|| निलेश अडसूळ

हास्य-विनोदाने माणसाचे आयुष्य वाढते असे म्हणतात. पण सध्या प्रत्येक वाहिनीवर सुरू असलेल्या विनोदी कार्यक्रमांमुळे ‘विनोद’ दीर्घायुषी झाल्यासारखे वाटते आहे. प्रत्येक वाहिनीचा ठरलेला प्रेक्षकवर्ग असला तरी त्या-त्या वाहिन्यांवरील विनोदी कार्यक्रमांना भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’  या कार्यक्रमाने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले, आजही ते सुरू आहे. पुढे सोनी मराठीवर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आली. या जत्रेतील विनोदाने जणू प्रेक्षकांना मोहिनीच घातली. दिवाळीदरम्यान स्टार प्रवाह वाहिनीनेही ‘कॉमेडी-बिमेडी’ हा कार्यक्रम सुरू केला. आणि आता कलर्स मराठीवरही ‘सुपरफास्ट कॉमेडी एक्स्प्रेस’ हा विनोदाचा नवा कार्यक्रम येऊ घातला आहे. त्यामुळे मराठी वाहिन्यांवरील विनोदाची कक्षा दिवसेंदिवस अधिकच रुंदावते आहे. नमूद करण्यासारखी बाब म्हणजे या सर्व कार्यक्रमांना वाहिन्यांपलीकडे जाऊन फेसबुकसारख्या समाजमाध्यमावर आणि त्या त्या वाहिनीच्या अ‍ॅपवर जाऊन पाहणाराही मोठा प्रेक्षकवर्ग निर्माण झाला आहे. त्यामुळे या विविध धाटणीच्या विनोदावर निर्माण झालेल्या हास्याने प्रेक्षकही दीर्घायुषी राहोत अशी आशा…

करोनाकाळात मनाभोवती बरीच नकारात्मकता आली आहे. त्यामुळे डोळ्यांपुढे काही हलकेफुलके, हसवणारे आले तर प्रेक्षकांची त्याला पसंती मिळणे स्वाभाविकच आहे. हाच विचार कदाचित वाहिन्यांच्याही बाजूने झालेला दिसतो. या कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठीतील अनेक दिग्गज विनोदवीर पुन्हा एकदा पडद्यावर आले आहेत. अर्थात यात खरा कस आता लेखक-दिग्दर्शकांचा लागणार आहे, कारण आपण म्हणतोच ‘रडवणे सोपे आहे, हसवणे महाकठीण’. त्यामुळे सातत्याने नवा विनोद साधणे आणि प्रेक्षकांमध्ये हास्याची खसखस पिकवणे हे पुढील काळातील आव्हान असेल.

सातशे भागांचा टप्पा गाठत आलेला झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम कायमच लोकांच्या पसंतीचा ठरलेला आहे. वेगवेगळी पात्रं, गतकाळातील नाटक-सिनेमांचे प्रहसन, येऊ घातलेल्या कलाकृतींचे भावना न दुखावता केलेले विडंबन अशी विनोदाची चमचमीत मेजवानी प्रत्येक भागात प्रेक्षकांना चाखायला मिळते. या कार्यक्रमातील कलाकार भाऊ कदम विनोदाविषयी बोलताना म्हणाले, ‘प्रत्येक वेळी काय नवीन द्यायचे हा आमचा विचार असतो आणि तसे घडतही जाते. कारण प्रत्येक आठवड्यात नव्या मालिका, नाटक, चित्रपट, पाहुणे भेटीला येत असतात. त्यामुळे त्याच्यातून विषय मिळत जातो. लोकांना काय आवडेल, कशाला जास्त प्रतिसाद मिळतो, ती पात्रं कोणती, त्याचा वापर कसा होऊ शकतो यावर लेखक- दिग्दर्शक म्हणून नीलेश साबळे सातत्याने काम करत असतात. योगेश शिरसाठचेही त्यांना लेखन साहाय्य होत आहे.’

