चित्रपट व मालिका निर्माती एकता कपूर विरोधात सत्र न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका वेब सीरिजमध्ये भारतीय लष्कराच्या गणवेशाचा अनादर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून, सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या हिंदुस्थानी भाऊ अर्थात विकास पाठक यांनी ही तक्रार दाखल केली आहे.

बिग बॉसमधील स्पर्धक व हिंदुस्थानी भाऊ नावानं प्रसिद्ध असलेल्या विकास पाठक यांनी अल्ट बालाजीवरील एका वेब सीरिजमधील प्रसंगावर आक्षेप घेतला आहे. याप्रकरणी त्यांनी पोलिसांत एकता कपूर विरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांकडून कोणतीही कारवाई न झाल्यानं त्यांनी वांद्रे येथील सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. या प्रकरणावर २४ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.

विकास पाठक यांचे वकील काशीफ खान यांनी सांगितलं की,”माझ्या अशिलांनी एकता कपूर इतरांविरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पण आजपर्यंत त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे आम्ही न्यायालयात फिर्याद घेऊन आलो आहोत,” अशी माहिती खान यांनी दिली. “तक्रारीत एकता कपूरसह ओटीटी प्लॅटफॉर्म अल्ट बालाजी, शोभा कपूर आणि जितेंद्र कपूर यांची नावं आहेत,” असंही त्यांनी सांगितलं.

तक्रारीनुसार २० मे रोजी एक व्हिडीओ युट्यूबवर प्रदर्शित झाला. ज्यात एक अभिनेता लष्करी अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. ही भूमिका करत असताना त्या वेब सीरिजमध्ये त्याला एक बेकायदेशीर कृत्य करताना त्याला दाखवण्यात आले आहे,” असं तक्रारीत म्हटलं आहे.