भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘कुली नंबर १’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमची स्तुती केली आहे. मोदींनी या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान राबवल्या गेलेल्या प्लास्टिक बंदी मोहिमेला पाठिंबा देत, ट्विटरच्या माध्यमातून कौतुक केले आहे.

‘कुली नंबर १’ या आगामी चित्रपटाच्या सेटवर प्लास्टिक बंदी मोहीम राबवण्यात आली. चित्रीकरणादरम्यान कोणत्याही प्रकारचे प्लॅस्टिक वापरले जाणार नाही, याची संपूर्ण काळजी यावेळी घेतली गेली. पाण्यासाठी व जेवणासाठी त्यांनी प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर टाळत धातूच्या भांड्यांचा वापर केला. तसेच सेटवर कोणत्याची प्रकारचा कचरा होणार नाही, याची विशेष काळजी घेतली गेली. चित्रपटाच्या निर्मात्यांनी राबवलेल्या या प्लॅस्टिक बंदी मोहिमेची माहिती अभिनेता वरुण धवन याने आपल्या ट्विटर अकाऊंवरुन दिली होती. या ट्विटची नोंद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘कुली नंबर १’च्या संपूर्ण टीमवर कौतुकाचा वर्षाव केला.

“प्लास्टिक बंदी मोहीम राबवल्याबद्दल कुली नंबर १ च्या संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन. देशातील प्लास्टिकचा वापर थांबवण्याच्या दृष्टीकोनातुन केलेला हा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे.” अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी ‘कुली नंबर १’च्या टीमची स्तुती केली.

हा चित्रपट १९९५ साली प्रदर्शित झालेल्या ‘कुली नंबर १’ चा रिमेक आहे. या चित्रपटात अभिनेता वरुण धवन व अभिनेत्री सारा अली खान मुख्य व्यक्तिरेखा सारकारताना दिसतील. डेविड धवन या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.