|| रेश्मा राईकवार

गेल्या वर्षी मार्च महिन्यात अनपेक्षितपणे देशव्यापी टाळेबंदी जाहीर झाली आणि इतर सगळ्या उद्योगांप्रमाणेच मनोरंजन उद्योगाचे अर्थचक्रही ठप्प झाले. चित्रपटगृहे बंद झाली, मालिका आणि चित्रपटांचे चित्रीकरण थांबले. ‘डेली सोप’ नावाने होणारा मनोरंजनाचा रोजचा पुरवठा थांबला. अत्यंत हताश आणि उदास करणाऱ्या या वातावरणात राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा, चर्चा-संवाद या माध्यमातून जून-जुलैमध्ये पुन्हा चित्रीकरणाला परवानगी मिळाली. या संधीचा सगळ्यात जास्त फायदा दूरचित्रवाहिन्यांनी घेतला. मालिकांची चित्रीकरणाची गाडी रुळावर आली आणि त्यावर अवलंबून असलेल्या हजारो लोकांची उपासमार थांबली. करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जेव्हा नव्याने टाळेबंदीची घोषणा झाली, तेव्हा आधीचा अनुभव गाठीशी असलेल्या वाहिन्या, मालिकांचे निर्माते यांनी कंबर कसली. चित्रीकरण बंद झाले तर पुन्हा उत्पन्नावर पाणी फिरणार, अनेक मालिका बंद पडणार. हे दुष्टचक्र थांबवण्यासाठी सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न करत राज्याबाहेर जाऊन चित्रीकरण सुरू ठेवले. आता टाळेबंदीचे निर्बंध शिथिल होत असल्याने हा मनोरंजन उद्योग पुन्हा घरी परतणार आहे. या संकटाच्या निमित्ताने मनोरंजन उद्योगाची एकजूट लोकांना पाहायला मिळालीच, पण खुद्द हा उद्योग सुरू ठेवण्यासाठी धडपडणाऱ्या निर्माते, कलाकार, वाहिन्यांचे अधिकारी, तंत्रज्ञ सगळ्यांसाठीच हा एकमेवाद्वितीय अनुभव ठरला आहे…

‘प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची लस आवश्यकच’

