‘लोकसत्ता’च्या ‘सहज बोलता बोलता’ उपक्रमात युवा पिढीचे लोकप्रिय गायक राहुल देशपांडे यांच्याशी डॉ. चैतन्य कुंटे यांनी संवाद साधला. या स्वरसंवादातील राहुल देशपांडे यांचे चिंतन..

मला स्वत:ला संगीतातील प्रत्येक प्रकार आव्हानात्मक वाटतो. लोक माझ्यावर प्रेम करतात, ते माझ्या नाटय़संगीतामुळे. आजोबांनी करून ठेवलेली जी पुंजी आहे त्याच्यावरच अजून मी जगतो आहे. ‘घेई छंद मकरंद’ असेल किंवा अन्य नाटय़गीते, आज त्याच गाण्यांवरती माझा चरितार्थ चालतो आहे, असे म्हणायला काहीच हरकत नाही. पं. कुमारजी म्हणायचे किंवा माझे आजोबा म्हणायचे त्याप्रमाणे आता त्या बंदिशीकडून रागाकडे पाहण्याची दृष्टी मिळते आहे, असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी मी काय करतो आहे हे मला जाणवते किंवा मला काय करायचे हे मला आतमध्ये कुठे तरी माहीत असते. शास्त्रीय संगीताची महत्त्वाची उपलब्धी असेल तर हे चित्र उलगण्याची प्रक्रिया आनंददायी असते. बंदिशीमध्ये मी उडी मारतो. पोहता येते की नाही हेदेखील माहीत नाही; पण मी कोणत्या तरी चांगल्या प्रदेशात जाऊन पडेन हे माहीत असते. चांगल्या ठिकाणी पोहोचण्याचा जो आनंद आहे तो शब्दांत नाही मांडता येत. मनाला आनंद देणारे चित्र माझ्या डोळ्यासमोर आहे. या पद्धतीने अभिव्यक्त करणे हे महत्त्वाचे वाटते. नाटय़गीत, ठुमरीमध्ये शब्दांच्या भावाकडे अधिक लक्ष द्यावे लागते. शास्त्रीय संगीतामध्ये तुम्ही मनासारखे व्यक्त होऊ शकता.

सूर, लय, अभिनय

मला गाणं आवडू लागलं तो सूर होता कुमारजींचा. ‘सुनता हैं गुरु ग्यानी’ हे निर्गुणी भजन मी पहिल्यांदा ऐकले. त्या सुरांनी मला आतमध्ये ओढून घेतले. म्हणून कुमारजींचे उपकार मानावेत तेवढे कमीच आहेत. माझ्यासाठी कुमारजी हेच विश्व होते. माझे आजोबाही नाही की अन्य कोणी गवई नाही. कुमारजींचा सूर मला प्रकृतीच्या जवळचा, आपला वाटला. ‘सुरांवर प्रेम कर’ म्हणजे काय याची अनुभूती आता कुठे येऊ लागली आहे. ते शब्दांत नाही सांगता येत. आजोबांच्या सुरांमध्ये कायम वात्सल्य वाटते. ते आपल्यासाठी गात आहेत असेच प्रत्येकाला वाटते. त्यांच्या गायनामध्ये कोणताही अभिनिवेश नाही की मी काही ग्रेट करतो आहे, अशी भावनाही नाही. वसंतरावांचे गाणे श्रवणीय होते तसेच ते प्रेक्षणीय होते. रंध्रारंध्रांतून गाणं बाहेर पडतं म्हणतात तसे त्यांच्या प्रत्येक देहबोलीतून बाहेर पडायचे. सूर, लय आणि अभिनय यातून त्यांचे स्वर बाहेर पडायचे. फकिरी वृत्तीच्या वसंतरावांनी स्वत:कडे काही ठेवले नाही. ते त्यांच्या गाण्यांमधून जाणवायचे. जीवनातील संघर्ष त्यांच्या गाण्यामध्ये होता. वसंतरावांचे गाणे माझ्यासाठी नाही, अशीच माझी अनेक वर्षे धारणा होती. माझ्या आकलनाच्या बाहेरचे आहे. कुमारजींच्या गाण्यामुळे मला आजोबांचे गाणे कळायला लागले. त्यांचे आक्रमक गायन शांत होण्यामध्ये कुमारजींचा वाटा होता. वसंतरावांचे गाणे मला नंतर कळत गेले. हे आपल्या गळ्यासाठी नाही हे समजले. ‘तुझ्या आवाजाच्या पद्धतीने तुझे गाणे तयार कर,’ असे मुकुलकाकांनी सांगितले. तुझ्या आवाजाला साजेसे नाही, पेलणारे नाही ते करू नकोस, असे त्यांनी सांगितले.

