संपूर्ण जगात करोना व्हायरची भीती पाहायला मिळते. अशातच सर्वजण स्वत:ला करोना होणार नाहीना यासाठी काळजी घेत आहेत. बॉलिवूड कलाकारांनी तर घराबाहेर पडणे टाळले आहे. अशातच ‘बेबी डॉल’ या लोकप्रिय गाण्याची गायिका कनिका कपूरला करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. पण कनिकाने ही गोष्ट सर्वांपासून लपवली. तिने एका मोठ्या हॉटेलमध्ये आयोजीत केलेल्या पार्टीला देखील हजेरी लावली. त्यामुळे आता एक चित्रपट निर्मात्याने कनिकाला चांगलेच सुनावले आहे.

यासंदर्भात चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी एक ट्विट करत कनिकावर आरोप केले आहेत. तिच्या निष्काळजीपणामुळे शंभर लोकांचे आयुष्य धोक्यात घातल्याचे त्यांनी म्हटले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी ‘लाज वाटते कनिका तुझी. लंडनहून भारतात परतीस तेव्हा तुला करोनाचा संसर्ग झाल्याचे तु सर्वांपासून लपवलेस. तु एका ५ स्टार हॉटेलमध्ये आयोजीत केलेल्या पार्टीमध्ये सहभागी झालीस. तेथे उपस्थित असलेल्या १०० लोकांच्या संपर्कात आलीस. आता तु करोनाची चाचणी केलीस आणि ती पॉझिटिव्ह आली. तु इतर लोकांचे आयुष्य देखील धोक्यात टाकले आहेस’ असे म्हणत कनिकाला सुनावले आहे

शुक्रवारी कनिका लंडनहून भारतात आली. त्यानंतर तिला चार दिवस ताप आला. तिने करोना चाचणी करुन घेतली. ही चाचणी पॉझिटीव्ह आल्यामुळ लखनऊमध्ये तिला आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. खुद्द कनिकाने सोशल मीडिया पोस्टद्वारे करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली. कनिकाने ‘बेबी डॉल’, ‘बीट पे बूटी’, ‘टुकुर टुकुर’ ही गाणी गायली आहेत. तसेच तिने काही रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणूनही काम केले आहे.