नेटफ्लिक्स या मोबाईल अॅपवर सेक्रेड गेम्स ही वेब सीरिज सध्या चांगलीच गाजते आहे. मात्र या वेब सीरिज वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कारण भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा अपमान करण्यात आल्याप्रकरणी अभिनेता नवाजउद्दीन सिद्दीकी आणि निर्मात्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आली. काँग्रेसचे समर्थक राजी सिन्हा यांनी ही तक्रार दाखल केली आहे. या सीरिजमध्ये राजीव गांधी यांचे नाव घेताना अपशब्द वापरण्यात आल्याचे या तक्रारीत सिन्हा यांनी म्हटले आहे. राजीव सिन्हा यांनी नेटफ्लिक्स या कंपनीचे नावही या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

भारतीय सिनेसृष्टीतल्या सगळ्या मर्यादा या सीरिजमध्ये ओलांडण्यात आल्या आहेत. अशा प्रकारचे सीरिजमुळे भारतीय सिनेसृष्टीचे नाव खराब होते असेही सिन्हा यांनी म्हटले आहे. विक्रम चंद्रा यांनी लिहिलेल्या सेक्रेड गेम्स याच नावाच्या कादंबरीवर ही सीरिज आधारित आहे. अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी यांनी या कादंबरीचे रूपांतर वेब सीरिजमध्ये करण्यासाठी बरीच मेहनत घेतली आहे. या वेबसीरिजचे प्रोमोही गाजत आहेत. अशात या सीरिजच्या निर्मात्यावर आणि अभिनेता नवाजउद्दीन सिद्दीकीवर तक्रार दाखल झाल्याने ही सीरिज अडचणीत सापडली आहे.

ही ८ भागांची सीरिज आहे. पोलीस निरीक्षक सतराज सिंगची कहाणी यात मांडण्यात आली आहे. हे पात्र या वेबसीरिजमध्ये अभिनेता सैफ अली खानने रंगवले आहे. सतराज सिंगला एका रात्री एक फोन येतो आणि त्यानंतर त्याचे आयुष्यच बदलून जाते अशी गोष्ट यात आहेत. गणेश गायतोंडे या माफीयाची भूमिका यामध्ये नवाजउद्दीन सिद्दीकीने केली आहे.