देशभरातील करोनाचा प्रदुर्भाव वाढू नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशामध्ये २१ दिवस लॉकडाउनची घोषणा मंगळवारी रात्री केली. त्यानंतर देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असतानाच हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केलं आहे. दिग्दर्शक करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने यासंदर्भात आवाहन करणारा एक व्हिडिओ तयार केला आहे. या व्हिडिओमध्ये सिंम्बा चित्रपटामधील रुक जा रे बंदेया हे गाणं वापरुन नागरिकांनी घरीच थांबावं असं आवाहन करण्यात आलं आहे.

धर्मा प्रोडक्शनच्या युट्यूब चॅनेलवर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडिओला ‘जस्ट २१ डेस’ असं नाव देण्यात आलं आहे. आपण एकत्र मिळवून करोनाला हरवू शकतो असं या व्हिडिओच्या नावातच म्हटलं आहे. व्हिडिओमध्ये करोनामुळे थांबलेल्या मुंबईचे अनेक फोटो दाखवण्यात आले आहेत. या फोटोंबरोबर व्हिडिओमध्ये “रुक जा रे बंदेया… ये रात ज़रा सी है… बात समझ बंदेया… कुछ देर ही बाकी है… रख यकीन, आँखों से बादल आज हट जायेगा… चाँद तेरी आँखों में बंदेया चल के आएगा” या गाण्याच्या ओळी ऐकू येतात. या गाण्यामधून केवळ काही दिवस आपल्याला घरात थांबायचं आहे हे संकट लवकरच दूर होईल असं सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यकारी संचालक मायकल जे रेयान यांच्या वक्तव्याचा व्हिडिओही वापरण्यात आला आहे. यामध्ये रेयान यांनी “भारताने ज्या प्रमाणे देवी आणि पोलिओ या दोन रोगांशी लढा दिला तसाच लढा देण्याची भारताची वृत्ती आत्ताही दिसून येते आहे”, अशा शब्दांमध्ये भारताचे कौतुक केले. तसेच भारत करोनाविरुद्धच्या या लढ्याचा मार्ग जगाला दाखवेल अशी अपेक्षा रेयान यांनी व्यक्त केली आहे.

व्हिडिओच्या शेवटी करोना विषाणूंचा संसर्ग थांबवण्यासाठी आपल्याला फक्त २१ दिवसांची गरज आहे. चला संपूर्ण लॉकडाउनच्या सरकारच्या निर्णयाला पाठिंबा देऊयात, असं आवाहन करण्यात आलं आहे.

काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक रोहित शेट्टीनेही पुढाकार घेऊन करोनासंदर्भात जनजागृती करणारा आणि नागरिकांना आवाहन करणारा एक व्हिडिओ तयार केला होता. रोहित शेट्टी, अमिताभ बच्चन, अनिल कपूर, माधुरी, शिल्पा शेट्टी, आलिया भट्ट, अक्षय कुमार, रणवीर कपूर, आयुषमान खुराना, अजय देवगण असे अनेक कलाकार या व्हिडिओमध्ये दिसले होते. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रोहित शेट्टींचे आभारही मानले होते.