करोनाचा धोका, गेल्या वर्षी झालेले चित्रपट व्यवसायाचे नुकसान या सगळ्या गोष्टी मागे टाकू न नवीन वर्षांत दमदार पुनरागमनाची तयारी हिंदी चित्रपट निर्मात्यांनी सुरू के ली आहे. प्रेक्षक चित्रपटगृहात फिरकणार का? या भीतीपोटी शांत बसलेले हिंदी चित्रपट निर्माते आता मात्र पुढे सरसावले आहेत. गेल्या काही दिवसांत चांगल्या हिंदी चित्रपटांच्या तारखा जाहीर होऊ लागल्या असल्याने चित्रपटसृष्टीत पुन्हा एकप्रकारचे चैतन्य सळसळले आहे. गेल्या वर्षी दिवाळीपासूनच खरंतर ‘सूरज पे मंगल भारी’ या चित्रपटाच्या माध्यमातून हिंदी चित्रपट चित्रपटगृहात परतले होते खरे.. पण अजूनही काही मोठे चित्रपट प्रदर्शनासाठी बाजारपेठ पूर्ववत होण्याची वाट पाहात आहेत. अजूनही विदेशातील बाजारपेठ पूर्णपणे उपलब्ध नाही आणि काही महत्त्वाच्या राज्यांत चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाहीत. म्हणून आता आणखी काळ थांबून न राहता त्यातल्या त्यात सावध भूमिका घेत अनेक निर्मात्यांनी एप्रिल-मे महिन्यांत आपल्या चित्रपटांच्या तारखा जाहीर के ल्या आहेत. ११ मार्चला ‘रुही’ हा कॉमेडी-हॉरर शैलीतील तुलनेने मोठा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. त्यानंतर रांगेत अनेक मोठय़ा आणि चांगल्या हिंदी चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. हिंदीत सुपरस्टार अमिताभ बच्चन, अक्षय कु मार, रणवीर सिंग, रणबीर कपूर अशा मोठमोठय़ा कलाकारांचे चित्रपट गेल्यावर्षी प्रदर्शनाअभावी रखडले होते. शिथिलीकरणानंतर जे चित्रपट प्रदर्शित झाले त्या यादीत या मोठय़ा कलाकारांचे चित्रपट नव्हते. हळूहळू या सगळ्याच कलाकारांच्या रखडलेल्या चित्रपटांच्या तारखा जाहीर होऊ लागल्या आहेत. एप्रिल आणि मे महिना हा सुट्टीचा काळ असल्यामुळे या काळात खरंतर भारतात प्रदर्शित होणाऱ्या हॉलीवूडपटांची संख्या मोठी असते. आणि सध्याची परिस्थिती पाहता प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत आणण्यासाठी एका मोठय़ा व्यावसायिक मनोरंजनपटाची गरज आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे, मात्र हा पहिला मोठा चित्रपट कोण प्रदर्शित करणार? याच विचारात सगळं गाडं अडकू न पडलं होतं. त्या तुलनेत नेहमीप्रमाणे सलमान खानने ईदच्या मुहूर्तावर मे महिन्यात ‘राधे’च्या प्रदर्शनाची घोषणा केली. त्यापाठोपाठ जॉन अब्राहम आणि दिव्या खोसला यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘सत्यमेव जयते २’च्या प्रदर्शनासाठीही मे महिन्यातील ईदच्या आठवडय़ाची तारीख जाहीर करण्यात आली. पण प्रदर्शनाची ही धामधूम खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे ती रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’च्या प्रदर्शनाच्या चर्चेने.. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची निश्चित तारीख जाहीर झालेली नसली तरी मार्चच्या अखेरच्या आठवडय़ात किं वा एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात हा चित्रपट प्रदर्शित होणार, हे कळताच इतरही निर्मात्यांच्या जीवात जीव आला आहे. अक्षय कु मारचेच ‘सूर्यवंशी’ धरून यावर्षांत चार चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्याचा ‘बेलबॉटम’ हा बहुचर्चित चित्रपट २८ मेला प्रदर्शित होणार आहे. अभिनेत्री वाणी कपूर या चित्रपटात त्याच्याबरोबर मुख्य भूमिके त आहे. त्यानंतर सारा अली खान, धनुष आणि स्वत: अक्षय अशी अतरंगी कलाकार तिकडी असलेला ‘अतरंगी रे’ हा आनंद एल. राय दिग्दर्शित चित्रपट ६ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. तर यशराजची निर्मिती असलेला ‘पृथ्वीराज’ हा त्याचा महत्त्वाकांक्षी ऐतिहासिक पट नोव्हेंबरमध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार असल्याचे समजते.

सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे या अनवट जोडीचा करिश्मा गेल्यावर्षीच ‘झुंड’ या चित्रपटातून अनुभवायला मिळणार होता. नागराजचे दिग्दर्शक म्हणून हिंदीतील पदार्पण असलेला हा चित्रपट आता १८ जूनला प्रदर्शित होणार आहे. अमिताभ यांनीच समाजमाध्यमांवरून याची माहिती दिली असून गेल्यावर्षी आम्हाला फटका बसला होता, त्यामुळे आम्ही मागे पडलो होतो. आता हा पुनरागमनाचा काळ आहे, असे अमिताभ यांनी म्हटले आहे. रखडलेल्या चित्रपटांपैकी आणखी एक मोठे नाव आहे ते म्हणजे कबीर खान दिग्दर्शित आणि रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेला ‘८३’. हा चित्रपट नवीन वर्षांच्या पहिल्या तिमाहीत प्रदर्शित होणार अशी अटकळ बांधली जात होती, प्रत्यक्षात हा चित्रपट ४ जूनला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती ‘रिलायन्स एन्टरटेन्मेट’चीच असल्याने त्यांनी आधी ‘सूर्यवंशी’ चित्रपट प्रदर्शित करण्यावर भर दिला आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राची मुख्य भूमिका असलेला ‘शेरशहा’ हा चित्रपटही गेल्यावर्षी प्रदर्शित होणे अपेक्षित होते, पण चित्रीकरणच पूर्ण होऊ न शकल्याने चित्रपट रखडला होता. टाळेबंदीनंतर चित्रीकरण पूर्ण करून हा चित्रपट २ जुलैला प्रदर्शित होणार आहे. एकापाठोपाठ एक सुपरहिट चित्रपट देऊन २०१९ आणि २०२० चा पूर्वार्ध गाजवणाऱ्या अभिनेता आयुषमान खुराणाचा ‘चंदीगढ करे आशिकी’ हा चित्रपट ९ जुलैला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक अभिषेक कपूर आणि आयुषमान खुराणा-वाणी कपूर अशी आणखी एक वेगळीच जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे.

दाक्षिणात्य अभिनेता विजय देवेरकोंडा याचे हिंदी चित्रपटात नायक म्हणून पदार्पण असलेला ‘लायगर’ या चिवित्र नावाचा चित्रपटही ९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनची आहे, तर यात विजयच्या नायिके च्या भूमिके त अनन्या पांडे दिसणार आहे. आमिर खान आणि करीना क पूर जोडीचा ‘लाल सिंह चढ्ढा’ हा चित्रपट यावर्षी नाताळच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. याशिवाय, अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा लवकरच जाहीर होणार आहेत.

आठ महिने आणि तीन चित्रपट

गेल्या वर्षीची कसर भरून काढण्यासाठी सध्या प्रत्येक कलाकार, निर्माता-दिग्दर्शक झटताना दिसतो आहे. त्यातही दरवर्षी एकटय़ाच्या खांद्यावर चित्रपट घेत तिकीटबारीवर कोटय़वधींची कमाई करणाऱ्या बॉलीवूडच्या नायकांसाठी तर हे आव्हानच ठरतं आहे. सलमान, आमिरसह आघाडीच्या फळीतील कु ठलाही कलाकार याला अपवाद ठरलेला नाही. सध्या ‘बिग बॉस १४’च्या निमित्ताने सातत्याने प्रेक्षकांशी संवाद साधणाऱ्या सलमाननेही आपले हे वर्ष चित्रीकरणातच दंग असणार असल्याचे स्पष्ट के ले आहे. येत्या आठ महिन्यांत आपण लागोपाठ तीन चित्रपटांसाठी चित्रीकरण करणार असल्याची माहिती सलमानने दिली आहे.

टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर सलमान खानने लगेचच ‘राधे : द मोस्ट वाँटेड भाई’ या प्रभुदेवा दिग्दर्शित चित्रपटाचे उर्वरित चित्रीकरण पूर्ण के ले. हा चित्रपट आता पोस्ट प्रॉडक्शनमध्ये असून मे महिन्यात प्रदर्शित होणार आहे. याशिवाय, महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘अंतिम-द फायनल ट्रथ’चे चित्रीकरणही जवळपास पूर्ण होत आले आहे. ‘मूळशी पॅटर्न’ या प्रवीण तरडे दिग्दर्शित मराठी चित्रपटाचा रिमेक असलेल्या या हिंदी चित्रपटात सलमानचा मेहुणा आयुष शर्मा महत्त्वाच्या भूमिके त आहे. मूळ मराठी चित्रपटात लोकप्रिय ठरलेल्या ‘आरारा खतरनाक’ या गाण्याचा हिंदी अवतारही नुकताच चित्रित झाला असल्याचे समजते. मात्र या सगळ्या घडामोडींबरोबर ‘बिग बॉस १४’चा सेट गाजवणारा सलमान तिथेच थांबलेला नाही. तर त्याने पुढच्या चित्रपटांवरही काम सुरू के ले आहे.

‘बिग बॉस १४’ हा शो संपल्यानंतर लगेचच आपण शाहरूख खानबरोबरच्या ‘पठान’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करणार असल्याची माहिती सलमानने दिली आहे.‘वॉर’ फे म दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित करत असलेल्या ‘पठान’मध्ये सलमान एका छोटेखानी भूमिके त दिसणार आहे. या चित्रपटानंतर तो त्याच्या ‘टायगर’ चित्रपट मालिके तील तिसऱ्या चित्रपटाचेही चित्रीकरण सुरू करणार आहे. या तिसऱ्या सिक्वलमध्येही त्याची आणि कतरिना कै फची जोडी मुख्य भूमिके त असणार आहे आणि याआधी सुरू झालेल्या चर्चावर विश्वास ठेवायचा झाला तर या चित्रपटात शाहरूख खान छोटेखानी भूमिका करणार आहे. या दोन चित्रपटांनंतर साजिद नाडियादवालाच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ या चित्रपटाची सुरुवात होईल, असेही सलमानने म्हटले आहे. अर्थात, या तीन चित्रपटांचे चित्रीकरण पूर्ण करता करता ‘बिग बॉस’च्या १५ व्या पर्वाची घोषणा होईल आणि आपण पुन्हा परत भेटू, असं म्हणत सलमानने ‘बिग बॉस’ अजूनतरी त्याच्याशिवाय पूर्ण होणार नाही, याची ग्वाही दिली आहे.

सलमानने आपले चित्रपट चित्रपटगृहांमधूनच प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. वितरकांनी मला विनंती के ली होती, ‘राधे’ हा चित्रपट चित्रपटगृहातूनच प्रदर्शित के ला जावा. गेले वर्षभर सगळ्यांनीच आर्थिक नुकसानीला तोंड दिले आहे. चित्रपट नसल्याने चित्रपटगृहे बंद होत आहेत हे दुर्दैवी आहे. चित्रपटगृहांशिवाय आम्हा कलाकारांचे अस्तित्व नाही आणि आमच्याशिवाय त्यांचा व्यवसाय नाही, असे स्पष्ट करत यापुढेही आपले चित्रपट चित्रपटगृहातूनच प्रदर्शित होतील, असे आश्वासनही त्याने दिले आहे.