जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूमुळे जनजीवन ठप्प व्हायची वेळ आली आहे. त्यामुळे देशात लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. सध्या देशात चौथ्या टप्प्यातील लॉकडाउन सुरु आहे. मात्र या काळात हातावर पोट असणाऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी अनेकजण पुढे सरसावले आहेत. बॉलिवूडपासून मराठी कलाविश्वापर्यंत अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. यात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेनेदेखील मदतकार्य सुरु केलं आहे. त्यातच आता नाट्य परिषदेच्या मदत कार्याला वेग मिळावा म्हणून कलाकारांनीही जनतेला मदत करण्याचं आवाहन केलं आहे. विशेष म्हणजे मराठी कलाकारांनी जनतेला मदतीचं चॅलेंज दिलं आहे.

सध्या सोशल मीडियावर विविध प्रकारचे चॅलेंज ट्रेण्ड होत आहेत. यामध्ये अभिनेता, विनोदवीर सागर कारंडे यानेदेखील जनतेला, गरजुंना मदत करण्याचं चॅलेंज दिलं आहे. त्याने फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या बॅकेच्या खात्यात १० रुपये मदतनिधी जमा करा, असं आवाहन करणारं चॅलेंज दिलं आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर सागरच्या या पोस्टची विशेष चर्चा रंगत आहेत. इतकंच नाही तर या प्रकरणी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी या स्तुत्य उपक्रमाचं कौतुक केलं आहे.

“सध्या देशावर जे संकट ओढावलं आहे, त्यातून आपण कधी बाहेर पडू हे निश्चितपणे सांगता येत नाही. तसंच देशातील लॉकडाउन जरी संपला तरीदेखील सगळी परिस्थिती पूर्वपदावर यायला किती वेळ लागेल हे सांगता येत नाही, त्यामुळेच आम्ही गरजू नाट्यकर्मींना आर्थिक सहकार्य करण्यासाठी ‘नाट्यकर्मी मदत निधी’ जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. यात आम्ही १० कोटी रुपये जमा करण्याचा निर्धार केला असून हा निधी आम्ही थेट गरजू नाट्यकर्मींच्या खात्यात जमा करणार आहोत”, असं प्रसाद कांबळी यांनी ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना सांगितलं.

पुढे ते म्हणतात, “आम्ही घेतलेल्या निर्णयाला प्रोत्साहन मिळावं म्हणून अनेक मराठी कलाकार पुढे आले आहेत. यात सागर कारंडेने फेसबुकवर पोस्ट करुन १० रुपयांची मदत करा असं आवाहन जनतेला केला आहे. हे खरंच फार कौतुकास्पद आहे. सध्या फेसबुकवर अनेक विविध चॅलेंजचा ट्रेण्ड येत आहे. मात्र या ट्रेण्डचा वापर सागरने गरजुंच्या मदतीसाठी केला आहे हे फार छान आहे. कोणतीही मदत लहान किंवा मोठी नसते”.

दरम्यान, सागरप्रमाणेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरनेदेखील गरजुंना मदत करण्याचं चॅलेंज नेटकऱ्यांना दिलं आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर हा नवा ट्रेण्ड व्हायरल होत आहे.