अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचा इटलीत १४ आणि १५ नोव्हेंबर रोजी राजेशाही थाटात विवाहसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्याची चर्चा संपूर्ण देशभरात झाली. पारंपरिक कोंकणी आणि शीख विवाहपद्धत ‘आनंद कारज’, अशा दोन्ही पद्धतीने दीप-वीरचा विवाहसोहळा संपन्न झाला. परंतु दीप- वीरच्या ‘आनंद कारज’ विवाहपद्धतीवर आक्षेप घेतला जात आहे.

इटलीतील लेक कोमो परिसरातील विला डेल बाल्बीआनेलो या ठिकाणी रणवीर- दीपिकाचा विवाहसोहळा पार पडला. १४ तारखेला कोंकणी पद्धतीने तर १५ तारखेला ‘आनंद कारज’ पद्धतीने लग्नाचे विधी पार पडले. ‘आनंद कारज’ या विवाहपद्धतीनुसार रणवीर- दीपिकाला गुरुद्वारामध्ये जाणं भाग होतं. पण त्यांनी तसं न करता विवाहस्थळीच गुरु ग्रंथ साहिब आणलं. शीख धर्मीयांकडून पवित्र मानलं जाणारं गुरु ग्रंथ साहिब गुरुद्वाराबाहेर नेलं जात नाही. म्हणूनच याची तक्रार ‘अकाल तख्त’कडे केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे यावर आता दीपिका- रणवीर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

इटलीतील लग्नसोहळ्यानंतर नवविवाहित रणवीर आणि दीपिका मुंबईत परतले आहेत. आपल्या मित्र- परिवारासाठी हे दोघं मुंबई आणि बेंगळुरूत स्वागत समारंभ आयोजित करणार आहेत.

‘आनंद कारज’ म्हणजे काय?

लग्नाच्या बंधनात दोन मनांसोबतच दोन कुटुंबही जोडली जातात हा महत्त्वाचा मुद्दा आनंद कारजच्या माध्यमातून लक्षात येतो. या विवाहपद्धतीमध्ये वधू आणि वराची जन्मपत्रिका जुळणं गरजेचं नसतं. हिंदू विवाहपद्धतीमध्ये लग्न, मुहूर्त या गोष्टींना फार महत्त्वं दिलं जातं. पण, शीख विवाहपद्धतीत मात्र हे चित्र काहीसं वेगळं आहे. धर्मगुरुच्या आस्थेच्या बळावरच आनंद कारजमध्ये म्हणजे शीथ संस्कृतीत लग्नगाठ बांधली जाते. त्याशिवाय हिंदूंप्रमाणे या लग्नसोहळ्यात सप्तपदी, सात फेरे वगैरे संकल्पना नसतात. सात ऐवजी चार फेरे घेत नवदाम्पत्य सहजीवनाच्या बंधनात बांधले जातात.