13 December 2018

News Flash

Bigg Boss 11: सलमानच्या आईची शिल्पाला पसंती

'बिग बॉस'च्या ११ व्या पर्वाचे जेतेपद कोणाला मिळणार ?

शिल्पा शिंदे, सलमा खान

‘बिग बॉस’ या वादग्रस्त कार्यक्रमाचे अकरावे पर्व लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. यंदाचे हे पर्व विविध कारणांमुळे चर्चेत आले. सेलिब्रिटी आणि सर्वसामान्य स्पर्धकांमध्ये असणारे मतभेद, या घरात उडालेले खटके, कटकारस्थान आणि आपण इतरांपेक्षा वरचढ आहोत हे सिद्ध करण्यासाठी केलेली खेळी या सर्व गोष्टींचे अफलातून समीकरण यंदाच्या ‘बिग बॉस’मध्ये पाहायला मिळाले. सतत काही ना काही खुरापती सुरु असणाऱ्या या घरातील काही मंडळीनी प्रेक्षकांमध्ये आपले एक स्थान निर्माण केले.

विकास गुप्ता, शिल्पा शिंदे, हिना खान या स्पर्धकांनी ‘बिग बॉस ११’ गाजवले. विकासला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला, तर हिनावर अनेकांनीच आगपाखड केल्याचे पाहायला मिळाले. या साऱ्यामध्ये आपले वेगळेपण सिद्ध करण्यात यशस्वी ठरली ती म्हणजे टेलिव्हिजन अभिनेत्री शिल्पा शिंदे. ‘भाभी जी घर पर है’ फेम अभिनेत्री शिल्पाने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान कायम केले असून, तिच ‘बिग बॉस ११’च्या जेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जातेय. या रिअॅलिटी शोमुळे शिल्पाच्या चाहत्यांचा आकडा झपाट्याने वाढला असून, त्यात एका अशा नावाचाही समावेश आहे ज्याची अनेकांना कल्पनाही नसेल. ते नाव आहे, दबंग अभिनेता सलमान खानची आई सलमा खान यांचे.

पाहा : Throwback Thursday : जुन्या जाहिरातींचा खजाना

सुत्रांचा हवाला देत ‘टाईम्स नाऊ’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार इतरांची काळजी घेण्याचा शिल्पाचा स्वभाव, बिग बॉसच्या घरातील तिचा वावर या सर्व गोष्टींमुळे तिने सलमानच्या आईचे मन जिंकले आहे. तिलाच या शोचे जेतेपद मिळावे अशी इच्छाही सलमा खान यांनी व्यक्त केली. भाईजान सलमानच्या आईने दिलेला हा कौल शिल्पासाठी नक्कीच फायद्याचा ठरु शकतो असे म्हणायला हरकत नाही. तेव्हा आता ‘बिग बॉस’च्या ११ व्या पर्वाची ट्रॉफी कोणाला मिळणार हे पाहणे नक्कीच औत्सुक्याचे ठरणार आहे.

First Published on January 12, 2018 11:43 am

Web Title: controversial television show bigg boss 11 actress shilpa shinde impresses salman khans mother salma khan