भक्ती परब

सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘मुंबई-पुणे-मुंबई’ चित्रपटातील स्वप्निलने साकारलेला गौतम लोकांना भलताच आवडला. आता गौतमच्या प्रेमाची पुढील गोष्ट ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ मधून पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आनंदात असलेला स्वप्निल कुठलीही कलाकृती यशस्वी होण्यासाठी त्याचं लेखन हा महत्त्वाचा भाग आहे, असे मानतो. चित्रपटाचा आत्मा आणि गाभा हे लेखन आहे. त्यानंतर दिग्दर्शक आणि निर्माता महत्त्वाचे आहेत. कारण ती गोष्ट कोण सांगणार आहे? कुणाच्या संकल्पनेतून ती गोष्ट येतेय? निर्माता तिला किती न्याय देऊ शकेल? अशा अनेक गोष्टी चित्रपटाच्या यशात महत्त्वाच्या ठरतात, हे सांगताना तो ‘बाहुबली’ चित्रपटाचे उदाहरण देतो. ‘बाहुबली’ सारख्या चित्रपटाला निर्मितीत न्याय मिळाला नसता तर ती गोष्ट तेवढी मोठी होऊ शकली नसती. म्हणून निर्मितीमूल्य महत्त्वाचं असतं, कारण ती गोष्ट तेवढी भव्यदिव्य वाटली पाहिजे. गोष्टीची गरज लक्षात घेऊन तिला मोठं करता येणं हे निर्मात्याच्या हाती असतं. त्यामुळे प्रभावी कलाकृतीसाठी लेखन, दिग्दर्शन, निर्माता त्यानंतर कलाकार आणि तंत्रज्ञ अशी रचना असायला हवी. पण या सगळ्यात महत्त्वाचं आहे ते रसिक प्रेक्षकांचं प्रेम. रसिकांचं प्रेम मिळालं तर ती कलाकृती यशस्वी होते, असं स्वप्निल सांगतो.

एकीकडे ‘बाहुबली’ सारखा भव्यदिव्य चित्रपट खूप चालतो. तर दुसरीकडे ‘बधाई हो’सारखा आशयप्रधान चित्रपट यशस्वी होतो. त्यामुळे अशा प्रकारच्या चित्रपटांना प्रेक्षकांचं प्रेम मिळणंही तितकंच महत्त्वाचं आहे, असं तो म्हणतो. ‘मानिनी’ ते ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ पर्यंतच्या चित्रपटांतून आजवरच्या व्यक्तिरेखा साकारताना मेहनत घेतली आणि प्रेक्षकांनी त्यांना डोक्यावर घेतलं. चित्रपटातून मिळालेलं यश हे सांघिक आहे. कधी कधी असंही होतं की कलाकार म्हणून आपण खूप मेहनत घेतलेली असते, पण चित्रपटाला तेवढं यश मिळत नाही. आणि आपल्याला कळत नाही की चित्रपट अयशस्वी का झाला? माझे काही चित्रपट अपयशी ठरले तरी त्यासाठी मी जी मेहनत घेतली होती ती प्रेक्षकांना दिसली आणि त्यांनी कौतुकही केलं. त्यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो, आपल्याला जी गोष्ट आवडते ती करायला मिळणं यासारखं दुसरं भाग्य नाही. त्यामुळे अभिनय करताना कधीच कंटाळा, चिडचिड आणि ओझं वाटत नाही. अभिनयात असल्यामुळे मला रोज एक नवा माणूस बनता येतं. विविध प्रकारे व्यक्त होता येतं. त्यामुळे आयुष्यात तोचतोचपणाही जाणवत नाही. पण इतकी र्वष अभिनय क्षेत्रात असूनही अजून एकही चरित्रपट करायला मिळाला नाही, अशी खंतही त्याने व्यक्त केली.