संगीत श्रवणाचा आनंद..

भीमसेन जोशी यांचे गाणे खूप ऐकले. ते आपल्या आवाजाशी मिळतेजुळते आहे वाटले. त्यांच्या गाण्यातून, किशोरीताई आमोणकर यांच्या गायनातून मला खूप काही शिकता आणि घेता आले. उस्ताद शराफत हुसेन खाँ यांचे गाणे मी खूप ऐकले. ज्येष्ठ गायकांच्या गाण्यातील काही घेणे ही नक्कल नसते. त्यामुळे त्यांच्या गायनातील घेणे ही त्या गायकाला दिलेली मानवंदना असते. उस्ताद अली अकबर खाँसाहेबांचे सरोद खूप ऐकले आहे. पं. रविशंकरजी, उस्ताद विलायत खाँसाहेबांचे सतारवादन ऐकले आहे; पण मला उस्ताद शाहीद परवेझ यांचे वादन खूप आवडते. त्यामधील अभिव्यक्ती व्याकूळ करणारी आहे. त्यांचे वादन भावप्रधान आहे. मी सगळ्याच लोकांचा तबला खूप ऐकतो. तबल्यामुळे लय आणि त्याचे खंड दिसायला लागतात. माझ्या गाण्यापुरता मी तबला शिकलो. लहानपणापासून संगीत ऐकले. सिम्फनी, इंग्रजी पॉप संगीत, यामी लोकांचे संगीत ऐकले. हार्मनी आली. स्वररचना करताना कल्पना असते, ती वाजवून पाहिली तर ती कल्पना बदलता येते. वाद्यांचा मला खूप फायदा होतो. पाश्चात्त्य संगीत खूप ऐकले आहे. वयाच्या विशीमध्ये ‘फ्यूजन’कडे मी आकृष्ट झालो होतो. जॉर्ज ब्रुक्सबरोबर काम करताना मजा यायची. संगीतदृष्टय़ा अर्थ असेल तर फ्यूजन करण्यात आनंद आहे. शास्त्रीय संगीतामध्ये फार आनंद मिळतो. त्याचा असर फार काळ बरोबर राहतो, तसा तो फ्यूजनचा राहत नाही. त्या वेळी जो आनंद झाला तो आता होत नाही. ‘संगीतातील सौंदर्यदृष्टी विकसित होण्यासाठी लता मंगेशकर, आशा भोसले आणि महम्मद रफी यांची चित्रपटगीते ऐक’ ही मुकुलकाकाने केलेली सूचना मी लगेच अमलात आणून भरपूर चित्रपट संगीत ऐकले आहे. स्वररचनेच्या दृष्टीने मदन मोहन यांची गाणी मला आवडतात.

स्वरलगाव महत्त्वाचा

पाश्चात्त्य संगीतामध्ये स्वरलगाव आपल्यापेक्षा वेगळा आहे. त्यामध्ये शब्दांचा आघात करण्याचे एक शास्त्र आहे. मला तशा पद्धतीने आवाज लावण्याची सवय झाली आहे. हीच गोष्ट शास्त्रीय संगीतामध्ये असते. प्रत्येकाचा स्वरलगाव वेगळा असतो. समकालीन कलाकारांमध्ये शौनक अभिषेकी यांचे गायन आवडते. प्रत्येक वेळी त्यांच्या गाण्यातून वेगळा विचार आणि आनंद मिळतो. अभ्यासक समोर बसतात, तेव्हा वेगळ्या पद्धतीने कलाकार अभिव्यक्त होत असतो. असा विचार करणारे शौनक अभिषेकी यांचे गायन असते. अनेक ज्येष्ठ कलाकार नाटय़संगीत गायन कमी दर्जाचे समजतात; पण बालगंधर्व, कुमार गंधर्व, छोटा गंधर्व, वसंतराव देशपांडे अशा दिग्गज कलाकारांनी नाटय़संगीत आपल्या स्वरांनी अजरामर केले आहे. नाटय़संगीत गायनाचा चांगला परिणाम माझ्या शास्त्रीय संगीत गायनावर झाला आहे.