निलेश अडसूळ

करोनाने  जगरहाटीसोबत मालिकाही बंद केल्या. त्यामुळे गेले तीन महिने घरातल्या टीव्हीने पुष्कळ आराम केला आहे. आता तो सुरू करायची वेळ अगदी समीप आली आहे. करोना गेला नसला तरी. कारण रंजनही माणसाची मूलभूत गरज आहे, मग कुणी तिला चौथी गरज म्हणोत, पाचवी वा सहावी. सहाच्या ठोक्याला घराघरांत दिवेलागणीसोबत टीव्ही सुरू ठेवण्याची परंपरा कुणालाच नाकारता यायची नाही.

तीन महिन्यांचा खंड तसा बराच मोठा काळ आहे. तीन महिन्यांच्या काळात साधारण ऋतू बदलतात. शेतीत एखादं पीक निघतं. अगदी जग इकडचं तिकडं होऊ शकतं. मग प्रेक्षकांना पुन्हा टीव्हीसमोर आणणं तसं आव्हानात्मकच आहे. पण तेच आव्हान पेलण्यासाठी वाहिन्यांनी नाना बदल मालिकेच्या संहितेत केले आहेत. आता आश्चर्य म्हणजे बदल केले खरे, पण काही बदल मात्र अगदी डोळे दिपवून टाकणारे आहेत. म्हणजे पूर्वीच्या मालिकेत अपघातानंतर चेहरेच बदलायचे इतके  विस्मयकारक. आता बदललेले लोक बरे की वाईट हा नंतरचा मुद्दा, पण चिंता आहे ती चतुर प्रेक्षकांची. ज्या प्रेक्षकांनी १० वर्षांपूर्वीच्या मालिका अथपासून इतिपर्यंत लक्षात ठेवल्या आहेत, त्या प्रेक्षकांना तीन महिन्यांपूर्वीचं लक्षात नसेल का.. तर तसं नाही आहे. आजही महिला वर्ग सांगू शकतात शेवटचा भाग कोणता पाहिला होता. त्यामुळे आता थेट काही तरी नवीनच अंगावर आल्याचा सर्वप्रथम धसका त्यांना बसेल.  ते स्वीकारायला आठवडा जाईल आणि मग बऱ्यावाईटचा निकाल टीआरपीवर दिसून येईल.

आता हे बदल नेमके आहेत तरी काय? झी मराठीवर पुन्हा एकदा तरुणांची गर्दी होणार आहे. कारण वातावरण गरम करणारी शनाया परत येते आहे अशी बतावणी थेट वाहिनीनेच केली आहे.  पण काहीही म्हणा, जुन्या शनायाची कमी भासत होती हे यानिमिताने मान्य करावंच लागेल. एकीकडे रसिका सुनीलच्या भूमिकेमध्ये असलेला मसाला आणि दुसरीकडे राधिकेचा राधिका मसाला आता एक होणार असल्याने या डबल बारचा गुरुनाथला चांगलाच ठसका बसणार आहे. अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या ‘अगं बाई सासूबाई’ या मालिकेतही अशीच कूस बदललेली आहे. म्हणजे मालिका संपताना साधीभोळी, सोशीक असणारी आसावरी तीन महिन्यांत थेट कणखर आणि मुत्सद्दी वगैरे होऊन येणार आहेत. हा बदल स्तुत्य असला तरी हे नेमकं कोणत्या ट्रेनिंग स्कूलचं यश आहे हे पाहावं लागेल. म्हणजे प्रेक्षक महिलाही तिथं जाऊन प्रशिक्षण घेतील. कदाचित या तीन महिन्यांच्या काळात शुभ्रानेच एखादं ट्रेनिंग स्कूल उभारलं असावं. असाही मागच्या मालिकेत तिला सहा तऱ्हेच्या सहा सासवांचा अनुभव दांडगा आहे. असं असलं तरी आगामी भागात मुकाट पोळ्या लाटणारे हात सोहमच्या गालावर पिठासहित उमटणार हे नक्की.

यात विशेष दु:ख करावंसं वाटतं ते ‘होम मिनिस्टर’ या मालिके चं. प्रत्येकाच्या घरी जाऊन चित्रीकरण करणं जोखमीचं असल्याने होम मिनिस्टर आता आपापल्या ‘होम’मध्येच बसून चित्रित करावं लागत आहे. त्यामुळे या करोनाने वहिनींची आणि भावोजीची केलेली ताटातूट प्रेक्षक मनाला सहन होणारी नाही.

