करोना व्हायरसमुळे संपूर्ण देश लॉकडाउन करण्यात आला असताना काहीजण देशातील जनतेच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र झटत आहेत. डॉक्टर, नर्स, सॅनिटेशन कामगार हे इतरांच्या आरोग्यासाठी काम करत आहेत. या कठीण काळात अभिनेता हृतिक रोशनने मदतीचा हात पुढे केला आहे. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी तो N95 व FFP3 मास्कचे वाटप करणार आहे. सोशल मीडियाद्वारे त्याने ही माहिती दिली.

‘अशा कठीण परिस्थितीत आपल्या समाजाची व शहराची काळजी घेणाऱ्यांची आपल्याला जमेल तशी मदत करायला हवी. मी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मास्कचे वाटप करणार आहे’, असं त्याने ट्विटरवर लिहिलं. यासोबतच त्याने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचे आभार मानले आहेत.

आणखी वाचा : आज तुम्ही मला खोटं ठरवलंत! अभिनेत्याने मागितली उद्धव ठाकरेंची माफी

करोना व्हायरसमुळे देशभरात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात करोना बाधितांची एकूण संख्या ६४९ आहे. त्यात ५९३ जण अजूनही करोना पॉझिटिव्ह आहेत. ४२ जण करोना मुक्त झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.