आपल्याकडे देशभर ‘पद्मावती’चा वाद पेटून उठला असताना हॉलीवूडच्या पडद्यावर एक वेगळंच युद्ध रंगतं आहे. कधीकाळी कॉमिक बुकमधून आपलं मनोरंजन करणारे सुपरहिरो ‘स्टॅन ली’ कृपेने रुपेरी पडद्यावर जिवंत झाले. ‘माव्‍‌र्हल’ आणि ‘डीसी’ कॉमिक्सच्या या सुपरहिरोजनी हॉलीवूड चित्रपट जगताचे अवकाश एवढे व्यापून टाकले आहे की हॉलीवूडमध्ये सुपरहिरोपटांशिवाय काही उरले नाही की काय? अशी शंका यावी. टॉम हँक्ससारख्या अभिनेत्यानेही सुपरहिरोपट प्रेक्षकांना आवडतायेत त्यामुळे सध्या चित्रपटसृष्टी या मायाजालातच अडकून पडते की काय? अशी भीती व्यक्त केली. इतक्या मोठय़ा प्रमाणात सुपरहिरोंचं हे कॉमिक जग सेल्युलॉईडवर वेगाने पसरलंय.. पण कोणी काहीही म्हणोत.. ‘माव्‍‌र्हल’ने सुपरहिरोंचं हे काल्पनिक जग इतक्या अफलातून पद्धतीने रु पेरी पडद्यावर विणलंय की दर एका चित्रपटागणिक प्रेक्षक त्यात गुंगून जातायेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अ‍ॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर’च्या ट्रेलरने समाजमाध्यमांवर खास करून ट्विटरवर धुमाकूळ घातला आहे. हा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या सात तासांच्या आत त्याला साडेअकरा लाखांच्या वर प्रेक्षकसंख्या होती. हा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून नेटवर या चित्रपटाशी संबंधित विनोद, पोस्ट्सचं एक वादळच आलंय जणू.. या वादाला आपल्याक डे नेटक ऱ्यांनी अगदी ‘पद्मावती’च्या वादाचीही फोडणी दिली आहे. एवढी उत्सुकता ताणणारा हा चित्रपट नेमका आहे तरी काय?

‘माव्‍‌र्हल’ आणि ‘डीसी’ कॉमिक्सनी आपापले सुपरहिरो रुपेरी पडद्यावर आणायला सुरुवात केली त्याला वर्ष लोटली. खरं म्हणजे.. पण ‘माव्‍‌र्हल’च्या सुपरहिरोजचा जन्मदाता स्टॅन ली आणि त्याच्या ‘माव्‍‌र्हल’ स्टुडिओने एकेक सुपरहिरो आणताना त्याच्या वेगवेगळ्या चित्रपट मालिका लोकप्रिय केल्या. यात ‘स्पायडरमॅन’, ‘आयर्नमॅन’, ‘कॅप्टन अमेरिका’, ‘थॉर’, ‘हल्क’, ‘अँटमॅन’ आणि ‘गार्डियन ऑफ गॅलॅक्सी’ असे एकेक करत सुपरहिरो त्यांच्या त्यांच्या काल्पनिक विश्वासह रुपेरी पडद्यावर अवतरले. एका क्षणाला या चित्रपटमालिका स्वतंत्रपणे लोकप्रिय होतायेत हे लक्षात आल्यानंतर नवं काहीतरी देण्याच्या उद्देशाने ‘माव्‍‌र्हल’ने ‘माव्‍‌र्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’ अशी संकल्पना देत या सुपरहिरोजना ‘अ‍ॅव्हेंजर्स’ नावाने एकत्र आणलं आणि ही स्वतंत्र चित्रपट मालिका सुरू झाली. ‘अ‍ॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर’ हा नवा चित्रपट या ‘अ‍ॅव्हेंजर्स’ मालिकेतील तिसरा आणि एकूणच ‘माव्‍‌र्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’चा एकोणिसावा चित्रपट आहे. ज्यात ‘माव्‍‌र्हल’चे एकूण एक सुपरहिरो एका छताखाली येणार आहेत. २०१८ च्या मे महिन्यात प्रदर्शित होणारा हा चित्रपट जगभरात धुमाकूळ घालणार यात शंका नाही आणि त्याची प्रचीती सध्यातरी त्याच्या ट्रेलरवरून येते आहे. ‘माव्‍‌र्हल’च्या युद्धात ‘डीसी’ कॉमिक कधीच मागे पडले होते. मात्र चित्रपट उद्योगाचे बदलते वारे पाहता ‘डीसी’नेही आपली युद्धनौका सज्ज केली असून गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेला ‘जस्टीस लीग’ हा त्या दृष्टीने उचललेलं पहिलं पाऊल होतं. ‘जस्टीस लीग’मध्ये पहिल्यांदाच ‘डीसी’चे सगळे सुपरहिरो एकत्र आले होते. पण ज्या वेगाने गेल्या दहा वर्षांत ‘माव्‍‌र्हल’ने आपलं जग विस्तारलं त्या तुलनेत खरं म्हणजे आता या दोघांमध्ये स्पर्धा निर्माण होईल, हे म्हणणं चुकीचं ठरेल इतका ‘डीसी’चा वेग कमी आहे. ‘डीसी’नेही ‘डीसी एक्स्टेंडेड युनिव्हर्स’ या संकल्पनेंतर्गत ‘जस्टीस लीग’ आणला आहे. पण ‘जस्टीस लीग’ पुढे काय?, हा अजूनही त्यांच्यापुढे प्रश्न आहे. इथे मात्र पुढचे वर्षभर ‘अ‍ॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर’ हा बिग बजेट धरूनही ‘माव्‍‌र्हल’च्या सुपरहिरोजचे स्वतंत्र चित्रपटही सिक्वलरूपात झळकणार आहेत.