सध्या मराठी आणि हिंदीतील इतर कलाकारांप्रमाणेच त्यालाही वेबसिरीजचे विश्व खुणावते आहे. मात्र मराठीच नाही तर एकूणच चित्रपटसृष्टीसाठी सध्या सुंदर काळ सुरू आहे. पूर्वी प्रादेशिक चित्रपट, हिंदी चित्रपट अशी विभागणी केली जायची. आता प्रादेशिक चित्रपट वगैरे ही संकल्पना संपणार. फक्त चांगले चित्रपट आणि वाईट चित्रपट ही संकल्पना राहील. प्रादेशिक चित्रपटांना वेगळं मानलं जाणार नाही. आताही मराठी चित्रपट फक्त मराठी प्रेक्षक पाहतात हे म्हणणं चुकीचे आहे. सगळ्या जगाचे लक्ष मराठी चित्रपटांकडे आणि अन्य चांगल्या प्रादेशिक चित्रपटांकडेही असतं. त्यामुळे येत्या काळात चित्रपटांच्या बाबतीत प्रादेशिकता किंवा भाषा ही संकल्पनाच उरणार नाही, त्याच्या मर्यादा येणार नाहीत. जो चित्रपट चांगला असेल तो प्रेक्षकांकडून पाहिला जाईल, असं मतही स्वप्निलने ठामपणे मांडलं. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘मुंबई पुणे मुंबई ३’ चित्रपटाविषयी बोलताना, सर्वसाधारणपणे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते हे एखाद्या कलाकृतीचं निर्माण करतात. पण ‘मुंबई-पुणे-मुंबई’च्या बाबतीत अगदी उलटं घडलं.  हा चित्रपट यशस्वी ठरल्यानंतर त्याचे पुढील दोन भाग यावेत याची प्रेरणा आम्हाला प्रेक्षकांकडूनच मिळाली. गौतम आणि गौरीच्या आयुष्यात पुढे काय होतंय याबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता आहे. त्यामुळे भारी वाटतंय. गौतमच्या व्यक्तिरेखेमुळे एकाच भूमिकेला पुन्हा पुन्हा भेटता आलं, याचाही अनोखा आनंद आहे, असेही तो म्हणाला.

गोष्ट सांगायला आवडतं -सतीश राजवाडे

चित्रपट हा एक छंद म्हणून काढला जात नाही, तर तो एक व्यवसाय आहे. सात वर्षांपूर्वी ‘मुंबई- पुण्े- मुंबई’ हा चित्रपट केला होता. आज या चित्रपटाचा तिसरा भाग प्रदर्शित होत असून प्रेक्षकही या तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट बघत आहेत. या सगळ्याचा अभिमान वाटतो. मराठीत पहिल्यांदाच असं होतंय की चित्रपटाचा तिसरा भाग येतोय. यातील व्यक्तिरेखाही त्याच आहेत. त्यांच्याच आयुष्याची ही पुढची गोष्ट आहे. आणि त्याच माणसांबरोबर ती गोष्ट पुढे जाते, असे सतीशने सांगितले.

दूरचित्रवाणी माध्यमासाठी मी दिग्दर्शन, अभिनय केला आहे. त्यामुळे क्रांती किंवा बदल आणण्यापेक्षा चांगलं काम करत रहावं, हेच माझं ध्येय आहे. ‘मुंबई-पुणे-मुंबई’ चित्रपटाची कथा पुढे उलगडत गेली, तशी मुक्ता बर्वे आणि स्वप्निल जोशी ही जोडी लोकप्रिय झाली. फक्त या जोडीमुळेसुद्धा चित्रपट पाहायला येणारे प्रेक्षक आहेत. त्यामुळे कलाकारांच्या प्रतिभेमुळे जो परिणाम होतो तो साधला गेला. अभिनय, लेखन, संकलन आणि दिग्दर्शन यातली कुठली एक बाजू जास्त उलगडण्यापेक्षा मला स्वत:ला कथा सांगायला आणि लिहायलाही खूप आवडतं. अभिनयाने माझी सुरुवात झाली होती. त्यामुळे अभिनय हा माझ्याबरोबर कायम राहणारच. अभिनेता म्हणून विचारणा झाली तर नक्की चित्रपट, मालिकांमध्ये काम करेन. पण दिग्दर्शन आणि लेखनाकडे माझा जास्त ओढा आहे, असंही सतीशने सांगितलं.

