बॉलिवूड अभिनेता सोनू सूद सध्या प्रचंड चर्चेत असून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. मुंबईत अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना आपल्या घरी पोहोचवता यावं यासाठी सोनू सूद रस्त्यावर उतरला असून बसेसची व्यवस्था करत आहे. मजुरांना आपल्या घरी पोहोचवण्यासाठी बसेसचा तसंच त्यांच्या जेवणाचा सगळा खर्च सोनू सूद उचलत आहे. सोशल मीडियावर सोनू सूद ट्रेंड होत असून एका चाहत्याने तर सोनू सूदला पद्मविभूषण देण्याची मागणी केली आहे. यावर सोनू सूदने दिलेल्या उत्तराने चाहत्यांचं मन जिंकलं आहे.

सोनू सूदचं काम पाहून भारावलेल्या एका चाहत्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग करत ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्याने मजुरांना मदत करणाऱ्या सोनू सूदला पद्मविभूषण दिलं जावं अशी मागणी केली आहे.

सोनू सूदने या ट्विटला उत्तर देताना म्हटलं आहे की, “माझ्या मार्फत आपल्या घरी पोहोचल्यानंतर येणारा प्रत्येक फोन माझ्यासाठी एक मोठा पुरस्कार आहे. देवाचा आभारी आहे की, हे पुरस्कार मला हजारोंच्या संख्येने मिळाले आहेत”.

सोनू सूदने आतापर्यंत हजारो प्रवाशांना मुंबईतून उत्तर प्रदेश, कर्नाटक, झारखंड अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये पाठवलं आहे. बस, जेवण, प्रवास हा सगळा खर्च सोनू सूद उचलत असून, त्याच्या या कामाचं बॉलिवूड, राजकारणी तसंच सर्वसामान्य सगळेजण कौतुक करत आहेत. जोपर्यंत प्रत्येक मजूर प्रवासी आपल्या घरी पोहोचत नाही तोपर्यंत आपली मोहीम सुरु राहणार असल्याचं सोनू सूद सांगतो. कितीही मेहनत करावी लागली तरी जोपर्यंत शेवटचा मजूर आपल्या घरी पोहोचत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही असा निर्धार सोनू सूदने व्यक्त केला आहे.