सोनी मराठी वाहिनीवरील दोन मालिकांमध्ये तीन महिन्यांचा गेलेला काळ हा अनेक वर्ष पाठीमागे टाकून नवं रूप धारण करणारा आहे. म्हणजे ‘स्वराज्य जननी जिजामाता’ मालिकेत बाळ शिवबा टाळेबंदीनंतर थेट दहा वर्षांचे झालेले आहेत. यात विशेष बदल झाला आहे तो ‘आनंदी हे जग सारे’ या मालिकेत. यात तीन महिन्यांच्या काळात आनंदीच नाही तर तिची आजीही मोठी झाली आहे. इतकी मोठी की आता वयानुसार दोघींचेही चेहरे बदलले आहेत. सध्या रुपल नंदा मोठय़ा आनंदीच्या रूपात येणार असून लीना भागवत यांच्याऐवजी नीना कुलकर्णी आजीची भूमिका बजावणार आहे. ‘स्वमग्नतेचा आजार’ हा मूळ धागा असलेली ही मालिका येत्या काळात प्रेक्षकांना कशी मग्न करते आहे हे मात्र पाहण्यासारखं आहे.

तर ‘स्टार प्रवाह’वरील ‘रंग माझा वेगळा’ मध्ये दीपा आणि कार्तिकचा लग्नसोहळा सुरू असताना मालिका थांबली होती. पण आता कार्तिकशी लग्न कोण करणार, यावरून दीपा आणि तिची बहिण श्वेतामध्ये चांगलीच जुंपली आहे. त्यामुळे तो कार्तिक आहे की पैजेचा विडा अशीच मालिके त अवस्था आहे.

काळ्या रंगाला दोष देणारी श्वेता केवळ कार्तिकशी लग्न करण्यासाठी स्वत:च्या अंगाला काळा रंग फासून कार्तिकच्या शेजारी उभी राहते. रंजक नाटय़ घडवण्यासाठी हा बदल उत्तम असला तरी दीपाच्या मेकअपसाठी लागणारा एका दिवसाचा काळा रंग श्वेतावर खर्च झाल्याचं दु:ख निर्मात्याच्या मनात दाटून आलं असेल. या सगळ्या गदारोळात नोंद घ्यावीशी वाटते ते ‘वैजू नंबर वन’ या याच वाहिनीवरील मालिकेची. टाळेबंदी सुरू होऊन मालिका बंद झाली तेव्हा मालिकेतील नायक सुशील इनामदार पोलीस अंमलदार नोकरीवर गेलेला असतो. पण आज तीन महिन्यांनंतर मालिका सुरू होताना तो कामावरून परत येतानाचं दृश्य दाखवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे तो कोविड योद्धा म्हणून परतणार असल्याने चाळकरी त्याचं आनंदाने स्वागत करतात. लेखक-दिग्दर्शकांनी वेळेचं भान राखून साधलेला हा मेळ अनेक पोलीस बांधवाच्या कुटुंबीयांना धीर देणारा आहे.

मालिका जगतात अग्रेसर असलेल्या कलर्स मराठीवर मात्र अद्याप शुकशुकाट आहे. त्यामुळे ‘राजा रानीची गं जोडी’, ‘जीव झाला येडापिसा’ अशा दर्जेदार मालिकांचा दर्जेदार प्रेक्षक मालिका सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहे. त्यातही अजून प्रोमोही न झळकल्याने प्रेक्षकांची भलतीच निराशा झाली आहे. याच वाहिनीला ‘बिग बॉस’ मालिकेने बॉसच्या भूमिकेत आणलं होतं. त्यामुळे तीन महिन्यांनंतर पुन्हा एकदा गड राखण्यासाठी ‘बिग बॉस’ धावून आले तर त्यात आश्चर्य वाटायला नको. आणि इतर मालिकांबाबतीत खासगीत सांगायचं तर चित्रीकरण सुरू होऊन भाग तयार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे नवीन भाग लवकरच येतील, पण त्यात काय नवा बदल झाला असेल याचीच अधिक उत्सुकता आहे. फक्त ते बदल पात्र बदलण्याइतपत विस्मयकारक नसले म्हणजे मिळवलं.