रसिकांना त्यांच्या तिकिटाचा शंभर टक्के मोबदला देणारा चित्रपट करायला मला आवडतं. त्यांना पुन्हा पुन्हा चित्रपट पाहायला आवडेल, अशा विषयांवरचे चित्रपट करायला माझे प्राधान्य असते आणि यापुढेही राहील. मलाही असे चित्रपट करायला आवडतात. आपण काहीतरी वेगळा इतिहास रचला पाहिजे, काहीतरी वेगळं केलं पाहिजे, यापेक्षाही आपण सातत्याने चांगलं काम केलं पाहिजे, याकडे माझं लक्ष असतं.

– सतीश राजवाडे

‘प्रयोगशील राहता येतंय’ 

‘मुंबई-पुणे-मुंबई’ चित्रपटाचा पहिला भाग आला तेव्हा माहिती नव्हतं की याचे आणखी काही भाग येतील. तरुण-तरुणीची आपली वाटेल अशी ही गोष्ट होती. चित्रपटाचा पहिला भाग हा यशस्वी प्रयोग होता. दोनच व्यक्तिरेखांतून चित्रपट उलगडणे ही संकल्पना नवीन होती. त्यामुळे या चित्रपटाने काही नवे ट्रेंड सेट केले. हा चित्रपट फक्त तणाईचा न राहता घरातील आबालवृद्धांचा झाला. आपल्या रोजच्या जगण्यात जशा आश्चर्यकारक गोष्टी घडतात तशाच त्या या चित्रपटातही आहेत. आमच्या जोडीमध्ये तरुणाई स्वत:ला बघते ही चांगली गोष्ट आहे. सतीशला चित्रपटातून सल्ला द्यायला आवडत नाही. त्याच्या दिग्दर्शनामध्ये, कथेत एक छुपा संदेश नेहमी असतो. संसार, करिअर, नवी पिढी, कुटुंब, नातेसंबंध या सगळ्यावर सतीशने भाष्य केलेलं आहे. चांगल्या आशयनिर्मितीमुळे मराठी चित्रपटसृष्टी समृद्ध होतीच. मधल्या काळात चांगल्या निर्मितीमूल्यांमध्ये चित्रपट कमी पडत होता. पण आता नवे निर्माते मराठीत आले, तांत्रिकदृष्टय़ा प्रगत मंडळी चित्रपटात आली. त्यामुळे चित्रपटाचा दर्जा अधिकाधिक उंचावतो आहे. प्रेक्षक तितक्याच प्रेमाने प्रतिसाद देतात. आजच्या काळातील अभिनेत्री असल्याचा मला खूप अभिमान वाटतोय. प्रयोगशील राहता येतंय अशा काळात काम करतेय ‘आम्ही दोघी’, ‘हृदयांतर’ आणि ‘मुंबई- पुणे- मुंबई ३’ यासारखे वेगळ्या पद्धतीचे चित्रपट करायला मिळत असल्याचे मुक्ता म्हणाली.

पुढच्या वर्षी माझे दोन चित्रपट येत आहेत. एका नाटकाच्या निर्मितीचाही विचार सुरू आहे. येणाऱ्या वर्षांत मला एखाद्या चांगल्या वेबसिरीजमध्ये काम करायला नक्की आवडेल. दूरचित्रवाणी माझे आवडते माध्यम आहेच. चांगली भूमिका मिळाली तर चित्रपट, दूरचित्रवाणी, वेबसिरीज यापैकी कुठल्याही माध्यमात काम करायची तयारी आहे.

– मुक्ता बर्वे

चित्रपट मनोरंजन करणारे असायला हवेत तसेच ते आशयप्रधान आणि दर्जेदारही असले पाहिजेत. कारण कलाकार हा चित्रपटातील आशय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम असतो. मी स्वत चित्रपटसृष्टीचा एक घटक आहे, त्यामुळे चांगले चित्रपट सातत्याने आले पाहिजेत. लोकांनीही या चित्रपटांना दाद दिली पाहिजे. आणि चित्रपटासंदर्भात दिग्दर्शक, निर्माते, कलाकार जे नवनवे प्रयोग करतायेत त्यांन प्रसारमाध्यमांचीही चांगली साथ मिळायला हवी.

– स्वप्निल जोशी