करोना विषाणूला लढा देण्यासाठी सर्वच क्षेत्रांमधूम मदतीचे हात पुढे येऊ लागले आहेत. अगदी दाक्षिणात्य कलाकारांपासून ते मराठी कलाविश्वापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी गरजूंना आणि करोना विषाणूसोबत झटणाऱ्यांसाठी सढळ हाताने मदत केली आहे. यामध्येच अभिनेता अमिताभ बच्चन यांनीदेखील गरजूंसाठी जेवण पुरविण्याचं काम हाती घेतलं आहे. त्यामुळे आता  अमिताभ बच्चन हे दररोज २ हजार गरजूंना जेवण पूरवणार आहेत.

‘इंडिया टुडेनुसार’,अमिताभ बच्चन यांनी सुरु केलेल्या या उपक्रमामध्ये ते मुंबईतील काही भागांमध्ये जेवणाचे पॅकेट्स पुरविणार आहेत. यात दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणाचा समावेश असेल. पहिल्या दिवशी त्यांनी २ हजार जेवणाच्या पॅकेट्सचं गरजूंमध्ये वाटप केलं.

“मुंबईतील वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या गरजू नागरिकांना मदत म्हणून दररोज आम्ही दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण पुरवणार आहोत. पहिल्या दिवशी आम्ही २ हजार जेवणाची पाकिटं पाठविली. तसंच रोज २ हजार जेवणाची पाकिटं याच पद्धतीने वाटली जातील. त्यासोबतच आम्ही आणखी एक निर्णय घेतला आहे. त्यानुसार, दैनंदिन जीवनात लागणाऱ्या काही गोष्टी आणि खाद्यपदार्थही आम्ही नागरिकांना पुरवणार आहोत.साधारणपणे अशा सामानाच्या ३ हजार पिशव्या आम्ही गरजूंपर्यंत पोहोचवू. त्यामुळे आता या उपक्रमाअंतर्गत जवळपास १२ हजार गरजूंच्या जेवणाची सोय यातून होईल”, अशी माहिती बिग बींनी दिली.

पुढे ते म्हणतात, “आम्ही गरजूंच्या जेवणाची सोय करण्याचा निर्णय घेतला. मात्र हे वाटतं तितकं सोपं नाही. यात बऱ्याच अडचणी आहेत. लॉकडाउनच्या काळात घरातून बाहेर पडणं हे नियमांचं उल्लंघन केल्यासारखं आहे. मी ही जेवणाची पाकिटं तर तयार केली आहेत. परंतु गरजूंपर्यंत पोहचविण्यात मला अनेक अडचणी येत आहेत. काही अधिकाऱ्यांनी सांगितलं, की जेव्हा कोणी अशी जेवणाची पाकिटं घेऊन झोपडपट्टांमध्ये जातं, त्यावेळी तेथील नागरिक गाडीजवळ धावत येतात आणि गर्दी करतात”.

दरम्यान, हाजी अली दर्गा, माहिम दर्गा, बाबुलनाथ मंदिर, वांद्र्यामधील झोपडपट्टी, उत्तर मुंबईतील काही भाग या ठिकाणी या जेवणाच्या पाकिटांचं वाटप केलं जाणार आहे.