कामगार असहकाराच्या पवित्र्यात
‘क्वाँटिको’ या मालिकेसाठी ‘पीपल्स बेस्ट चॉईस’ हा हॉलीवूडचा पुरस्कार मिळवणारी पहिली बॉलीवूड अभिनेत्री म्हणून प्रियांका चोप्राचे सगळीकडे सध्या कौतूक होत आहे; तर दुसरीकडे तिच्या कंपनीने केलेल्या जाहिरातीसाठी सेट उभारणारे कामगार असहकाराच्या पवित्र्यात आहेत. सेटचे काम केल्यानंतर ठरल्यानुसार हाती पैसे न पडल्याने कामगार संतप्त झाले असून आठवडाभरात पैसे न मिळाल्यास प्रियांकासाठी एकही कामगार काम करणार नाही, असा इशारा कामगारांच्या युनियनने दिला आहे.
प्रियांका चोप्राच्या ‘पर्पल पेबल पिक्चर्स’ या प्रॉडक्शन कंपनीने एका जाहिरातीचे चित्रीकरण केले होते. जाहिरातीसाठी सेटची उभारणी करणाऱ्या कामगारांना एकूण ३६ लाख रुपये मानधन देण्यात येणार होते. अद्यापपर्यंत कंपनीने २० लाख रुपये दिले असून उर्वरित रक्कम देण्यात आलेली नाही, अशी तक्रार कामगारांनी ‘फिल्म स्टुडिओज सेटिंग अँड अलाईड मजदूर युनियन’ने केली आहे. युनियनने प्रियांकाच्या कंपनीला दोनदा यासंबंधीचे लेखी पत्र पाठवले, मात्र त्यावर कंपनीकडून उत्तर देण्यात आलेले नाही. यासंबंधी कंपनीच्या सूत्रांनी उर्वरित रक्कम जाहिरातीच्या कलादिग्दर्शकाकडे सुपूर्द केल्याचे म्हटले आहे. संबंधित कलादिग्दर्शकाने कामगारांना त्यांचे पैसे दिले नाहीत, असे सांगत कंपनीने हात वर केले आहेत.
प्रॉडक्शन कंपनी जेव्हा एखाद्या कामाचे कंत्राट कामगारांना देते तेव्हा त्याचा अपेक्षित खर्च कंपनीला माहिती असतो आणि त्यांनी तो थेट कामगारांना किंवा असोसिएशनला देणे अभिप्रेत असते. प्रियांकाच्या कंपनीने आधीचे २० लाख रुपये दिल्यानंतर कामगारांना पुढच्या रकमेविषयी काहीही माहिती दिली नव्हती, असे युनियनचे सचिव गंगेश्वरलाला श्रीवास्तव यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. त्यांनी आमच्या पत्रांना उत्तरे दिली असती तर निदान काही कळू शकले असते. आता या संदर्भात थेट प्रियांका चोप्राशी लेखी पत्राद्वारे संपर्क साधण्यात येणार असून त्यांना उर्वरित रक्कम देण्यासाठी आठवडाभराचा अवधी देण्यात येईल. आठवडाभरात पैसे न मिळाल्यास यापुढे एकही कामगार प्रियांकाच्या कंपनीसाठी काम करणार नाही, असा इशाराही युनियनने दिला आहे.