सुप्रसिद्ध तमिळ नाटककार, पटकथालेखक व अभिनेते मोहन रंगाचारी यांचे सोमवारी चेन्नईत निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. विनोदी अभिनयासाठी प्रसिद्ध असलेले मोहन रंगाचारी हे ‘क्रेझी मोहन’ म्हणून ओळखले जातात. ‘क्रेझी थीव्स इन पलावक्कम’ या नाटकातील त्यांच्या दमदार अभिनयामुळे चाहत्यांनी त्यांचं नाव ‘क्रेझी मोहन’ असं ठेवलं.

मोहन रंगाचारी यांचा जन्म १९५२ साली झाला. यांत्रिकी अभियंत्याचं शिक्षण घेत असतानाच त्यांना लेखनाची आवड निर्माण झाली. त्यानंतर भाऊच्या नाटकांसाठी ते लेखन करू लागले होते. ‘पोइक्कल कुधीराइ’ या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. या चित्रपटातील संवादसुद्धा त्यांनीच लिहिले होते. त्यांचं ‘क्रेझी थीव्स इन पलावक्कम’ हे नाटक प्रचंड गाजलं. त्यानंतर त्यांनी ‘क्रेझी क्रिएशन्स’ नावाच्या कंपनीची स्थापना केली.

‘चॉकलेट कृष्णा’, ‘माधिल मेल मधू’, ‘रिटर्न ऑफ क्रेझी थीव्स’ ही त्यांची प्रसिद्ध नाटकं आहेत. अभिनयासोबतच त्यांना पेंटिंग आणि कविता लेखनाची आवड होती. त्यांनी तब्बल ४० हजार वेनबा (तमिळ कविता) लिहिल्या आहेत. कॉमेडी किंग ‘क्रेझी मोहन’ यांना राज्य सरकारने ‘कलैमणी’ या पुरस्काराने सन्मानित केले होते.