गेले दीड वर्ष करोनाने जगभर कहर माजवला आहे. या वर्षी आलेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेतून सावरण्याच्या प्रयत्नात असलेले राज्य सरकार टाळेबंदीचे नियम हळूहळू शिथिल करत आहे. मात्र असं असलं तरीही अद्याप राज्यात चित्रपटगृह पूर्ण क्षमतेने उघडण्याची परवानगी मिळालेली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील महत्त्वाचा अध्याय सांगणारा ‘पावनखिंड’ हा भव्य-दिव्य आणि महत्त्वाकांक्षी चित्रपट १० जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. तूर्तास चित्रपटगृह बंद असल्याने चित्रपट प्रदर्शित करता येणे शक्य नसले तरी जेव्हा पूर्ण क्षमतेने चित्रपटगृहे सुरू होतील तेव्हा चित्रपटगृहातच प्रेक्षकांना हा चित्रपट पाहायला मिळेल, असे आश्वाासन या चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक यांनी दिले आहे. शिवचरित्रातील सुवर्णपान असलेल्या पावनखिंडीची गाथा लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरने या चित्रपटात मांडली आहे. पूर्वी घोडखिंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी बाजीप्रभूंनी आपल्या प्राणांची आहुती देत गनिमांची वाट रोखून धरत पराक्रमाची शर्थ केली होती. बाजीप्रभूंच्या पवित्र रक्ताने पावन झाल्याने या खिंडीला पुढे ‘पावनखिंड’ नाव पडलं. या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे, बांदल सेना आाणि मावळ्यांनी दिलेला लढा पाहण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

थुकरटवाडीचे विनोदवीर मुंबईत चित्रीकरणासाठी सज्ज

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा टाळेबंदी घोषित झाली, पण प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा वसा घेतलेल्या झी मराठीवरील मालिकांचं चित्रीकरण मात्र थांबलं नाही. महाराष्ट्राच्या बाहेर या मालिकांचं चित्रीकरण सुरू असून प्रेक्षकांच्या मनोरंजनात खंड पडलेला नाही. या कठीण वेळी सगळ्यांना हसवण्याचा विडा घेतलेले महाराष्ट्राचे लाडके विनोदवीर आणि प्रेक्षकांचा लाडका कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ जयपूरमध्ये चित्रीकरणासाठी रवाना झाला होता. पण आता नवीन नियमावलीनुसार मुंबईमध्ये चित्रीकरणाची परवानगी दिली असल्यामुळे हे विनोदवीर मुंबईमध्ये चित्रीकरण करण्यासाठी सज्ज झाले आहेत. तसंच काही कारणांमुळे जयपूरला चित्रीकरणासाठी न गेलेले डॉक्टर नीलेश साबळे, सागर कारंडे आणि भारत गणेशपुरे आता नवीन भागांतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. त्यामुळे ‘चला हवा येऊ द्या’चे जुने आणि नुकतेच सहभागी झालेले नवीन विनोदवीर प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाले आहेत. आगामी भागात भाऊ अतरंगी अवतारात, त्यांच्या भन्नाट विनोदी टायमिंगने प्रेक्षकांना हसवणार आहे तर सागर कारंडे साकारत असलेले पोस्टमन काका पुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

‘इंडियाज गॉट टॅलेंट’ सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजनवर

देशभरात वेगवेगळी गुणवत्ता असलेले, करामती करणारे अनेक लोक आहेत. आपल्या कलेच्या किं वा कौशल्याच्या जोरावर समोरच्याला स्तिमित करण्याची ताकद या कलाकारांकडे असते. मात्र अशा लोकांना अनेकदा क्षमता असूनही ओळख मिळत नाही. देशभर ऑडिशन घेऊन अशा लोकांना व्यासपीठ देणारा ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ हा शो अल्पावधीतच लोकप्रिय झाला होता. आत्तापर्यंत या शोचे आठ पर्व ‘कलर्स’ वाहिनीवर पार पडले. मात्र या शोचा फॉर्मेट आता सोनी एंटरटेन्मेट टेलीव्हिजन वाहिनीने घेतला असल्याने शोचे नववे पर्व या वाहिनीवर दिसणार आहे. एका वाहिनीवर गाजलेला शो दुसऱ्या वाहिनीकडून घेतला जाणे हा काही नवीन प्रकार राहिलेला नाही. ‘कौन बनेगा करोडपती’ हे याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. आधी हा शो ‘स्टार प्लस’ या वाहिनीवर प्रदर्शित झाला होता. त्याचे पहिले तीन पर्व स्टार प्लस वाहिनीवर चांगलेच गाजले आणि मग तो शो सोनी एंटरटेन्मेट वाहिनीने घेतला होता. आता अशाच प्रकारची पुनरावृत्ती ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या शोबाबत घडली आहे. ‘इंडिया का हुनर अब से सोनी पर’ या नवीन घोषणेसह हा शो नव्या वाहिनीवर दाखल होतो आहे. नव्या पर्वात परीक्षक तेच असतील की बदललेले असतील, याबाबत वाहिनीने अद्याप गुप्तता पाळली आहे.