मनोरंजन उद्योग बंद पडला तर त्यामुळे होणारे आर्थिक नुकसान आणि परिणामांची व्याप्ती किती गंभीर असू शकते याचा अनुभव आम्ही गेल्या वर्षीच्या टाळेबंदीतील तीन महिन्यांत घेतला. मालिका एकदा थांबली की त्यात प्रेक्षकाची जी भावनिक गुंतवणूक असते ती कमी होते. तुम्ही काही कालावधीनंतर मालिका सुरू केली तरी तुमचा प्रेक्षक परत येईल याची खात्री देता येत नाही. मग आधी तुमची मालिका कितीही लोकप्रिय असली तरी ती बंद करावी लागते. वाहिन्यांकडे पर्याय नसतो आणि परिणामी निर्मात्यालाही निर्णय मान्य करावा लागतो. गेल्या वर्षी चित्रीकरण थांबल्याने वाहिनीचे उत्पन्न बुडाले, जाहिरातीतून मिळणारे उत्पन्न कमी झाले. चित्रीकरण नाही म्हणून आमचेही उत्पन्न बुडाले आणि त्यामुळे आमच्यावर अवलंबून असलेले लेखक, कलाकार, साहाय्यक दिग्दर्शक अशी अनेक नवोदित तरुण मंडळी असतात त्यांचाही रोजगार बुडाला. मुंबईत हिंदी-मराठी मालिकांमध्ये कलाकार-तंत्रज्ञ म्हणून काम करण्यासाठी देशभरातून अनेक तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणावर येत असतात. इथे ते एकच खोली घेऊन चार-पाच लोक एकत्र राहतात. मात्र गेल्या वर्षी अनेकांना रोजगार नसल्याने घरभाडे देता आले नाही, हातात खाण्यासाठीही पैसा उरला नाही त्यामुळे अनेकांनी गाव गाठले. निर्माते म्हणून आम्ही किमान कामगारांना जगवण्याचा प्रयत्न के ला, पण अनेक गुणी कलाकार-तंत्रज्ञांचे मोठे नुकसान झाले. या उद्योगाचे आर्थिक चक्रच पूर्णपणे बिघडले. मुंबई आणि परिसरात १४३ हिंदी-मराठी मालिकांचे चित्रीकरण सुरू आहे. या मालिके च्या प्रत्येक सेटवरची किमान १०० माणसे धरली तरी १४ हजार ३०० जणांचा रोजगार बुडाला, याशिवाय जेवण पुरवणारे, स्पॉटबॉय, संकलक-लेखक अशी बाहेरून काम करणारी मंडळी धरली तर हा आकडा खूप मोठा आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर रोजगार बुडालाच, शिवाय प्रेक्षक नाहीत म्हणून अनेक नवीन मालिका अगदी ३४ व्या भागाला बंद कराव्या लागल्या. आमची ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ ही मालिका करोनाच्या आधी खूप लोकप्रिय होती. २५९ भाग झाले होते, मात्र टाळेबंदीनंतर मालिका सुरू झाली तेव्हा प्रेक्षकसंख्या कमी झाल्याने मालिका ३४३ भागांतच संपवावी लागली. अनेक निर्माते मालिका बंद झाल्याने कलाकार-कामगारांना वेतन देऊ शकले नाहीत, परिणामी अनेक आर्थिक वाद आमच्या संघटनांसमोर निकालासाठी आले. हे दुष्टचक्र थांबवायचे असेल तर जिथे परवानगी असेल तिथे जाऊन चित्रीकरण सुरू ठेवणे हाच पर्याय होता. आणि प्रत्येकाने निर्माते, वाहिनी, कलाकार, तंत्रज्ञ, कामगारांनी ठरवून जबाबदारीने चित्रीकरण सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न के ले.  प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची लसही तेवढीच आवश्यक आहे. त्यांच्या आयुष्यात तीन तासांची ही करमणूक महत्त्वाची ठरते आणि त्यामुळे आपला रोजगार कायम लक्षात राहतो हे लक्षात घेऊन प्रत्येकाने स्वत:बरोबरच इतरांची काळजी घेऊन सहकार्याच्या भावनेतून चित्रीकरण सुरू के ले. राज्याबाहेर चित्रीकरण हलवणे हा निर्णय सोपा नव्हता. माझ्या ‘अहिल्याबाई होळकर’ मालिके साठी नायगावमध्ये मोठा सेट उभारण्यात आला आहे तो सोडून उंबरगावला जिथे ‘रामायण’, ‘महाभारत’ मालिकांचे चित्रीकरण के ले गेले, त्या सेटवर दृश्यांची पुनर्रचना करत आम्ही चित्रीकरण के ले. यानिमित्ताने मनोरंजन उद्योग ही महाराष्ट्राची ताकद आहे हे सिद्ध झाले आहे. त्याची व्याप्ती किती मोठी आहे हे लक्षात घेऊन राज्याचे आर्थिक आणि प्रेक्षकांचे मानसिक स्वास्थ्य टिकवायचे असेल तर मनोरंजनाची लस आवश्यकच आहे. – नितीन वैद्य, निर्माता

‘हे प्रत्येकाचं यश’