‘विनोदी मालिका वाढल्याने विनोदाचा कस लागेल, काय नवीन देता येईल यासाठी प्रयत्न होतील त्यामुळे विनोद वाढणे ही स्तुत्य बाब आहे. ज्याला प्रत्येक जण सकारात्मकतेनेच घेईल,’ असेही भाऊ कदम नव्या मालिकांचे स्वागत करताना म्हणाले. ‘विनोदाची गरज आजची नाही, आपल्याला विनोद हवाच असतो. इथल्या मातीने कायमच दर्जेदार विनोदाला प्राधान्य दिलेले आहे. केवळ आजच नाही तर वेळोवेळी वाहिन्यांवर असे कार्यक्रम आले आहेत. ‘हास्यजत्रा’ करताना कुटुंबासमवेत बघता येईल, असे विनोद निर्माण करण्याकडे आमचा कल आहे. सचिन मोटे आणि मी आम्ही प्रासंगिक विनोदावर कायमच भर देत आलोय आणि त्याला प्रेक्षकांची दादही मिळते. पूर्वीच्या विनोदात आणि आताच्या विनोदात फरक आहे. आता विनोद गतिमान होत आहे. विनोदाची माध्यमे वाढली. त्यामुळे आपण देत असलेला विनोद चपखल आणि नावीन्यपूर्ण असायला हवा. प्रेक्षक हुशार झाल्याने ती गतिमानता आपण पाळायला हवी. विनोद म्हणजे एक प्रकारचे धक्कातंत्र (सरप्राईज)असते आणि लोकांना असे धक्के आवडतात. बघता बघता आम्ही ३०० भागांचा टप्पा पूर्ण केला, त्यामुळे जबाबदारीत वाढ झाली आहे,’ अशी भूमिका सोनी मराठी वाहिनीवरील दिग्दर्शक-निर्माते सचिन गोस्वामी यांनी मांडली. या मालिकेतील ‘समीर चौगुले- विशाखा सुभेदार’, ‘नम्रता संभेराव आणि प्रसाद खांडेकर’, ‘गौरव मोरे- वनिता खरात’ या जोड्यांच्या सादरीकरणाला समाजमाध्यमांवरही विशेष पसंती मिळत आहे.

दिवाळीच्या दरम्यान स्टार प्रवाह वाहिनीवर ‘कॉमेडी-बिमेडी’ हा कार्यक्रम सरू झाला. कमी कालावधीतच कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात घर केले. या कार्यक्रमात लेखक आणि कलाकर दुहेरी भूमिका करणारे विजय पटवर्धन सध्या विनोद करणे आव्हानात्मक झाले आहे, असे सांगतात. कारण प्रत्येक वाहिनीवर विनोदासाठी काही ना काही आशय निर्माण केला जातो आहे, त्यामुळे वेगळेपण जपणे ही कसरत आहेच. शिवाय वाहिन्यांचा प्रेक्षकवर्ग सर्व वयोगटांतील असल्याने विनोद करताना प्रत्येक गोष्टीचे भान बाळगावे लागते. लिहिलेले विनोद सादर करणारे कलाकारही तितकेच ताकदीचे मिळाल्याने विनोदाची पोहोच अधिकच वाढते आणि प्रेक्षक मनमुराद दाद देतात,’ असेही पटवर्धन यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिगंबर नाईक, कमलाकार सातपुते, किशोरी आंबिये, प्राजक्ता हनमघर, अतुल तोडणकर, आशीष पवार, मंगेश देसाई, संतोष पवार, परी तेलंग असे इरसाल कलाकार पुन्हा एकदा विनोद पटलावर आले.

लवकरच कलर्स मराठी वाहिनीवर ‘सुपरफास्ट कॉमेडी एक्स्प्रेस’ हा कार्यक्रम येऊ घातला आहे. याविषयी लेखक दिग्दर्शक आशीष पाथरे सांगतात, ‘वर्षभर लोकांनी खूप मानसिक तणाव सहन केला आहे, त्यामुळे त्यांना निखळ हास्य देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यात स्पर्धा नाही, परीक्षक नाही केवळ छोट्या-छोट्या नाटिका (स्कीट) असतील. हे प्रेक्षकांना भरभरून हसवतील. यात अनेक दिग्गज विनोदवीरांसोबत अभिनेते सुमित राघवनही असणार आहेत. आता ते सूत्रसंचालक आहेत, सूत्रधार आहेत, सादरकर्ते आहेत की आणखी हे मात्र कार्यक्रम येईपर्यंत गुलदस्त्यात राहील.’ एकंदरीतच विनोदाची ही वाढती मात्रा प्रेक्षकांनाही लागू ठरते आहे, यात शंका नाही.