‘माझी गाडी अन्य कोणाच्याही हाती देणार नाही. काँग्रेसच्या हातावर माझा विश्वास आहे..’ असे सांगत काँग्रेसच्या प्रचारकीय जाहिरातीतला ‘पोश्टर बॉय’ बनलेला अभिनेता अनिकेत विश्वासराव याने अचानक शिवसेनेच्या प्रचाराचे धनुष्य हाती घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विक्रोळीतील शिवसेनेचे उमेदवार सुनील राऊत यांच्या प्रचारात अनिकेत हिरीरीने सहभागी
झाला होता.
प्रचारासाठी एखादा चांगला चेहरा असावा या हेतूने असेल किंवा मग संबंधित कलाकाराची लोकप्रियता ‘एन्कॅश’ करण्यासाठी म्हणून असेल, परंतु निवडणुका आल्या की राजकीय पक्ष हमखासपणे अभिनेत्यांना प्रचाराच्या रंगमंचावर उतरवतात आणि मतांचा जोगवा मागायला लावतात. त्यासाठी संबंधितांना घसघशीत बिदागीही दिली जाते. सध्या काँग्रेस व राष्ट्रवादीतर्फे अनुक्रमे अनिकेत विश्वासराव व ऋषिकेश जोशी हे दोन ‘पोश्टर बॉइज’ प्रचारकीय जाहिरातींत झळकत आहेत. मात्र, अनिकेतने अचानक काँग्रेसच्या हाताची घडी घालत शिवसेनेचे धनुष्य हाती घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. परंतु अनिकेतने यावर स्पष्टीकरण देताना जाहिरातीतील अभिनय व वैयक्तिक पक्षनिष्ठा यात फरक असल्याचे सांगत स्थानिक पातळीवर उमेदवाराने केलेले काम लक्षात घेऊनच लोकांनी मतदान करावे असा सल्लाही मतदारांना दिला आहे! जाहिरात कंपनीकडून संपर्क झाल्यानंतर एक अभिनेता म्हणून काँग्रेसची जाहिरात केल्याचेही अनिकेत म्हणाला. त्याचा संबंध आपल्या पक्षनिष्ठेशी जोडू नये, असे अनिकेतने सांगितले.
“जाहिरात कंपनीकडून संपर्क झाल्यानंतर एक अभिनेता म्हणून काँग्रेसची जाहिरात केली. त्याचा संबंध पक्षनिष्ठेशी जोडला जाऊ नये. काँग्रेसच्या जाहिरातीत काम करणे आणि स्थानिक पातळीवर काम केलेल्या उमेदवाराच्या प्रचारात सहभागी होणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. विक्रोळी मतदारसंघातील उमेदवाराने चांगले काम केले होते म्हणून मी त्याच्या प्रचारात सहभागी झालो. “
 – अनिकेत विश्वासराव, अभिनेता.