विनोदवीर कपिल शर्मा हे नाव आत्ताच्या घडीला हिंदी चित्रपटात मुख्य नायक साकारण्याइतपत लोकप्रिय झाले आहे. त्याचे श्रेय तीन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या ‘कलर्स’ वाहिनीवरील ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ या त्याच्या शोचे आहे. केवळ माईकसमोर उभे राहून चुटकुले सांगण्यापुरता किंवा रिअ‍ॅलिटी शोपुरती मर्यादित उरलेल्या विनोदी कार्यक्रमांची संकल्पना ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ने पूर्णपणे बदलून टाकली. सलग दोन वर्षे टीआरपीच्या स्पर्धेत नंबर वन ठरलेला हा शो नव्या वर्षांत निरोप घेतो आहे.

‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ या शोमध्ये पहिल्यांदाच कपिलने पाश्चिमात्य कॉमेडी शोच्या धर्तीवर एका कुटुंबाच्या आधारे विनोदाची मांडणी केली. सगळ्या प्रेक्षकांसमोर रंगणारा हा विनोदी सामना बॉलीवुडपटांच्या प्रसिद्धीसाठी येणाऱ्या कलाकारांमुळे आणखीनच आकर्षणाचा विषय झाला. या शोमुळे कपिल शर्मा हे नाव बॉलीवूडसाठीही अगदी जिव्हाळ्याचे झाले. मात्र लोकप्रियता मिळाली म्हणून चित्रपटात कुठली तरी विनोदी व्यक्तिरेखा न साकारता थेट नायक म्हणून विनोदी चित्रपटातून तो लोकांसमोर आला. कपिलला चित्रपटांची वाट सापडल्यामुळे त्याने छोटय़ा पडद्याला निरोप द्यायचा निर्णय घेतलेला नाही. तर ज्या वाहिनीला या शोने स्पर्धेत सतत नंबर वनवर ठेवले त्या     पान ४ वरपान १ वरून वाहिनीच्या दुटप्पी वागण्याचा त्रास होत असल्याने हा शो बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे कपिलने एका कार्यक्रमादरम्यान स्पष्ट केले आहे.

‘कलर्स’ वाहिनीवर सप्टेंबरपासून ‘कॉमेडी नाइट्स बचाओ’ हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे स्वरूप ‘कॉमेडी सर्कस’सारख्या रिअ‍ॅलिटी शोचे असेल असे आधी सांगण्यात आले होते. मात्र आता या कार्यक्रमात आणि आपल्या शोमध्ये फारसा फरक राहिला नसल्याची तक्रार कपिलने केली आहे. दोन्ही शोच्या शीर्षकांमध्ये ‘कॉमेडी नाइट्स’ हा शब्द वापरण्यात आला आहे. बॉलीवूड कलाकार जे या शोमध्ये सहज यायला तयार होत असत आता त्यांना त्याही शोमध्ये वाहिनीकडून बोलावले जाते आहे. वाहिनीने नवीन कार्यक्रम आणला म्हणून आपली तक्रार नाही, मात्र नवीन शो लोकप्रिय बनवण्यासाठी आधीच्या शोची हेळसांड करण्यात काय अर्थ आहे, असा सवाल कपिलने केला आहे. या सगळ्या प्रकारामुळे वैतागलेल्या कपिलने आपण डिसेंबरमध्येच शो बंद करणार असल्याचे वाहिनीला कळवले होते, पण त्यांच्याकडे तातडीने त्या जागी नवून शो नसल्याने त्यांच्या विनंतीवरून १७ जानेवारीला ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे कपिलने म्हटले आहे. हा शो घेऊन दुसऱ्या मोठय़ा वाहिनीवर कपिल जाणार, अशी चर्चाही सुरू झाली असली तरी याबद्दल कपिलने अधिकृत माहिती दिलेली नाही.