देशात करोनाचा कहर वाढतच चालला आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत चालली आहे. अनेक सेलिब्रिटींनाही करोनाची लागण होत आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार नदीम श्रवण संगीतकार जोडीतले श्रवण राठोड यांनाही करोनाची लागण झाली आहे.

श्रवण यांना करोनाची लागण झाल्याने त्यांना मुंबईच्या एस.एल. रहेजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतं आहे. त्यांना इतरही काही आजार असल्यानं त्यांची प्रकृती नाजूक असल्याचं समजतं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या प्रकृती सध्या चिंताजनक आहे.

१९९०च्या दशकात नदीम-श्रवण यांचा संगीत क्षेत्रात दबदबा होता. नदीम सैफी आणि श्रवण राठोड ह्या दोघांची जोडी प्रचंड गाजली. आशिकी चित्रपटातली त्यांची रोमँटिक गाणी चांगलीच गाजली.

नदीम श्रवण या जोडीने आशिकी, साजन, सडक, दिल है के मानता नही, साथी, दिवाना, फूल और कांटे, राजा हिंदुस्तानी, जान तेरे नाम, रंग, राजा, धडकन, परदेस, दिलवाले अशा अनेक चित्रपटांना संगीत दिलं आहे. संगीत क्षेत्रात त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.