाद आणि अभिनयाची सवय, त्यामुळे त्यांना भीती वाटली नाही. पण अर्थातच रंगभूमीवर थोड्या भडक पद्धतीच्या अभिनयाची सवय असल्याने चित्रपटातही ते त्याच पद्धतीने लोकांसमोर आलं होतं. चित्रपट पाहिल्यानंतर नेमकी चूक लक्षात आली. मग नंतर कॅ मेऱ्याचं तंत्र माहिती करून घेतलं पाहिजे, असं ठरवल्याचं ते सांगतात. पुढची चार वर्षं त्यांनी कॅ मेरा माध्यम समजून घेतलं, कॅ मेऱ्यापासून किती अंतरावर राहून आपण अभिनय के ला पाहिजे, आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव कॅ मेरा किती बारकाईने पकडतो हे लक्षात घेऊन आपल्या अभिनयात बदल के ल्याचे त्यांनी सांगितले. चार वर्षांचा हा सराव प्रत्यक्षात उतरवण्याची संधी त्यांना ‘पांडू हवालदार’च्या निमित्ताने मिळाली. ‘या चित्रपटात माझी भूमिका कावेबाज हवालदाराची होती. आता धूर्त माणूस कसा बोलतो, काय हावभाव करतो याचे माझे काही ठोकताळे माझ्याकडे होते. चित्रीकरणाचे पहिले तीन दिवस मला काहीही काम नव्हते. मी रोज सकाळी ९ वाजता चित्रीकरण सुरू झाल्यापासून संध्याकाळी साडेसहाला संपेपर्यंत सेटवर खुर्ची टाकू न बसायचो. या तीन दिवसांत दादा कोंडके  कशा पद्धतीने काम करतायेत, त्यांच्या विनोदी संवादफे कीचा वेग, चेहऱ्यावरचे हावभाव आणि कृती यांतलं संयोजन हे सगळं बघत बसायचो. शिवाय, सेटवरच्या इतर तयारीचेही निरीक्षण करत राहायचो. या निरीक्षणातूनच माझ्यातील कलाकार घडत गेला’, अशी आठवण त्यांनी सांगितली.

लिहिणारे आहेत कुठे?

‘फ्रेंड्स’सारखी मालिका आजही जगभरातील प्रेक्षकांना आपल्याशी जोडून ठेवते. प्रेक्षकांना जोडून घेऊ शकतील इतक्या ताकदीचे लेखन असलेल्या मालिकाच आपल्याकडे होत नाहीत. तिथली गोष्ट वेगळी आहे. त्यांच्याकडे लेखकांची एक मोठी टीम कार्यरत असते. तंत्रज्ञानाचाही ते उत्तम वापर करून घेतात. आपल्याकडे मुळात असे लिहिणारेच कोणी नाहीत. ‘हम पाँच’ या मालिके ची आजही आठवण काढली जाते. इम्तियाज पटेलने ती मालिका उत्कृष्ट लिहिली होती. माझ्या मराठी मालिकांचे उत्तम लेखन अशोक पाटोळे यांनी के ले होते. आज त्यांच्यासारखे लेखकच उरलेले नाहीत, याबद्दल खंत वाटते.

स्वत:ची शैली निर्माण केली

मराठी चित्रपटांमध्ये कलाकाराच्या चेहऱ्याला कधीही महत्त्व नव्हतं. तो दिसतो कसा?, यापेक्षा त्याचा अभिनय कसा आहे हे पाहिलं जायचं. चांगला कलाकार असेल तर तो यशस्वी होणारच हे ठरलेलं होतं. मी काय… दादा कोंडके , निळू फु ले, लक्ष्मीकांत बेर्डे आम्ही तथाकथित हिरो कधीच नव्हतो. यातल्या प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनयाची स्वत:ची अशी एक शैली निर्माण के ली, आपली शैली विकसित करत ते पुढे गेले आणि त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण के ली. त्यामुळे ते आजही लोकांच्या लक्षात राहिले आहेत. कलाकारांनी स्वत:ला घडवलं पाहिजे असं ते आवर्जून सांगतात.

सबनीसांसारखे लेखक आणि टीमवर्कचं यश

अशोक सराफ, सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे या चौकडीने मराठी चित्रपटांमध्ये एक दशकभर यशस्वी विनोदी चित्रपटांचा प्रवाह निर्माण के ला होता. कलाकाराने अभिनय आत्मसात के ला पाहिजे. त्यावेळी आम्ही प्रामाणिकपणे आमच्या व्यक्तिरेखेला न्याय देणं, उत्तम अभिनय करत राहणं यावर भर दिला होता. वसंत सबनीसांसारखे दमदार लेखक आमच्याबरोबर होते. त्यांची कथा, त्यांनी लिहिलेल्या व्यक्तिरेखा, चित्रपटाचे संवाद इतके  चोख असायचे की आम्हाला स्वत:हून वेगळं काही करावं लागलं नाही. भूमिका समजून घेऊन आम्ही आमच्या अभिनयाने त्यात भर घालत गेलो. शिवाय, महेश आणि सचिन हे दोघेही दिग्दर्शनात बाप होते. हे सगळं उत्तम टीमवर्क जुळून आल्यानेच यशस्वी चित्रपटांचा काळ आम्हाला अनुभवता आला.