सध्या जगभरात थैमान घातलेल्या करोना व्हायरस विषयी सर्वच स्थरांमधून जनजागृती केली जात आहे. अनेक बॉलिवूड कलाकार देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना घरात राहण्याचे आवाहन करीत आहेत. तसेच ते घरात बसून काय करत आहेत याची माहिती देखील देत आहेत. अशातच अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने क्वारंटाइन केंद्रामधील टॉयलेटचा फोटो शेअर केला आहे.

दिव्यांकाने ट्विटरवर नुकताच एक फोटो शेअर केले आहे. या ट्विटमध्ये तिने क्वारंटाइन सेंटरमधील घाणेरड्या टॉयलेटचा फोटो शेअर केला आहे. तसेच भारतातील क्वारंटाइन केंद्रांची स्वच्छता करण्यासाठी तातडीने पावले टाकावी अशी मागणी देखील केली आहे. तिचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे.

भारतातील क्वारंटाइन केंद्राची अशी परिस्थिती असेल तर लोकांनी का पळून जाऊ नये? असा प्रश्न दिव्यांकाने ट्विटद्वारे मांडला आहे. पण तिने शेअर केलेला हा फोटो क्वारंटाइन विभागातीलच आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दिव्यांकाच्या या ट्विटवर एका यूजरने रिप्लाय देत सर्वांचे लक्ष वेधले आहे. ‘मी मुंबईतील कस्तूरबा रुग्णालयातील एक चांगली गोष्ट ऐकली आहे. एक व्यक्ती न्यूयॉर्कहून आल्यावर तेथे थांबली होती. त्यांचे बाथरुम आणि खोली अतिशय स्वच्छ होती. पण आता दुसरीकडे अशा बातम्या समोर येत आहेत’ असे त्या यूजरने म्हटले आहे.