कामापेक्षा काहीही मोठं नाही या भावनेतून प्रत्येक विभागाने आपापल्या परीने तयारी करून चित्रीकरणाची धुरा सांभाळली आहे. हे निर्मात्यांचंही यश आहे. त्यांनी बाहेर जाऊन चित्रीकरण करायची तयारी दाखवली. वाहिन्यांनीही निर्मात्यांना आर्थिक पाठिंबा दिला. कलाकार-तंत्रज्ञ-कामगारांनीही दोन महिने पूर्णपणे राज्याबाहेर राहून करोनाविषयी सर्व काळजी घेऊन चित्रीकरण करायचं धाडस केलं. हे कोणा एकाचं यश नाही. इथे काम करणाऱ्या प्रत्येकाचं कौतुक आहे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गेल्यानंतर तिथेही सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या, त्यामुळे चित्रीकरण करणं तुलनेने सोपं झालं.सगळ्यांनी एकजुटीने काम क रून ते धसास लावलं ही भावना निश्चिातच सुखावणारी आहे. – सतीश राजवाडे, कार्यक्रम प्रमुख – स्टार प्रवाह

 

सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी निमित्त

करोनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी एकत्र येणं ही गरज होती. मनोरंजन वाहिन्यांमध्ये आपापसात कितीही स्पर्धा असली तरी ती व्यावसायिक आहे. त्यापलीकडे आम्ही सगळे यात काम करणारे कलाकार, अधिकारी, तंत्रज्ञ यांच्यात मैत्रीपूर्ण संबंधच आहेत. हे आत्ताचं नाही तर प्रत्येक वेळी गरजेला सगळेजण एकत्र येऊन सामना करतात. एखादा निर्माता अडचणीत असेल तर दुसरा निर्माता त्याला मदतीचा हात देतो. करोनाचं संकट हे या सगळ्यांना एकत्र आणण्याचं निमित्त ठरलं फक्त… प्रत्येकानेच हा उद्योग सुरू राहावा यासाठी प्रयत्न के ले, धडपड के ली. त्यामुळे ती एकजूट दिसून आली. – नीलेश मयेकर, व्यवसायप्रमुख – झी मराठी

आर्थिक-कलात्मक गांभीर्य अधोरेखित

महापूरे झाडे जाती, तेथे टेलीव्हिजन वाचती… असं आम्ही गमतीने म्हणतो. पण या उद्योगाने आम्हाला जगवलं आहे, त्यामुळे अत्यंत गांभीर्याने आम्ही इथे काम करतो. करोनाकाळातही आपण काम केलं नाही तर आपल्याला रोजगार मिळणार नाही, याची जाणीव कलाकार, तंत्रज्ञ, कामगार सगळ्यांमध्येच होती. एरव्ही ही निर्मात्याची समस्या आहे तो बघेल… किं वा ही वाहिनीची समस्या आहे ते बघतील असा विचार के ला जातो. मात्र या वेळी सगळ्यांनाच आपल्या कामाची, जबाबदारीची जाणीव होती. सेटवर सगळे एक झाले होते. परदेशात शो करताना जसे बॅकस्टेजचे कलाकारही अभिनय करतात, तसं इथेही झालं होतं. नेहमीपेक्षा राज्याबाहेर चित्रीकरण करताना कलाकार-तंत्रज्ञांची संख्याही मर्यादित होती. जैवसुरक्षा पद्धतीने चित्रीकरण करत असल्याने बाहेरच्या कोणाला आत यायची परवानगीही नव्हती. त्यामुळे एखादे जमावाचे दृश्य घ्यायचे असेल तरी ते सेटवर उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञ-कामगारांच्या मदतीनेच पूर्ण के ले जाते. आमच्या कॅ मेरामनने तर अ‍ॅक्शनदृश्येही साकारली आहेत. एकोप्याच्या दृष्टीने हा चांगला बदल घडून आला हे खरं आहे. मात्र यानिमित्ताने सिनेमा आणि नाटकाच्या तुलनेत मालिकाविश्वााला कमी लेखलं जातं, प्रत्यक्षात या क्षेत्राची व्याप्ती किती आहे हे पहिल्यांदा सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. मालिकाविश्वाचं अर्थकारण आणि प्रेक्षकांना घरातच खिळवून ठेवण्याची या माध्यमाची ताकद, त्याचे कलात्मक महत्त्वही अधोरेखित झालं आहे. -विनोद लवेकर, निर्माता