‘माव्‍‌र्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’ एकीकडे दहावा वर्धापन दिन साजरा करत असताना आपल्या चित्रपट मालिका पुढे कशा न्यायच्या याबद्दलच्या नवनवीन कल्पनांमागे सातत्याने प्रयोग करते आहे. आणि त्यांचा प्रत्येक सुपरहिरोपट अगदी या वर्षभरात आलेल्या चित्रपटांनीही जवळपास ८०० दशलक्ष डॉलर्सची कमाई जगभरातून केली आहे. त्यामुळे आशय आणि व्यावसायिक यश या दोन्हीच्या बाबतीत ‘माव्‍‌र्हल’पट सरस ठरले आहेत. ‘अ‍ॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर’ ही अर्थातच प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. अँथोनी आणि जो रु सो दिग्दर्शित या चित्रपटात एकूण ३० मोठे कलाकार आहेत. यात त्यांच्या नेहमीच्या राबर्ट डाऊनी ज्युनिअर, मार्क रफेलो, क्रिस इव्हान, क्रिस हेम्सवर्थ, जेरेमी रेनर, स्कार्लेट जॉन्सन, टॉम हॉलंड या प्रथितयश चेहऱ्यांबरोबर ‘गार्डियन ऑफ गॅलॅक्सी’चे मुख्य चेहरे क्रिस प्रॅट, ब्रॅडली कुपर आणि व्हिन डिझेल ही मंडळीही यात दिसणार आहेत. ‘माव्‍‌र्हल’च्या अगदी ‘डॉक्टर स्ट्रेंज’पासूनचे सगळ्या व्यक्तिरेखा या चित्रपटात पाहायला मिळणार हे जसं या चित्रपटाचं विशेष आहे तसंच एवढय़ा हिरो मंडळींना लढण्यासाठी त्या ताकदीचा एकच तगडा खलनायक उभा केला आहे तो ‘थॅनोस’च्या रूपाने.. आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमधून ‘अ‍ॅव्हेंजर्स’चे दोन गट पडले आहेत. कॅप्टन अमेरिकाबरोबर एक टीम आहे. तर आयर्नमॅनबरोबर स्पायडरमॅन आणि मंडळींची दुसरी टीम आहे. तिसरीकडे थॉर, लोकी या दोघांबरोबर डॉक्टर बॅरन (हल्क) एकत्र आले होते. मात्र नव्या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये हल्कला जाग येते ती ‘डॉक्टर स्ट्रेंज’च्या घरात..चौथी गँग आहे ती ‘गार्डियन ऑफ गॅलॅक्सी’ची. या चार मोठय़ा समूहांची एकत्र मोट बांधायची तर प्रत्येकाची गोष्ट जिथे संपवली आहे तिथून धरून ती या कथेपर्यंत वळवणं हे ‘माव्‍‌र्हल’समोरचं मोठं आव्हान आहे. ट्रेलरमधून निदान काहीएक समाधानकारक पद्धतीने या गोष्टी एका धाग्यात बांधल्या गेल्या आहेत अशी प्रतिमा चाहत्यांच्या मनात निर्माण झाली आहे. धक्कातंत्र हा ‘माव्‍‌र्हल’च्या कथाकथनाचा महत्त्वाचा भाग असल्याने या चित्रपटात तर तो चांगलाच मोठय़ा प्रमाणावर बसणार याचीही चाहत्यांना खात्री आहे. सध्या तरी हे धक्के केवळ सुपरहिरोजच्या लुकबद्दलचे सुखद धक्के ठरले आहेत. कॅप्टन अमेरिका पहिल्यांदाच दाढीरूपात दिसणार असून त्याच्या या लुकला नेटकऱ्यांनी सगळ्यात जास्त दाद दिली आहे. या चित्रपटामुळे सुपरहिरोपटांची गणितं आणखीन गुंतागुंतीची आणि आव्हानात्मक होणार आहेत यातही शंका नाही. पण ‘माव्‍‌र्हल’ यापुढे अधिकाधिक आक्रमक होत जाणार तर दुसरीकडे निदान या स्पर्धेत आपलं मूळ जपण्यासाठी का होईना ‘डीसी’लाही शंभर टक्के वेगळे प्रयत्न करावे लागणार असल्याने हॉलीवूडच्या चित्रजगतात हे कॉमिक युद्ध लवकरच रंगणार आहे. या युद्धातून प्रेक्षकांच्या पदरात काही उत्तम कलाकृती पडणार हेच काय ते दान!