कपिलच्या चाहत्यांसाठी आणखी एक खुशखबर आहे, कारण कपिल छोट्या पडद्यावरही पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. कपिलचा ‘द कपिल शर्मा शो’ पुन्हा सुरू होणार आहे. ‘द कपिल शर्मा शो’नं कपिलला यशाच्या सर्वोच्च शिखरावर नेऊन ठेवलं. कपिलला ‘कॉमेडीचा बादशहा’ हे बिरुदही याच कार्यक्रमामुळे मिळालं. विनोदाच्या अचूक टायमिंगनं प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या कपिलनं प्रेक्षकांच्या हृदयात आपलं ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळ स्थान निर्माण केलं.

एप्रिलपासून कपिल प्रेक्षकांच्या संपर्कात नाही. ढासळलेली प्रकृती, सहकलाकारांसोबत झालेले टोकाचे वाद, पत्रकारांना सोशल मीडियाद्वारे केलेली शिवीगाळ, पूर्वाश्रमीच्या प्रेयसीनं केलेले आरोप अशा असंख्य कारणामुळे कपिल झगमगत्या दुनियेपासून दूर निघून गेला. त्याचा फॅमिली टाईम विथ कपिल शर्मा हा शो देखील तीन भागांनंतर बंद पडला.

कपिलनं गेल्या काही काळात अनेक चढउतार पाहिले. पण तरीही त्याचे चाहते त्याच्यापाठी खंबीरपणे उभे राहिले. काही महिन्यांपूर्वी कपिलनं आपल्या चाहत्यांशी ट्विटरवर संवाद साधला होता, त्यात अनेकांनी कपिलला त्याचा शो पुन्हा सुरू करण्याची विनंती केली होती. चाहत्यांची कपिलला छोट्या पडद्यावर पाहण्याची इच्छा आता लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे. कपिल शर्मा शो पुन्हा सुरू करणार असल्याची कल्पना कपिलनं एका वेबसाईटशी बोलताना दिली आहे.

सध्या या संदर्भातली बोलणी प्राथमिक टप्प्यावर सुरू आहे असंही कपिल म्हणला. पण तत्पुर्वी कपिल निर्माता म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. ‘सन ऑफ मनजीत सिंग’ या पंजाबी चित्रपटाची निर्मिती कपिलनं केली आहे. ऑक्टोबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.